परीक्षेतले अपयश, प्रेमातलं अपयश, आई-वडिलांशी न पटणे, मित्र-मैत्रिणींकडून झालेले अपेक्षाभंग, असमाधान, व्यसनाधीनता, शारीरिक-मानसिक छळ, सामाजिक आणि आर्थिक स्तराविषयीचे गंड, प्रिय व्यक्तीचा मृत्यू अशा कारणांनी नैराश्याचे टोक गाठून या आत्महत्या झाल्या आहेत.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने नुकताच एक अहवाल संसदेत सादर केला असून, त्यातली धक्कादायक माहिती आणि चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. सन २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत संपूर्ण देशात १४ ते १८ वर्षे वयोगटाच्या २४ हजार ५६८ मुला-मुलींनी विविध कारणांसाठी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक तरुणांची संख्या असलेल्या सध्याच्या ‘तरुण भारता’मध्ये जर ही नवतरुण पिढी नैराश्यग्रस्त होऊन जीवनाला कंटाळत असेल, तर या देशाच्या प्रबळ भवितव्यासाठी यावर कालबद्ध उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘जगण्याची उमेद जागवणे’ या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.
या आठवड्यात आपण युवादिन साजरा केला. दरवर्षी विविध ठिकाणी हा दिवस अनेक उपक्रमांनी साजरा होतोच; पण यावेळी हे साजरीकरण अनोख्या आनंदात न्हाऊन निघाले होते. नुकत्याच झालेल्या ‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये पदकांची विजयी कामगिरी करणार्या खेळाडूंचा केंद्र सरकारच्या वतीने क्रीडामंत्र्यांच्या हस्ते समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. जागतिक पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणार्या ‘ऑलिम्पिक’ क्रीडा स्पर्धेमध्ये यावेळी भारताला जास्तीत जास्त पदके मिळवून देणार्या या गुणी तरुण खेळाडूंबद्दल सार्या भारतीयांच्या मनात अभिमान दाटून आला होता; त्या कर्तृत्ववान तरुणांच्या गळ्यात जेव्हा सत्काराचे रेशीमहार पडत होते, त्यावेळी देशाच्या कोपर्यात कुठेतरी गळ्यात फास घेऊन काही तरुण जीवांनी आपली जीवनयात्रा स्वतःच संपवून टाकल्याचे वास्तव समोर आले.
या आत्महत्यांची कारणं बघितली, तर काळजात एक कळ चमकून जाते. परीक्षेतले अपयश, प्रेमातलं अपयश, आई-वडिलांशी न पटणे, मित्र-मैत्रिणींकडून झालेले अपेक्षाभंग, असमाधान, व्यसनाधीनता, शारीरिक-मानसिक छळ, सामाजिक आणि आर्थिक स्तराविषयीचे गंड, प्रिय व्यक्तीचा मृत्यू अशा कारणांनी नैराश्याचे टोक गाठून या आत्महत्या झाल्या आहेत.
आत्महत्येची इच्छा मनात निर्माण होणे, हा मानसशास्त्रात एक प्रकारचा आजार मानला जातो. जसे शरीराला ताप येणे, डोके दुखणे, सर्दी-पडसे होणे, हे फार गंभीर नसलेले आजार होत असतात, तसाच मनाला ‘आत्महत्याग्रस्त मानसिकता’ हा आजार प्राथमिक स्वरूपात होत असतो. प्रथम तो जास्त गंभीर नसल्याने फारसा कुणाच्या लक्षात येत नाही. नंतर हळूहळू आतल्या आत हा आजार बळावतो आणि ती व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते.
आत्महत्येची प्रवृत्ती असलेली अशी माणसं हळूहळू या जगापासून, इथल्या वास्तव जगण्यापासून तुटत जातात आणि त्यांचा प्रवास आतल्या आत एका उलट्या दिशेने सुरू होतो. हा प्रवास त्यांना वैफल्याच्या धुसर धुक्यातून नैराश्याच्या अंधार्या गुहेकडे घेऊन जातो. त्या मार्गाच्या शेवटी असतो एखादा गहिरा काळा डोह किंवा खोल अंधारी विहीर. या अवघड प्रवासात थकलेल्या या जीवांना मृत्यू हीच विश्रांती वाटत असते. आपण मात्र कुणाच्या आत्महत्येची बातमी आली की दुःखी होतो, अस्वस्थ होतो, हळहळतो. पण, घटना घडायची ती घडून गेलेली असते.
