दिल्ली - दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या अगोदर संपूर्ण दिल्लीत टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा, नेमबाज दीपक कुमार, धावपटू अमोज जेकब आणि सार्थक भांबरी यांचे होर्डिंग लावले होते. मात्र, होर्डिंग लावून जाहिरतबाजी करण्याच्या पलीकडे दिल्ली सरकारने या खेळाडूंना आॅलिम्पिकपूर्वी कोणतीही मदत दिली नाही.
दिल्ली सरकाराने लावलेल्या या होर्डिंगवर २२ वर्षीय धावपटू सार्थक भांबरीने होर्डिंगवर प्रतिक्रिया व्यक्त केली. क्रीडापटूंना कोणतीही मदत न दिल्याबद्दल भांबरी यांनी दिल्ली सरकारवर जोरदार टीका केली. "मी तुम्हाला सांगू शकतो की दिल्ली सरकार माझ्या मदतीला कधी आले नाही, मला कधीही आर्थिक मदत दिली गेली नाही," असे तो म्हणाला. मी पाहिले की ऑलिम्पिकसाठी होर्डिंग्ज आणि पोस्टर्सवर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले आहेत. जरी त्यांनी ऑलिम्पिकला जाण्याच्या काही महिन्यांपूर्वी आम्हाला आमच्या तयारीसाठी या खर्च केलेल्या पैशांमधील १० ते १५ टक्के रक्कम दिली असती, तर आम्ही त्याचा चांगला उपयोग करू शकलो असतो. ”
भांबरीने दिल्ली सरकारच्या मिशन एक्सलन्स योजनेचेही पोलखोल केली. ही योजना राष्ट्रीय राजधानीतील अव्वल खेळाडूंना आर्थिक मदत करण्यासाठी आखण्यात आली आहे. या योजनेचा कोणताही फायदा होत नसल्याचा आरोप करून, युवा खेळाडू भांबरी म्हणाला, “मिशन एक्सलन्स ही एक चांगली योजना आहे. पण त्यांना खरोखरच त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. कारण जर मी आज ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली आणि मला पुढील वर्षी आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची तयारी करायची आहे. तर २०२३ पर्यंत माझ्याकडे निधी नसेल, मग त्याचा काय उपयोग ? ”
हे आरोप केल्यानंतर भांबरी याने एक ट्विट स्पष्टीकरण दिले आहे. "मी दिल्ली सरकारच्या पूर्ण पाठीशी आहे. मला आधी धोरणांची माहिती नव्हती आणि म्हणून मिशन एक्सलन्स योजनेसाठी अर्ज करू शकलो नाही," असे त्याने म्हटलंय. २२ वर्षीय धावपटू भांबरी हा दिल्लीच्या राजौरी गार्डनचा रहिवासी आहे आणि तो पदवीपूर्व विद्यार्थी आहे. भांबरी आणि जेकब ४०० मीटर रिले पथकाचे सदस्य होते. ज्या संघाने 3:00:25 सेकंदांच्या वेळेसह ऑलिम्पिकमध्ये आशियाई विक्रम केला. पाच वर्षांपूर्व भांबरीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याने २०२० मध्ये पुनरागमन केले आणि दिल्ली राज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मीटिंग रेकॉर्डसह 200 मीटर/400 मीटर स्प्रिंटमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली.