मुंबई (अक्षय मांडवकर) - पुणे आणि रायगडला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटामधील वन्यजीव अभयारण्यामधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. 'हेमिडॅक्टिलस' कुळातील ही पाल या परिसराला प्रदेशनिष्ठ असल्यामुळे तिचे नामकरण 'हेमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस', असे करण्याते आले आहे. भारतामध्ये सापडणाऱ्या 'हेमिडॅक्टिलस' कुळातील मोठ्या पालींमधील 'हेमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस'ची भर पडली आहे. या संशोधनामुळे नव्यानेच संरक्षणाचा दर्जा मिळालेल्या 'ताम्हिणी वन्यजीव अभयारण्या'च्या संरक्षणाची गरज अधोरेखित झाली आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यातील जैवविविधतेमध्ये पालीच्या नव्या प्रजातीची भर पडली आहे. उत्तर सह्याद्रीमध्ये ४९.६२ चौ.किमी परिसरात विस्तारलेल्या 'ताम्हिणी अभयारण्या'मध्ये पालीची नवी प्रजात सापडली आहे. देशातील सरीसृपांचा विचार केल्यास आजही या वर्गाबाबत संशोधनाचे काम सुरू आहे. गेल्या दशकभरात उभचरांविषयी काम करणाऱ्या संशोधकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन'सारख्या संस्था या दुर्लक्षित असलेल्या जीवांवर संशोधनाचे काम करत आहेत. याच संस्थेतील संशोधक अक्षय खांडेकर, तेजस उद्धव ठाकरे आणि इशान अग्रवाल यांनी 'ताम्हिणी अभयारण्या'मधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. ही नवी प्रजात 'हेमिडॅक्टिलस' या पोटजातीमधील असून यामध्ये भारतात सुमारे ४६ प्रकारच्या पाली सापडतात.
२०१९ साली ताम्हिणी घाटामधील सर्वेक्षणादरम्यान ही पाल या संशोधकांना आढळून आली होती. २००८ साली उलगडलेल्या 'हेमिडॅक्टिलस आरोनबाउरी' या पालीशी ती साधर्म्य साधत असल्यामुळे तिच्याकडे दुलर्क्ष झाले होते. मात्र, 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन'मधील संशोधकांनी या पालीची डीएनए आणि आकारशास्त्राचे आधारे तपासणी केली. त्यावेळी ही पाल 'हेमिडॅक्टिलस आरोनबाउरी' या पालीपेक्षा वेगळी असून ती विज्ञानाकरिता नवीन असल्याची माहिती त्यांना मिळाली. ताम्हिणी घाटामधील बेसाल्ट खडकावर या पालीचा प्रामुख्याने अधिवास असल्याची माहिती संशोधक अक्षय खांडेकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. ही पाल निशाचार असून तिचा आकार १२६ मिलीमीटर एवढा आहे. त्यामुळे भारतामध्ये 'हेमिडॅक्टिलस' कुळात सापडणाऱ्या दोन मोठ्या पालींमध्ये तिचा समावेश झाल्याचे खांडेकर यांनी सांगितले. 'हमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस' ही पाल निशाचर असून तिचा रंग मातेरी आहे. खडकावर आढळणारे कीटक आणि इतर पाली या तिच्या प्रमुख खाद्य आहेत. सामान्य भाषेत तिचे नाव 'बेसाल्ट जायन्ट गेको' किंवा 'ताम्हिणी जायन्ट गेको', असे ठेवण्यात आले आहे. या संशोधनाच्या सर्वेक्षणासाठी स्वप्नील पवार, सतपाल गंगलमाले आणि पराग चौधरी यांनी मदत केली आहे.
ताम्हिणीच्या संरक्षणावर प्रकाश
नव्याने शोधलेली पाल ही केवळ ताम्हिणी घाटामध्येच आढळत असल्याने या जागेच्या नावावरुनच तिचे नामकरण 'हमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस', असे करण्यात आले आहे. याठिकाणी ती मोठ्या बेसाल्टच्या खडकावर आढळून येते. महाराष्ट्रामधील जैवविविधतेने समुद्ध असलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात ताम्हिणी घाट परिसर आहे. हा भूभाग अनेक प्रदेशनिष्ठ प्रजातींचे अधिवास क्षेत्र आहे. आम्हाला आशा आहे की, नव्याने शोधलेली पालीची ही प्रजात सह्याद्रीमधील या अद्भुत भूप्रदेशाच्या संरक्षणाची गरज आणि महत्त्व यावर प्रकाश टाकू शकेल. - तेजस उद्धव ठाकरे, संशोधक