बहुतांश वेळा असं आढळून आलं आहे की, आत्महत्येची घटना अचानक होत नाही, तिची पाळंमुळं आधीच खोलवर हातपाय पसरून मनाची जमीन वेढून बसलेली असतात. रागाच्या भरात किंवा भावनेच्या भरात अचानक आत्महत्या क्वचित कुठे होतातही; पण सामान्यपणे आत्महत्येची प्रवृत्ती असणारेच लोक या आजाराचे बळी ठरतात.
कसा उद्भवतो हा आजार? माणसाच्या आयुष्यातला सर्वात संवेदनाक्षम कालखंड असं मानसशास्त्राने ज्याचे वर्णन केले आहे, तो वादळी काळ म्हणजे वयाची १४ ते १८ ही वर्षं. हा ‘टीनएज पिरियड’ किंवा ही पौगंडावस्था यावर मानसशास्त्रात सर्वात जास्त अभ्यास झालेला आहे. मन आणि शरीर यात सर्वांगाने होणारे आमूलाग्र बदल व्यक्तीला तळापासून ढवळून काढतात. युवावस्थेच्या प्रारंभीचा हा सुसाट वारा जेव्हा आयुष्यात वाहायला लागतो, तेव्हा भोवतालच्या जगाबद्दल, स्वतःच्या जगण्याबद्दल असंख्य प्रश्न मनात थैमान घालू लागतात. याच कालावधीत शरीरात तयार होणारे नवे हार्मोन्स नवी ताकद, नवा उत्साह, नवी शक्ती प्रदान करीत असतात.
नवकल्पनांचे हजार मनोरे डोळ्यांना भुरळ घालून स्वप्नाचे रंगीत जग जिंकून घेण्याची अनिवार ओढ मनात जागी होते, त्याच वेळी अंगातली ऊर्जा पराक्रमाचे नवे क्षितिज काबीज करायला निघते. हे एवढं सगळं मनात आणि शरीरात घडत असताना भोवतीचं जग मात्र तेच असते, एका ठरावीक साचातून संथपणे जीवनाचा मार्ग पुढे घेऊन जाणारे. पण, मनाचा वेग मात्र ‘मारुततुल्य’ असा असतो. विचार आणि भावनांचा हा सुसाट वारा जेव्हा वाहायला लागतो, तेव्हा वारं प्यायलेल्या वासरासारखे मन बेलगाम वाट फुटेल तिकडे पळत सुटते, मनाबरोबरच शरीरही आडवाटांना धावू लागते. भोवतीचे जग मात्र ठरावीक पठडीत गोल गोल फिरत राहते. त्यातून एक आंतर्विरोध तयार होतो.
जीवनचक्राच्या विशिष्ट ठरावीक लयीत स्वतःची वेगात पडणारी पावले त्या गतीशी जुळवून घेण्याच्या नादात कमी-जास्त, मागे-पुढे पडत राहतात आणि तिथेच सगळी लय बिघडायला सुरुवात होते. मनाचा शरीराशी आणि भोवतीच्या जगाशी ताळमेळ बसवणे अवघड होत जाते. एकतर स्वगंड तयार होतात किंवा जगाबद्दलची तुच्छता मनात दाटायला लागते. त्यातूनच अनेक प्रश्नांचे गुंते होतात, हातून अनेक चुका होतात, पाहिलेली उंच उंच स्वप्नं कुवतीबाहेरची असतात. ती पूर्ण न झाल्याने नैराश्य घेरायला लागतं.
भावनिक वादळात मनाचं तारू हेलकावे खात भरकटू लागतं. विशेषतः शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजल्याने त्या नात्याकडून अवास्तव अपेक्षा निर्माण होतात, त्या पूर्ण होण्याजोग्या नसतात. तिथे वैफल्याचा कडेलोट होतो. वयाच्या १३-१४ या टप्प्यावर मुले घर आणि आई-वडील यांच्यापासून तुटून घराबाहेर आपलं एक जग तयार करू लागतात. आपल्या काळजीच्या माणसांपासून दुरावतात. समवयस्क मित्र-मैत्रिणीचं आकर्षण निर्माण होऊन तेच जग जास्त जवळचं वाटायला लागतं. याच काळात अनेक कुतूहलं जागी होतात, अनेक गोष्टींचे मोह वेडावून टाकतात. त्याच नादात पावलं व्यसनांकडे वळतात. अभ्यासावरचं लक्ष उडतं. परिणामी, परीक्षेत अपयश पदरी पडतं आणि नैराश्याचा घेरा वाढत जातो.
