‘आत्मघातकी दहशतवाद‘ अभ्यासण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2021   
Total Views |

book_1  H x W:
 
 
‘आत्मघातकी दहशतवाद’ या पुस्तकात आत्मघातकी हल्ल्यामुळे समाजाच्या एकूण आत्मविश्वासावर त्याचे होणारे परिणाम, याचाही आढावा घेण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच आत्मघातकी हल्ल्यांच्या मर्यादाही लेखिका अधोरेखित करते. पण, लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करणे, बस-रेल्वेसारख्या सार्वजनिक प्रवासी साधनांचा वापर टाळणे, हे निश्चितच आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यांचे दुष्परिणाम असतात. आत्मघातकी हल्ला करण्यास प्रवृत्त होणार्‍या संबंधित अतिरेक्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्नही कशा प्रकारे केले जातात, याचेही वर्णन या पुस्तकात आहे.
 
 
 
‘आत्मघातकी दहशतवादी‘ किंबहुना ‘मानवी बॉम्ब‘ असं म्हटलं की, आपल्याला राजीव गांधी यांची हत्या आठवते. फार तर अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर झालेला हल्ला आठवतो. परंतु, ‘आत्मघातकी दहशतवाद’ या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. जगभरात आत्मघातकी स्वरूपाचे हल्ले प्रामुख्याने कुठे, कसे झाले, त्या सगळ्याचा तपशीलवार आढावा घेण्याचा प्रयत्न रूपाली भुसारी यांनी त्यांच्या ‘आत्मघातकी दहशतवाद‘ या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडला आहे.
 
‘संरक्षणशास्त्र’ ही ज्ञानशाखा आजही आपल्याकडे सर्वसाधारण अभ्यासक्रमाचा विषय नाही. सैन्यदलातील किंवा विशेषत्वाने संरक्षण नीतीशी संबंध येणार्‍यांनी आजवर या विषयाचा अभ्यास केला. त्यामुळे अंतर्गत सुरक्षितता, देशाच्या सार्वभौमत्वासमोरील आव्हाने असे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे तर खूप दूरच! ‘आत्मघातकी दहशतवाद’ यासारख्या पुस्तकांमुळे हे विषय आता सर्वसामान्यांपर्यंत व त्यातही मराठी वाचकांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच या पुस्तकाला ‘विशेषज्ञ‘ (Specialized) पुस्तक म्हणावे लागेल. कारण, हे पुस्तक ढोबळमानाने सर्वसाधारण दहशतवाद किंवा अंतर्गत सुरक्षा अशा अमर्याद विषयाकरिता लिहिलेले नाही, तर हे पुस्तक ‘दहशतवाद आणि आत्मघातकी स्वरूपाचे हल्ले’ या एका विशिष्ट विषयाचा सखोल आढावा घेणारे पुस्तक आहे. मराठी भाषेत संशोधनपर, विविध ज्ञानशाखांचा मागोवा घेणारी पुस्तके फारशी सापडत नाहीत. ‘आत्मघातकी दहशतवाद’ सारखी पुस्तके ती उणीवही भरून काढतात.
 
 
या पुस्तकात आत्मघातकी हल्ल्यांसाठी कुटुंबाचा वापर होणे, लहान मुलांचा वापर करणे, अशी अनेक उदाहरणे नमूद केली आहेत. दहशतवादी संघटना अशा स्वरूपाच्या हल्ल्यांसाठी आवश्यक असणारे लोक कशाप्रकारे भरती करतात, याचाही संदर्भासहित ऊहापोह पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. ‘फताह’ या दहशतवादी संघटनेच्या एका सदस्यापासून अविवाहित असताना गर्भवती राहिलेली अखरास अल अयात नावाची तरुणी इस्रायलमध्ये अब्रू वाचविण्यासाठी, समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी कशाप्रकारे आत्मघातकी हल्ला चढवण्याची पळवाट शोधते, अशी उदाहरणे थक्क करणारी आहेत. परंतु, त्यानंतर अखरासच्या दहशतवादी बनण्याला इस्रायली सैन्याकडून झालेल्या कारवायाच कशा जबाबदार आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्नही झाला. आत्मघातकी हल्ल्यांमध्ये स्त्रियांचा वाढलेला वापर तसेच लहान मुलांना ‘मानवी बॉम्ब‘ बनवून पाठवणे, अशी अनेक उदाहरणे पुस्तकात नमूद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, पुस्तक केवळ घटनाक्रमाचा इतिहास विशद करत नाही. तसेच अमुक ठिकाणी, अमुक तारखेला, अशाप्रकारे आत्मघातकी हल्ला झाला, इतकी माहिती देऊन लेखिका थांबत नाही, तर अशाप्रकारे आत्मघातकी हल्ले करणार्‍या दहशतवाद्यांची मानसिकता काय असते, त्यामागे प्रेरणा कोणती असते, त्यामागील कारणे काय होती, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. तसे करीत असताना त्यांनी ‘सर्वसाधारण‘ (Generalized) दृष्टिकोन बाळगलेला नाही, तर एखाद्या आत्मघातकी हल्ल्यात वापरण्यात आलेला अतिरेकी संबंधित हल्ल्यासाठी कशामुळे प्रवृत्त झाला, या अनुषंगाने विविध सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपास, विश्लेषणाचा संदर्भ रूपाली भुसारी यांनी घेतला आहे. म्हणूनच विषय समजून घेण्याच्या, अभ्यासण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची उपयुक्तता वाढते.
 
