इतरजण त्याला ‘रिकामटेकडा’ म्हणत. पण, याच मुलाचे भविष्यात लाखो लोक ‘फॉलोवर्स’ असतील आणि हा मुलगा डॉलर्समध्ये कमावेल, असं कोणी सांगितलं असतं, तर त्याला वेड्यातच काढलं गेलं असतं. लोकांना आपल्या कर्तृत्वाने उत्तर देणारा हा मुलगा म्हणजे ’घरचा स्वाद’ फेम दुर्गेश भोईर होय.
मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कुठेतरी नोकरी करावी, चार पैसे कमवावे हे प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. जर त्याने काही नोकरी- व्यवसाय केला नाही आणि घरीच बसून राहिला की, तो ‘रिकामटेकडा’ ठरतो. अशा मुलांसाठी ‘खायला काळ अन् भुईला भार’सारख्या म्हणी तयार झाल्या जणू. त्याच्या आई-बाबांनासुद्धा वाटायचं की, आपल्या मुलाने कुठेतरी नोकरी करावी. चार पैसे कमवावे. तो मात्र त्याला आवडणारी गोष्ट करत होता. जी नवीन युगाची होती. इतरजण त्याला ‘रिकामटेकडा’ म्हणत. पण, याच मुलाचे भविष्यात लाखो लोक ‘फॉलोवर्स’ असतील आणि हा मुलगा डॉलर्समध्ये कमावेल, असं कोणी सांगितलं असतं, तर त्याला वेड्यातच काढलं गेलं असतं. लोकांना आपल्या कर्तृत्वाने उत्तर देणारा हा मुलगा म्हणजे ’घरचा स्वाद’ फेम दुर्गेश भोईर होय.
हरेश्वर भोईर आणि मंदा भोईर हे मुलुंडमधल्या गव्हाणपाड्याचे रहिवासी. भोईर दाम्पत्यास दोन्ही मुलंच. हरेश्वर भोईरांची वडापावाची गाडी सुरू होती. चव आणि दर्जा यामुळे त्यांच्या वडापावाची पंचक्रोशीत ख्याती होती. १७ वर्षांनी त्यांनी ही वडापावची गाडी बंद केली. त्यानंतर मंदा भोईर यांनी भाकर्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, छोटा दुर्गेश मुलुंडच्या शाळेत शिकला तिथेच त्याने दहावी पूर्ण केली. त्यानंतर त्याने मालाडच्या महाविद्यालयातून बारावी पूर्ण केली.
शिक्षण पूर्ण केल्यावर दुर्गेश एखादी नोकरी करेल, असं घरच्यांना वाटत होतं. मात्र, दुर्गेशला खुणावत होता तो सोशल मीडिया. त्याला खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड म्हणून २००९च्या सुमारास त्याने स्वत:चा ‘फूड ब्लॉग’ सुरु केला. यामध्ये वेगळेपण हे होते की, त्या ब्लॉगमध्ये मजकुरासोबत रिकाम्या भांड्यांपासून ते पदार्थ तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्याचा फोटो नीट टाकत असे. हे काहीतरी नवीन होतं. त्याच्या या नावीन्यपूर्ण कृतीला लोकं चांगलाच प्रतिसाद देऊ लागले. विविध वृत्तपत्रांनी त्याच्या खाद्यपदार्थांची दखल घेण्यास सुरुवात केली. कालांतराने लोक युट्यूबसारख्या माध्यमांकडे वळले होते. दुर्गेशला कोणीतरी म्हणालं, “तू युट्यूब चॅनेलवर तुझा ‘फूड शो’ का करत नाहीस?” येथूनच दुर्गेशच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
घरातल्या स्वयंपाकघरात मोबाईलचा वापर करुन त्याने चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. प्रकाशयोजना कशी असावी, ध्वनिमुद्रण कसे करावे, कॅमेर्याचा अँगल काय असावा, यापैकी कशाचीच माहिती नव्हती. होती फक्त जिद्द आणि आत्मविश्वास. आदल्या दिवसापासून सुरुवात होई. रात्रीपर्यंत चित्रीकरण पूर्ण केले जाई. त्यानंतर तयार झालेला व्हिडिओ मित्राकडे पाठवला जाई. मित्र त्या व्हिडिओचे संकलन करुन पाठवत असे. सकाळी १०.३० पर्यंत हा व्हिडिओ युट्यूबर अपलोड केला जाई. हळूहळू तांत्रिक बाबी दुर्गेश शिकत होता. या क्षेत्रातील कोणीही गुरू नसताना एकलव्यासारखा तो शिकत राहिला. व्हिडिओचा पहिला लाईक आणि पहिलं ‘सबस्क्रिप्शन’ त्याचंच होतं. सलग सहा महिने व्हिडिओज् टाकूनसुद्धा काही शेकड्यांमध्येच ‘सबस्क्रिप्शन्स’ होते. मात्र, सातत्यावर दुर्गेशचा विश्वास होता. ही सारी प्रक्रिया तो अव्याहतपणे पार पाडत होता. यासाठी त्याची आई त्याला मदत करायची. मंदाताई स्वत: सुगरण असल्याने त्यांचं पाककौशल्य दुर्गेशमध्ये उतरलं होतं. साध्या, अशिक्षित पण अपार मेहनती अशा आपल्या आईलासुद्धा युट्यूबसारख्या आधुनिक माध्यमाची ओळख त्याने करून दिली. त्यामध्ये आवड निर्माण करून दिली. आज आई आणि दुर्गेश एकत्र मिळून काम करतात. विशेष म्हणजे, आई मुलाची ठरलेली सर्वात पहिली जोडी म्हणून ‘युट्यूब इंडस्ट्रीत’ नाव घेतले जाते.
