आम्ही सर्व एकच आहोत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2021   
Total Views |

Mohan Bhagwat_1 &nbs
 
 
महात्मा गांधीजींचा मार्ग थोडा वेगळा होता. मुसलमान आपले लहान बंधू आहेत, त्यांना सामावून घेतले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. या सर्व भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळी भूमिका डॉ. मोहनजी भागवत यांनी मांडलेली आहे.
 
 
डॉ. वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या ‘वैचारिक समन्वय - एक पहल’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुस्लीम राष्ट्रीय मंचने गाझियाबाद येथे नुकताच आयोजित केला होता. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रविवार, दि. ४ जुलै रोजी झाला. पुस्तकाचे लेखक मुसलमान बांधव आहेत आणि व्यासपीठ मुस्लीम राष्ट्रीय मंच होते, त्यामुळे प्रसंगाचे औचित्य साधून मोहनजी भागवत यांनी मुसलमानांकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्टपणे मांडला.
 
 
 
आपल्या देशात एक वर्ग असा आहे की, ज्याने संघाला १०० टक्के मुस्लीम विरोधी, मुसलमानांचे जीवन धोक्यात आणणारा, सत्ता प्राप्त झाली असता मुसलमानांच्या कत्तली घडवून आणण्याची क्षमता असणारा (ज्याला इंग्रजी शब्दात ‘प्रोग्रोम’ म्हणतात.), अशा प्रकारे केलेली आहे. मोहनजींच्या वक्तव्यामुळे या सर्वांना २५ हजार ‘व्होल्टेज’चा शॉक बसला असावा. असे कसे काय घडू शकते? मोहनजी असे कसे काय बोलू शकतात? संघामध्ये १८० कोनात बदल होत चालला आहे का? अशी भन्नाट तर्कबाजी चालू आहे. म्हणून प्रथम मोहनजी काय बोलले हे बघूया. मोहनजी म्हणतात, “हिंदू-मुस्लीम एक आहेत, याचे कारण आपली मायभूमी एकच आहे. पूजनाची पद्धत वेगवेगळी असल्याने आपल्याला वेगळं करता येणार नाही. सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ हा एक आहे. भाषा, प्रदेश आणि इतर विषमता सोडून सर्व भारतीयांनी आता एक होण्याची आणि भारताला ‘विश्वगुरू’ बनविण्याची वेळ आलेली आहे. भारत ‘विश्वगुरू’ झाल्यावरच जग सुरक्षित होईल. एकही मुसलमान राहू नये, असं कोणी हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. गायीला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. पण, जे दुसर्‍यांना मारत आहेत, ते हिंदुत्वाविरोधात आहेत. अशांवर कायद्यानुसार कारवाई केली जावी.”
 
 
 
बेताल बडबड करण्याशिवाय ज्यांना राजकारणात काहीही काम उरलेले नाही, असे दिग्विजय सिंह म्हणतात, “सरसंघचालक आपले हे विचार विहिंप, बजरंग दल आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का? तसेच आपल्या शिष्यांना, प्रचारकांना, मोदी आणि शाह यांना देणार का? मोहनजी भागवत यांनी आपल्या शिष्यांना या विचारांचे पालन करण्यासाठी बाध्य केले तर मीही त्यांचा प्रशंसक होईन. तुम्ही हिंदू-मुस्लिमांत इतकी घृणा निर्माण केली आहे की, ती दूर करणं सोपी गोष्ट नाही.” दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य, वक्तव्यातील दिग्विजय करणारे नाही हे नक्कीच, उलट विश्वव्यापी संघटनेच्या प्रमुखाचे वक्तव्य समजून घेण्याची अक्कल आपल्यात नाही, हे मात्र त्यांनी प्रकट केले.
 
 
डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणातील “ ‘हिंदू-मुस्लीम एकता’ हा शब्दच भ्रम निर्माण करणारा आहे. हिंदू-मुस्लीम हे वेगळे नाहीच. कायमच एक आहेत. जेव्हा लोकं दोघांना वेगळं समजतात, तेव्हा संकट निर्माण होतं,” हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. हे वाक्य क्रांतिकारक वाक्य आहे, असे जर मी म्हटले, तर ती संघाची भाषा होणार नाही आणि दुसरा शब्द सुचत नसल्यामुळे हे वाक्य क्रांतिकारक वाक्य आहे, असचं म्हणावं लागेल. म्हणून ‘हिंदू-मुस्लीम ऐक्य’ या संबंधीचा यापूर्वीचा विचार काय आहे, हे थोडक्यात बघायला पाहिजे.
 