 
‘आत्मघातकी दहशतवाद’ या पुस्तकात आत्मघातकी हल्ल्यामुळे समाजाच्या एकूण आत्मविश्वासावर त्याचे होणारे परिणाम, याचाही आढावा घेण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच आत्मघातकी हल्ल्यांच्या मर्यादाही लेखिका अधोरेखित करते. पण, लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करणे, बस-रेल्वेसारख्या सार्वजनिक प्रवासी साधनांचा वापर टाळणे, हे निश्चितच आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यांचे दुष्परिणाम असतात. आत्मघातकी हल्ला करण्यास प्रवृत्त होणार्‍या संबंधित अतिरेक्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्नही कशा प्रकारे केले जातात, याचेही वर्णन या पुस्तकात आहे. परंतु, त्याविषयीचे वर्णन करीत असताना लेखिकेने तटस्थ दृष्टिकोन बाळगलेला दिसतो. त्याविषयी कोणतीही भूमिका मांडत नाहीत. मात्र, वाचकाला त्यातून योग्य तो बोध होतो.
 
एकविसाव्या शतकात जशा अनेक पद्धती बदलल्या, तसे दहशतवादाचे पारंपरिक स्वरूपही बदलते आहे. दहशतवाद्यांनी आपली कार्यपद्धती अलीकडल्या काळात चलाखीने बदलल्याचे दिसून येईल. दहशतवाद्यांच्या या नवनवीन बदलामागे आधुनिक काळातील कायदे, गुप्तचर यंत्रणा व तपास यंत्रणांचे आव्हान विचारात घेऊन आखलेली एक रणनीती असते. दहशतवादी कसे विचार करतात, त्यांच्या संघटना कसे काम करतात, याविषयी अभ्यास करायला जगभरात थोडा उशीर झाला, असे म्हणावे लागेल. जगभरातल्या सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी दहशतवादाची उकल करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत या दहशतवाद्यांनी आपला चेहरामोहरा बदलून टाकला आहे. सुरुवातीच्या काळात छोटे-मोठे बंडखोर, त्या त्या देशातील अंतर्गत प्रश्नांमुळे निर्माण झालेली सुरक्षाविषयक आव्हाने, अशा मर्यादित दृष्टिकोनातून दहशतवादाचे आकलन केले जात असे. दहशतवाद हा जागतिक प्रश्न आहे, हे स्वीकारण्यात जगाला बराच उशीर झाला. त्यातही दुसर्‍या महायुद्धानंतर नव्या जगाची निर्मिती होत असताना, अनेक ठिकाणी प्रादेशिक, जन्माच्या आधारांवर अन्याय झाले आणि त्या अन्यायाच्या प्रतिक्रिया म्हणून प्रारंभीच्या काळात या दहशतवादी कारवायांकडे पाहिले गेले. इस्लामिक दहशतवादाने ही व्याख्या बदलली. कारण, केवळ मुसलमानांवर अन्याय होतात आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून आपण अतिरेकी कारवाया करतो, इथपर्यंत इस्लामिक दहशतवादाची संकल्पना मर्यादित नाही, तर इस्लामिक दहशतवादाची प्रेरणा ही परिस्थितीजन्य कारणे नसून धार्मिक आहे. परंतु, सदर पुस्तक केवळ इस्लामिक दहशतवादापुरते मर्यादित नाही. जगभरातील बहुतांशी प्रमुख दहशतवादी गटांचा संदर्भ पुस्तकात आला आहे. त्यामुळे ‘दहशतवाद’ या विषयाचा अभ्यासही नव्या दृष्टिकोनातून करण्याची गरज होती. रूपाली भुसारी यांनी लिहिलेल्या ‘आत्मघातकी दहशतवाद’ या पुस्तकाने ती गरज काही अंशी पूर्ण केली, असे म्हणावे लागेल.
 
 
पुस्तकाचे नाव : आत्मघातकी दहशतवाद
लेखिका : रूपाली भुसारी
प्रकाशक : वरदा प्रकाशन
पृष्ठसंख्या : २३५
मूल्य : ३०० रु.
 
 
@@AUTHORINFO_V1@@