हॉस्पिटलमध्ये बाह्यरुग्ण विभाग असतो, ज्याला इंग्रजीत ‘ओपीडी’ (आऊट पेशंट डिपार्टमेंट) म्हणतात व हॉस्पिटलमध्ये सर्रासपणे ‘ओपीडी’ असेच म्हटले जाते. या विभागात उपचार घेणार्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागत नाही, पण काहीकाहींना तर सतत उपचार घ्यावे लागतात, अशांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळते का, याबाबतची माहिती आपण आजच्या लेखातून पाहणार आहोत.
किडनी खराब झालेल्यांना ‘डायलसिस’ची उपचार पद्धती दिली जाते. ही उपचार पद्धती सतत घ्यावी लागते, पण ती ‘ओपीडी’त घ्यावी लागते. यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागत नाही, हे एक उदाहरण दिले. असे बरेच उपचार आहेत. पण, यांच्या आरोग्य विमा संरक्षणाचे काय? ‘डे-केअर’ उपचार पद्धती असते म्हणजे उदाहरण द्यायचे, तर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया अशा ‘डे-केअर’ उपचार पद्धतीत मोडते, जिथे शस्त्रक्रिया झाल्यावर तीन-चार तासांनी रुग्णाला घरी पाठविले जाते. या ‘डे-केअर’ उपचारपद्धती ‘ओपीडी’मध्ये समाविष्ट नसते. ‘नेचरोपॅथी’ची उपचार पद्धती ही ‘ओपीडी’ मानली जात नाही, याशिवाय सौंदर्य खुलविण्यासाठी घेतलेली उपचार पद्धती, स्वत: शस्त्राने किंवा अन्य पद्धतीने करुन घेतलेली दुखापत ‘ओपीडी’त समाविष्ट होऊ शकत नाही.
‘ओपीडी’ उपचार पद्धतीचा खर्च निश्चित केलेल्या नियमांनुसार नेहमीच्या पॉलिसीत मिळू शकतो किंवा यासाठी अतिरिक्त प्रीमियम भरूनही जास्त लाभ घेता येऊ शकतात. हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी ३० ते ९० दिवसांचा (प्रत्येक विमा कंपनीने यासाठीचा कालावधी वेगवेगळा ठरविलेला असतो.) औषधे, डॉक्टरांचे सल्ला शुल्क, वैद्यकीय चाचण्या यासाठी केलेला खर्च विम्याचा दावा म्हणून संमत होऊ शकतो. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ६० ते १८० दिवसांच्या उपचारपद्धतीच्या खर्चाचा दावा संमत होऊ शकतो. या हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वीचा व हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतरच्या ‘ओपीडी’ खर्चाशिवाय अन्य कारणांनी झालेला ‘ओपीडी’ खर्चही मिळू शकतो. पण, तशी तरतूद ‘पॉलिसी क्लॉज’मध्ये असावयास हवी. त्यामुळे पॉलिसी विकत घेताना अशी तरतूद पॉलिसीत आहे की नाही, याची खातरजमा करुन घ्यावी आणि अशी तरतूद असलेली पॉलिसी घेतल्यानंतर ‘प्रीमियम’ जास्त भरावा लागणार, हेदेखील ध्यानात ठेवावे. काही पॉलिसीत ‘ओपीडी’ उपचार पद्धतीचे ‘कव्हरेज’, ‘अॅड-ऑन कव्हर’ म्हणून दिले जाते म्हणजे ‘अतिरिक्त फायदा’ म्हणून दिले जाते. हे कव्हर घेणार्यांना, हॉस्पिटलमध्ये नेहमी ‘ओपीडी’ रुग्ण म्हणून जाणार्यांना फायदा देऊ शकते. हृदयरोग, दमा वगैरेसारख्या रुग्णांना नेहमी उपचार घ्यावे लागतात व यासाठी नेहमी खर्चही होत असतो. हा खर्च आरोग्य विमा कंपनीकडून मिळण्याची सोय ‘ओपीडी’ ‘कव्हरेज’ असल्यास मिळू शकते. काही आजार असे आहेत की, जे एकदा झाले की जन्मभर साथ देतात. उदाहरणच द्यायचे तर मधुमेह. हा आजार एकदा झाला की, जीवंत असेपर्यंत साथ सोडत नाही, पण रुग्ण चांगल्या सवयींनी हा आजार नियंत्रणात ठेवू शकतो. हा आजार असणार्यांना सततची औषधे रक्त तपासणीसारख्या चाचण्या नेहमी ठराविक कालावधींनी कराव्या लागतात, अशांसाठी ‘ओपीडी कव्हरेज’ फायद्याचे ठरते. काही चांगल्या सहकारी बँका त्यांच्या अधिक वयाच्या भागधारकांना ‘ओपीडी’ उपचार पद्धतीसाठी किंवा ‘हेल्थचेक अप’साठी दर दोन वर्षांनी ठराविक रक्कम देतात. अस्थमा, मधुमेह, थायरॉईड, हृदयविकार तसेच पक्षाघात, ‘डायलिसिस’ उपचारपद्धती वगैरे आजार असणार्यांनी ‘ओपीडी क्लॉज’ समाविष्ट असलेलीच पॉलिसी घ्यावी. ‘ओपीडी’ उपचार पद्धतीचा खर्च साधारणपणे वर्षाला पाच ते २० हजार रुपयांपर्यंत मिळतो. पण, याहून अधिक खर्च संमत करणार्या ही पॉलिसीही आहेत. काही उपचार पद्धतीत रक्कम कमाल मंजूर करण्याचे नियम आखलेले आहेत. उदाहरणार्थ रुग्ण ‘फिजिओथेरपी’ची उपचार पद्धती घेत असेल, तर प्रत्येक ‘सीटिंग’साठी एक ठराविक रक्कम मंजूर केली जाते.
‘ओपीडी’ विमा संरक्षण कोणीही घेऊ शकतो. पण, जे नेहमी ‘ओपीडी’त उपचार पद्धती घेतात, अशांसाठीच याचा जास्त फायदा आहे. म्हणजे जास्त वयाच्या लोकांसाठी हे संरक्षण जास्त गरजेचे आहे. ‘ओपीडी’ उपचार पद्धतीबाबतचे नियम प्रत्येक पॉलिसीनुसार वेगवेगळे आहेत, प्रत्येक विमा कंपनीनुसार वेगवेगळे आहेत, काही पॉलिसी लसीकरणाचा खर्चही देतात सगळ्याच देत नाही. पॉलिसीत काम काय समाविष्ट आहे, हे स्वत: वाचावे. पॉलिसी गळ्यात मारणारा एजंट त्याचा धंदा व्हावा म्हणून काहीही खोटी किंवा चुकीची माहिती देतो, हे नेहमी लक्षात ठेवावे. नाहीतर जेव्हा दावा सादर करायची वेळ येईल, तेव्हा पश्चाताप करुन घ्यावा लागणार नाही. पॉलिसीत जर दहा हजार रुपये ते १५ हजार रुपयांपर्यंतचे ‘ओपीडी कव्हरेज’ समाविष्ट करावयाचे असेल, तर पॉलिसीधारकाला यासाठी वर्षाला पाच ते आठ हजार रुपये प्रीमियम, नेहमीच्या पॉलिसीच्या प्रीमियमपेक्षा अतिरिक्त भरावा लागेल, ‘ओपीडी’साठी केलेल्या दाव्याच्या ७० ते ८० टक्के रक्कम विमा कंपन्यांकडून मंजूर होते, असा अनुभव आहे.