 
स्वातंत्र्य आंदोलनात अनेकांनी मुस्लीम धर्मतत्त्वज्ञान आणि इतिहास याचा अभ्यास केला. त्यात लाला लजपत राय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. वीर सावरकर, डॉ. राजेंद्र प्रसाद इत्यादी पहिल्या श्रेणीतील नेत्यांचा समावेश करावा लागतो. कमी अधिक फरकाने या सर्वांचे म्हणणे असे झाले की, हिंदू आणि मुसलमान यांच्यात ऐक्य करणारे समान बिंदू काही नाहीत. इस्लाम, मुसलमान पूर्व संस्कृती स्वीकारत नाहीत. तिच्याशी मुसलमानांशी नाते तोडून टाकतो. इस्लामच्या स्थापनेपासूनच मानव जातीचा इतिहास सुरू होतो, असे इस्लामचे म्हणणे आहे. हे अनेक विद्वानांनी आणि वर दिलेल्या राजकारणातील विद्वानांनी ग्रंथलेखनाने मांडलेले आहे. महात्मा गांधीजींचा मार्ग थोडा वेगळा होता. मुसलमान आपले लहान बंधू आहेत, त्यांना सामावून घेतले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. या सर्व भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळी भूमिका डॉ. मोहनजी भागवत यांनी मांडलेली आहे.
 
 
 
‘हिंदू-मुस्लीम ऐक्य’ या शब्दात हिंदू वेगळे आहेत, मुसलमान वेगळे आहेत आणि दोघांनी आपापले वेगळेपण जपत; पण ऐक्य करायचे आहे, असा याचा अर्थ होतो. दोन वेगवेगळ्या प्रवृत्तींचे ऐक्य हाच एक तात्त्विक भ्रम आहे. दोन प्रवृत्ती प्रथम वेगळ्या मानायच्या, त्या वेगळ्या कशा आहेत, हे प्रचंड युक्तिवाद करून पटवून द्यायचे आणि मग दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा. पाणी आणि तेल याचे मिश्रण कधी होत नाही. पाण्यावर तेल तरंगत राहतं, याचे वैज्ञानिक कारण आहे. परंतु, पाण्यात पाणी मिसळते. मुंबईचा विचार करता तानसाचे पाणी कुठले, भातसाचे कुठले, विहारचे कुठले, असा भेद करता येत नाही. मोहनजींना हे सुचवायचे आहे की, हिंदू-मुस्लीम असा भेदात्मक विचार न करता त्यांचा एकात्मिक विचार केला पाहिजे. भारतातील मुसलमान हे पूर्वीचे हिंदूच आहेत. मुंबई हायकोर्टाचे न्यायधीश एम. सी. छागला यांनी ही गोष्ट स्पष्टपणे मांडली होती. भारताचे सर्वाधिक लाडके राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम नमाजी मुसलमान असले, तरी श्रेष्ठ मुस्लीम हिंदू होते. भारतमातेची त्यांनी जी सेवा केली, ती अजोड आहे.
 
 
सर्वांना जोडणारा दुवा ‘भारतमाता’ आहे. आम्ही भारतमातेची संतान आहोत. आमच्या सर्वांची एक संस्कृती आहे. ती विसरता येत नाही. आजही सर्वसामान्य मुसलमानांच्या पारिवारिक संबंधांचा विचार केला, रीतीरिवाजांचा विचार केला, तर त्यात आणि हिंदू परिवारात जमीन-आसमानचे अंतर आहे असे आढळणार नाही. थोडे अंतर कोकणातील हिंदू परिवार आणि देशातील हिंदू परिवार यांच्या सणासुदीत, विवाह रीतीरिवाजात आपण पाहू शकतो, तेवढ्यामुळे दोघे जण वेगळे आहेत, असं होत नाही. हा ऐक्याचा धागा, वेगळ्या भाषेमध्ये दलवाई यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. ‘मुस्लीम सत्यशोधक चळवळी’च्या मार्फत मुसलमानांचे भारतीयत्व जागविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची चळवळ बहुजन मुसलमानांची झाली नाही, हे खरे असले, तरी विचार कधी मरत नसतात. योग्य काळ आला की, त्या विचाराचा प्रचार सुरू होतो.
 
