नुकतेच ‘टोकियो ऑलिम्पिक’ पार पडले. आपल्या देशाच्या संदर्भामध्ये विचार करताना एकूण सात पदके प्राप्त होऊन ‘ऑलिम्पिक’ पदके मिळविणार्या देशांच्या यादीमध्ये आपण ३३वे स्थान पटकाविले. जगाच्या तुलनेमध्ये भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणार्या देशाकडे पाहताना पदकांची संख्या त्रोटक वाटणे शक्य आहे. परंतु, देशाच्या जडणघडणीबाबत विचार करताना एक देश म्हणून त्याचा मागील ७० वर्षांतील प्राधान्यक्रम पाहता देशाला खेळात सुवर्णकाळ आणण्याची आता सुरुवात झालेली आहे, हे यंदाच्या पार पडलेल्या ‘ऑलिम्पिक’मधून निदर्शनास आले. ‘अॅथलेटिक्स’मध्ये या ‘ऑलिम्पिक’मध्ये नीरज चोप्राने मिळविलेले सुवर्णपदक आणि त्यासोबतच पी. व्ही. सिंधू, लवलीना, भारतीय हॉकी संघ, बजरंग यांना कांस्य पदक, तर मीराबाई चानू, रवि कुमार, यांनी देशाला रौप्य पदक मिळवून दिले. जागतिक पातळीवर भारताच्या खेळातील यशासंदर्भामध्ये विचार करताना भारताची क्रीडाक्षेत्रातील मजल इतर देशांच्या तुलनेमध्ये अद्याप बरीच मागे आहे. देशामध्ये खेळाच्या सुवर्णकाळासाठी भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये खेळकेंद्रित दृष्टिकोनाच्या सध्या असणार्या कमतरतेमुळे अपेक्षित यशापासून आपण लांब राहिलो आहोत. खेळामध्ये करिअरच्या संधी निर्माण होत असतानाही त्यासाठी अद्यापि खेळ हा करिअरचा पर्याय म्हणून पुढे न आल्याने एक देश म्हणून विविध पातळीवर आपण मागे राहिलो आहोत. अमेरिका, जपान आदीसारख्या देशांनी जागतिक स्पर्धेमध्ये मिळविलेले यश पाहता, भारताला तो पल्ला गाठण्यासाठी देशामध्ये खेळासंदर्भात वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. भारतासारख्या देशामध्ये मध्यमवर्गाची असलेली मोठ्या प्रमाणातील संख्या पाहता, खेळाबाबत जागरूकता येताना त्याच्या आर्थिक गणितांचा विचार केल्यावर बहुतांश पालक खेळ या करिअरच्या पर्यायाकडे डोळेझाक करतात. परंतु, ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था या जिल्हा पातळी, तालुका पातळीवर काम करतात, त्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समितींतर्गत खेळासाठी विशेष निधी देऊन व त्यासाठीच्या पायाभूत सुविधा उभ्या करता आल्या, तर येत्या काळामध्ये खेळाचा सुवर्णकाळ बघता येणार आहे.
क्रीडा संस्कृती रुजण्याची गरज!
भारतासारख्या सांस्कृतिक वैविध्य असणार्या देशामध्ये कोणतीही गोष्ट रुजण्यासाठी तिचा येथील मुख्यप्रवाहातील जनतेवर प्रभाव पडावा लागतो. हे नक्कीच खरे मानावे लागेल. कारण, ज्या प्रमाणामध्ये या देशामध्ये क्रिकेट हा खेळ रुजला, वाढला, त्याचे व्यावसायीकरण होऊन त्याद्वारे येथील खेळाडूंना नव्या व्यासपीठांमुळे संधी मिळाल्या. त्या प्रमाणामध्ये या देशामध्ये भालाफेक, थाळीफेक, ‘वेटलिफ्टिंग’, टेनिस, कुस्ती आदी खेळांना तितक्या प्रमाणामध्ये ग्लॅमर मिळाले नसल्याचे वास्तव आहे. ‘आयपीएल’च्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या ‘कबड्डी लीग’ आदीसारख्या लीगमुळे त्या-त्या खेळामध्ये असणार्या खेळांडूना आर्थिक चणचणीला सामोर न जावे लागल्याने त्यांचा खेळावरसुद्धा वाईट परिणाम होत नाही. परंतु, खेड्यातील अद्यापि सुविधांनी पूरक नसणार्या गावातील खेळाडूला संधी आणि त्यातील आर्थिक बाजूमुळे ते खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. केंद्र सरकारकडून ‘खेलो इंडिया’अंतर्गत विविध योजना सुरू असलेल्या भारतात क्रिकेटमध्ये मिळणारा पैसा पाहता, इतर खेळाडूंना त्यांच्या खेळावरील खर्चाच्या चक्रातून बाहेर निघण्यासाठीच संघर्ष करणे भाग पडते आणि यामुळेच या देशामधील इतर खेळाडू हे जागतिक स्पर्धेमध्ये त्यांचे कर्तृत्व असतानाही ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. देशाला क्रीडाक्षेत्रामध्ये अग्रेसर झालेले पाहावयाचे असल्यास शालेय शिक्षणामध्ये क्रीडा विषयामधून विद्यार्थ्यांना त्या-त्या खेळातील शास्त्रीय ज्ञान देणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर अमेरिका, चीन, जपान या देशांच्या पंगतीमध्ये जाऊन बसण्याचे स्वप्न साकार करायचे असेल, तर देशाच्या संस्कृतीमध्ये महत्त्वाचे खेळांना ग्लॅमर मिळवून देणे व त्या खेळांसाठी खेळांडूना करिअरच्या संधीबाबत आशादायक चित्र निर्माण करणे, हे ज्या पद्धतीने सरकारचे कर्तव्य आहे, त्याप्रमाणे इथल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कारण, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने हॉकी, कुस्ती आदी खेळांमध्ये ज्याप्रमाणे जागतिक दबदबा निर्माण केला, त्याप्रमाणे इतर खेळ देशामध्ये रुजलेले असताना त्याकडे आकर्षित करण्यासाठी खेळांडूना आर्थिक सुबत्तेची खात्री मिळणे व त्याबाबत आशादायक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.