काही दिवसांनी संकलन करणार्या मित्राला नोकरी लागली. आता संकलनाची जबाबदारीसुद्धा दुर्गेशवरच आली. परत युट्यूबचाच त्याला आधार होता. युट्यूबवरचे व्हिडिओज् पाहून तो संकलन विद्या शिकला आणि मग स्वत:चे व्हिडिओ स्वत:च तयार करु लागला. ‘मटण सुका’ची त्याने एक दिवस रेसिपी युट्यूबवर अपलोड केली. वार्याच्या वेगाने ती रेसिपी सगळीकडे ‘व्हायरल’ही झाली. एका एका रेसिपीने दुर्गेश ‘स्टार’ झाला. त्याच्या व्हिडिओज्ला लाखांमध्ये‘ लाईक्स’, ‘सबस्क्रिप्शन’ मिळू लागलं. आतापर्यंत १० लाख, ४० हजार ‘सबस्क्रिप्शन’ त्याच्या ‘घरचा स्वाद’ या युट्यूब चॅनेलला मिळाले आहेत. तब्बल १७ कोटी लोकांनी ‘घरचा स्वाद’ वरील रेसिपीज् पाहिल्या आहेत. दुर्गेश आणि आईच्या या युट्यूब चॅनेल्सचे यश पाहून अनेक कंपन्या प्रायोजकत्व घेऊन त्याच्यासोबत काम करत आहेत. फक्त आगरी, कोळी, मालवणी एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता, दुर्गेश संपूर्ण भारतातील विविध खाद्यपदार्थ तयार करण्याच्या रेसिपी दाखवतो. निव्वळ रेसिपी न सांगता त्यांचा इतिहास, संस्कृती आदी उलगडून दाखविणे हे त्याचं अनोखं वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यामुळेच तो इतर ‘फूड ब्लॉगर’पेक्षा वेगळा ठरला.
रेसिपीज् पाहून दुर्गेशला अनेक फोन यायचे. फोन करणार्यांची गाडी अडायची ती मसाल्यांवर. एखादा पदार्थ ‘हिट’ ठरतो तो मसाल्यामुळे, नेमकी ती भट्टी जमत नाही अशीच अनेकांची तक्रार होती. हेच ध्यानात घेऊन दुर्गेशने आपल्या ‘मी हाय कोळी’ या ब्रॅण्ड अंतर्गत कोळी मसाला बाजारात आणायचा ठरवला. सुरुवात अगदी सात किलोपासून केली. मागणी वाढत होती म्हणून एका आंतरराष्ट्रीय ‘ई-कॉमर्स’ कंपनीसोबत विक्रीसाठी दुर्गेशने बोलणी केली. मात्र, त्यांनी मागितलेले कमिशन अव्वाच्या सव्वा होते. दुर्गेशने स्वत:चीच वेबसाईट सुरू केली आणि मसाल्याचे विपणनसुद्धा केले. आज मसाल्याचे उत्पादन टनामध्ये होते.
दुर्गेशला विविध प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली. अनेक ठिकाणी मार्गदर्शन करण्यास ‘व्याख्याता’ म्हणून त्यास निमंत्रित केले जाते. ज्यांना स्वत:चे हॉटेल वा खाद्यपदार्थासंदर्भात काही उद्योग सुरु करायचा असेल, त्यांना दुर्गेश मार्गदर्शन करतो. समाजमाध्यमांवर ‘हिट’ होण्यासाठी मजकूर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उर्वरित तांत्रिक बाबी आपणांस कुठेही उपलब्ध होऊ शकतात. मात्र, मजकूर हा आपल्यालाच निर्माण करावा लागतो. विशेषत: हा मजकूर इतरांपेक्षा भिन्न आणि आकर्षक असेल, तरच लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधले जाते, असे दुर्गेश भोईर सांगतो. सध्या त्याचे युट्यूबवर १० लाख, ४० हजार ‘सबस्क्राईबर्स’ आहेत. फेसबुक पेजला पाच लाख ‘फॉलोअर्स’ आहेत आणि इन्स्टाग्रामवर ४० हजारांवर ‘फॉलोअर्स’ आहेत.
भविष्यात मसाल्यांमध्ये विविध पर्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे दुर्गेश सांगतो. सातत्य, अपार कष्ट, संशोधक वृत्ती या गुणांमुळेच एकेकाळी ‘रिकामटेकडा’ वाटणारा दुर्गेश भोईर आज मराठी विश्वातील एक विख्यात आणि सर्वाधिक पसंती लाभलेला ‘फूड ब्लॉगर’ ठरलेला आहे.