 
 
सध्याचा कालखंड हा हिंदू-मुसलमान परस्परांपासून भिन्न कसे हे सिद्ध करण्याचा कालखंड नाही. परस्परांत भावनिक संबंध कसे निर्माण होतील, याकडे लक्ष देण्याचा आहे. आणीबाणीनंतर बाळासाहेब देवरसांनी हा विषय सुरू केला. ‘जमाती इस्लामी’चे अनेक कार्यकर्ते ‘मिसा’खाली स्थानबद्ध झाले. कारागृहात बहुसंख्या संघ स्वयंसेवकांची होती. तेव्हा या ‘जमाती इस्लामी’च्या कार्यकर्त्यांच्या मनात भीती निर्माण झाली की, आपले कसे होईल? पण, महिन्याभरात त्यांना अनुभव असा आला की, संघाची जी प्रतिमा आपल्या मनात निर्माण केली, तो संघ आणि प्रत्यक्षातील संघ यात जमीन-आसमानचे अंतर आहे. कुठलाही भांडणतंटा न होता, प्रेमाने सर्व कार्यकर्ते एकत्र राहिले. हा अनुभव सांगून बाळासाहेब सांगत की, “आपण एकमेकांच्या सण आणि उत्सवांत सामील झाले पाहिजे, एकमेकांच्या घरी गेले पाहिजे. दुरावा कमी केला पाहिजे.”
 
 
 
मुस्लीम मनाचा शोध घेणारे हा विचार स्वीकारू शकत नाहीत आणि हिंदू आणि मुसलमान हे ‘डीएनए’ने एक आहेत, हेदेखील त्यांना मान्य होण्यासारखे नाही. अशा एकाशी चर्चा करीत असताना मी त्यांना म्हटले की, “तुम्ही विश्लेषणतज्ज्ञ आहात आणि आम्ही समस्या निवारणतज्ज्ञ आहोत.” डॉ. हेडगेवारांनी स्वच्छ शब्दांत सांगितले की, “अज्ञानी चर्चा करतात, ज्ञानी वागतात.” मुसलमान कधीही भारतभक्त होऊ शकत नाहीत आणि हिंदूंशी शत्रुत्व सोडू शकत नाहीत, हे एकदा स्वीकारले की, दोन पर्याय राहतात. मुसलमानांना मुसलमान म्हणून राहू द्यायचे नाही हा एक पर्याय आणि दुसरा पर्याय आपली सनातन संस्कृती सर्वसमावेशक आहे, असे सांगणे सोडून द्यायचे. या दोन्ही गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत. आपण अगस्तीचे पुत्र आहोत. ज्याने एका आचमनात समुद्र प्राशन करून टाकला आणि आपण अगस्तीचे पुत्र आहोत, ज्या अगस्तीने वातापी नावाच्या नरराक्षसाला आपल्या पोटात जिरवून टाकले. सगळेच आपले आहेत आणि सगळ्यांना जवळ करायचे आहे, यासाठी जी पाचकशक्ती लागते, ती निर्माण करण्याचे कार्य डॉ. हेडगेवारांच्या संघाने केले आहे आणि म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने डॉ. मोहनजी भागवत हे सांगतात की, “आमच्या सर्वांचा ‘डीएनए’ एक आहे. आम्ही सर्व एका मातृभूमीचे पुत्र आहोत.” म्हणून आपण सर्वांनी मिळून भारतमातेच्या जयजयकाराचाच घोष केला पाहिजे. ही या देशाच्या ऐक्याची वाटचाल आहे. ज्यांना याचे पथिक व्हायचे आहे, त्यांचे स्वागत आहे आणि ज्यांना दूर राहायचे आहे त्यांच्याविषयी मनात कोणतीही अढी नाही. कारण, डॉक्टर सांगून गेले, “आपले कार्य सर्वांवर प्रेम करण्याचेच आहे!”
 
 
@@AUTHORINFO_V1@@