नाशिक : शहर पोलिसांनी प्रस्तावित केलेल्या ’नो हेल्मेट, नो पेट्रोल’ योजनेत हेल्मेटशिवाय इंधन देऊ नये, असे म्हटले होते. पोलिसांच्या या निर्णयावर पेट्रोलपंप संघटनेच्यावतीने आक्षेप घेण्यात आल्यावर आता दि. १५ ऑगस्टपासून प्रत्येक पेट्रोलपंपावर पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त दीपक पांडेय आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात एकत्रित बैठक झाली. या बैठकीत संघटनेने पेट्रोलपंप चालकांच्या अडचणी मांडल्या. जिल्ह्यात एकूण ४५० पेट्रोलपंप असून ते संघटनेचे सभासद असून यातील ७० टक्के वितरकांचे शहरात पेट्रोलपंप आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीत ऑगस्ट २०२१ पासून ’नो हेल्मेट, नो पेट्रोल’ योजना प्रस्तावित आहे.
हेल्मेट वापराबद्दलची ही योजना चांगली आहे, पण त्यात विनाहेल्मेट वाहनचालकांना पंपचालकाने इंधन दिल्यास त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पोलीस यंत्रणेने संघटनेशी कुठलीही चर्चा केलेली नाही म्हणून ही योजना एकतर्फी पंपचालकांवर लादली जात असल्याचा आक्षेप संघटनेने घेतला होता. दरम्यान, बैठकीत पदाधिकार्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यात योजनेस विरोध नाही केला.
यावेळी वेगवेगळ्या अडचणी आणि शंकांविषयी चर्चा झाली. पोलीस आयुक्तांनी पेट्रोलपंप चालक, कर्मचारी यांच्या संरक्षणाची हमी घेत ही योजना अंमलात आणण्यात येईल, असेदेखील सांगितले असल्याने पेट्रोलपंप चालकांनी संमती दिली. बैठकीस पोलीस उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक आयुक्त नवलनाथ तांबे, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विजय ठाकरे, जिल्हाध्यक्ष भूषण भोसले आदी उपस्थित होते.