प्रसुतीखर्चासाठी आरोग्य विमा संरक्षण
नेहमीच्या आरोग्य विमा पॉलिसीत प्रसुतीचा खर्च मिळण्याची तरतूद नसते, काही विमा कंपन्यांनी त्यांच्या ‘कॉम्प्रेन्सिव्ह’ आरोग्य विमा पॉलिसींत प्रसुती खर्च समाविष्ट केला आहे, तर काही कंपन्या यासाठी जास्तीचा प्रीमियम भरून ‘अॅड-ऑन’ सुविधा देतात. प्रसुती विमा पॉलिसीत प्रसुतीसंबंधी होणारे सर्व खर्च मिळू शकतात. काही विमा कंपन्या प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतरचा तसेच नवजात बालकाचा औषधोपचाराचा खर्चही देतात. प्रसुती आरोग्य विमा संरक्षण कोणत्याही पॉलिसीत मुळात समाविष्ट नसते. ते अतिरिक्त प्रीमियम भरून अतिरिक्त संरक्षण म्हणून घ्यावे लागते. सध्या प्रसुतीचा खर्च वाढला आहे. नैसर्गिक प्रसुती झाली, तर ७५ ते ८० हजार खर्च येतो व ‘सिझेरियन’ करून प्रसुती झाली, तर दोन लाख रुपयांचा खर्च येतो. बर्याच विमा कंपन्यांच्या फक्त प्रसुती आरोग्य विमा पॉलिसी अशा खास प्रसुतीचाचा खर्च देणार्या विशिष्ट पॉलिसी आहेत. गर्भधारणा झाल्यानंतर हे संरक्षण किंवा ही पॉलिसी मिळत नाही, काही काही विमा कंपन्या ही पॉलिसी उतरविल्यानंतर तीन ते चार वर्षांनी प्रसुतीचा दावा संमत करतात. कारण, तीन ते चार वर्षे ‘वेटिंग पीरिएड’ मानला जातो. ‘वेटिंग पीरिएड’चा कालावधी प्रत्येक विमा कंपन्यांचा वेगवेगळा आहे. तसेच प्रत्येक विमा पॉलिसीचाही वेगवेगळा आहे. पण, प्रत्येक पॉलिसीत ‘वेटिंग पीरिएड’ हा ‘क्लॉज’ असतोच. त्यामुळे विवाह झाल्याबरोबर ही पॉलिसी घ्यावी व पहिले मूल होण्यास ‘वेटिंग पीरिएड’ संपेपर्यंत थांबावे. तत्काळ मूल होऊ देऊ नये. प्रसुती विमा योजनेत वंध्यत्व तपासणीचा व उपचाराचा खर्च, गर्भधारणा होऊ नये म्हणून केलेली शस्त्रक्रिया, स्टरलायझेशन किंवा डॉक्टरव्यतिरिक्त इतरांकडून करुन घेतलेले उपचार यांचा खर्च मिळत नाही. काही कारणांनी झालेली ‘टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी’ मासिक तपासणी वगैरेंचा खर्च न मिळणार्याही पॉलिसी आहेत. ‘हेल्थ पॉलिसी’त प्रसुती पॉलिसी घेतली, तर ती ठराविक रकमेच्या मर्यादेपर्यंतच मिळते. या रकमेहून प्रसुतीसाठी अधिक खर्च झाला, तर तो पॉलिसीधारकाला स्वत: सोसावा लागतो. प्रसुती पॉलिसी समाविष्ट असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम नेहमीच्या आरोग्य विमा पॉलिसीपेक्षा जास्त असतो. जसे वय वाढते तसा प्रसुती विमा पॉलिसीचा प्रीमियम वाढतो. कारण, महिलेचे वय जसे वाढते, तसा प्रसुतीचा गुंता वाढतो. नवजात बालक जन्मलेल्या दिवसापासून ९० दिवस या विम्याचे संरक्षण मिळते. महिलेला प्रसुतीच्या तारखेपूर्वी तीस दिवसांचे व प्रसुतीच्या तारखेनंतर ६० दिवसांचे विमा संरक्षण या पॉलिसीत मिळते. तारखेपूर्वी प्रसुती झाली प्रीमॅच्युअर किंवा प्रसुतीच्या वेळी शारीरिक अडचणी निर्माण झाल्या म्हणजे रक्तदाब वाढला, रक्तदाब कमी झाला व अन्य काही अशांचा खर्चही मंजूर होणार की नाही, याबाबतचे नियमही पॉलिसीधारकाने समजून घ्यायला हवे. भराव्या लागणार्या प्रीमियममधून मिळणारा फायदा याचा अभ्यास करूनच पॉलिसी समजून घ्यायला हवी. भराव्या लागणार्या प्रीमियममधून मिळणारा फायदा याचा अभ्यास करुनच पॉलिसी खरेदी घ्यावी.
२५ वर्षांच्या महिलेला कसलेही आजार नाहीत व तिला पाच लाख रुपयांचा प्रसुती विमा उतरवायचा असेल, तर तिला किती रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागेल. विमा कंपनीचे नाव प्रसुती विमा संरक्षणाशिवाय प्रीमियम रुपये प्रसुती विमा संरक्षणासह प्रीमियम वेटिंग पीरिएड (प्रसुती विम्याचा दावा संमत होण्यासाठी)
ज्या दाम्पत्यांना प्रसुती विमा संरक्षण घ्यावयाचे असेल, अशांनी लग्न झाल्याबरोबर लवकर पाळणा हलणार नाही, याची काळजी घ्यावी, हेच वरील तक्ता सुचवित आहे.