याशिवायही आत्महत्येची मानसिकता तयार होण्याची आणखी काही कारणे म्हणजे भावनिक, वैचारिक विकास नीट न होणे, संवेदनांचे व्यवस्थापन न समजणे, घरातून वंशपरंपरेने हा आजार चालत येणे, मुळातच मन दुबळे-निर्बल असणे. पण, असे असले तरी हे नैराश्य वेळेत लक्षात आले आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग मिळाला, तर ते लोक सुदैवी ठरतात. वाचतात.
18व्या वर्षानंतर माणसाच्या सज्ञानतेचा टप्पा सुरू होतो. मतदानाच्या अधिकारापासून अनेक अधिकार देणारा वयाच्या १८ वर्षांनंतरचा टप्पा व्यक्तीला प्रगतीकडे घेऊन जातो. पण, तत्पूर्वीचा १४ ते १८ हा टप्पा मात्र फार, निसरडा आणि धोकादायक असतो. याच निसरड्या वाटेवर सावरणारी माणसं, कुटुंबात समजून घेणार्या व्यक्ती, या क्षेत्रात काम करणार्या संस्था-संघटना, समुपदेशकांचे समूह यांची साथ-सोबत मिळाली तर नैराश्येचा घेरा कमी होऊ शकतो. अंधारात धडपडणारी पावलं प्रकाशवाटेकडे येऊ शकतात.
वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे राजे छत्रपती शिवराय, भागवत धर्माची पताका उंचावून ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर या अलौकिक व्यक्तींबरोबरच आपल्याच अवतीभोवती असणारे किती तरी तरुण विविध क्षेत्रात यशस्वी झेप घेताना पाहिले तर लक्षात येईल की, जीवनाला हवा तो आकार देण्याचं सामर्थ्य पौगंडावस्थेतील या वादळी शक्तीतच सामावलेले आहे. फक्त ही शक्ती ओळखता मात्र आली पाहिजे आणि ओळखल्यानंतर तिला योग्य दिशेने नेता आले पाहिजे, तरच अफाट स्वप्नं बघणार्या वयाच्या या सुंदर मनोवस्थेला पडणारी आकाशगामी स्वप्नं सत्याच्या जमिनीवर उतरण्याचे मनोबलही मिळेल.
मनोबल वाढवणे हाच आत्महत्येच्या मानसिकतेवर मात करणारा खरा उपाय आहे. जेव्हा कोणतीही व्यक्ती मनाच्या विकल-दुर्बल-निराश अवस्थेत असते, तेव्हा तिच्या मनाला धीर देणारी व्यवस्था समाजात निर्माण व्हायला हवी. एखादे अपयश म्हणजे जीवनाची समाप्ती नाही, याची जाणीव देऊन जगण्याची उमेद देणारा दुसरा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी विचारपूर्वक योजना हवी, ज्यायोगे या तरुण शक्तीला चैतन्य मिळेल.
तरुणांच्या शक्तीला योग्य दिशा देणे, ही खरे तर सर्वात पहिली गरज आहे. विचार आणि भावनांना आकार देण्यासाठी समुपदेशन केंद्र, व्यायामशाळा, योगाभ्यास व आरोग्यकेंद्र, आध्यात्म केंद्र, संस्कारकेंद्र देशासाठी व समाजासाठी काम करणार्या विविध संस्था संघटना, शाळा-महाविद्यालये यातील शिक्षक-पालक संघटना, अशा अनेक स्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष उपक्रम जाणीवपूर्वक राबवले गेले, तर तरुणाईभोवती वाढत चाललेला वैफल्याचा विळखा सैल होईल. मोकळा श्वास घेऊन ते आपल्या आयुष्याकडे नव्या आशेने बघू शकतील.
‘नाईटलाईफ’चा आग्रह धरणार्या आणि पब, हॉटेल्स, पार्ट्या यांना प्रोत्साहन देऊन स्वातंत्र्याचा स्वैराचार मांडणार्या प्रवृत्ती जोपर्यंत आपल्या समाजात प्रबळ आहेत, तोपर्यंत या देशातील तरुणांचं भविष्य अधिकाधिक धोक्यात आहे. आत्महत्याग्रस्त मानसिकतेपेक्षाही हा धोका जास्त मोठा आहे. तरुणाईला अशा प्रवृत्तींपासून आधी वाचवायला हवे. ‘जगण्याची उमेद जागवणे’ हे ध्येय घेऊन काम करणारा संजीवक समाज असेल तर भारतीय स्वातंत्र्याचं नवं पर्व खरोखर ‘अमृतमयी’ होईल.
- अमृता खाकुर्डीकर