बोरिवली नॅशनल पार्कमधील 'मस्तानी'चा मृत्यू; पाच महिन्यांमध्ये ५ प्राण्यांचा मृत्यू

    29-Jul-2021   
Total Views |
tiger_1  H x W:

 उद्यानाला निवासी पशुवैद्यकाची गरज


मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या व्याघ्र विहारातील 'मस्तानी' नामक वाघिणीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये राष्ट्रीय उद्यानाच्या पिंजराबंद अधिवासातील पाच प्राण्यांचे अचानक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे उद्यानातील पिंजराबंद अधिवासातील प्राण्यांची काळजी घेण्यासाठी निवासी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची आवश्यकता आहे.
 
 
राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारी ही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, गेल्या आठवड्यात या सफारीतील प्रसिद्ध वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सफारीमधील वाघांची संख्या वाढवण्याबरोबर प्रजननासाठी जुलै, २०१६ मध्ये याठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यानातून दोन वाघिणी आणण्यात आल्या होत्या. त्यामधील साधारण १३ वर्षांच्या 'मस्तानी' वाघिणीचे गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी आकस्मिक निधन झाले. उद्यानातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दि.१४ जुलै रोजी 'मस्तानी'ने काही न खाल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तिला १०६ डिग्री ताप असल्याचे निषन्न झाले. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गुरुवार दि.१५ जुलै रोजी संध्याकाळी ती अताव्यस्थ झाली आणि तिचा मृत्यू झाला.
 
 
 
त्यानंतर 'मस्तानी'चे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये तिच्या गर्भाशयामध्ये गाठी तयार झाल्याचे दिसून आले आणि त्याठिकाणी कफ तयार झाल्याचे आढळले. शिवाय अशक्त अवस्थेत मांस खाण्याचा प्रयत्न केल्याने तिच्या गळ्यामध्ये मांसाचा तुकडाही अडकल्याचे शवविच्छेदन तपासणीवेळी दिसून आले. वन्यजीव हे आपल्याला झालेल्या व्याधींची लक्षणे लवकर दाखवत नाहीत. कारण, तसे केल्यास त्यांना शिकारी प्राण्यांपासून धोका असतो. व्याधीच्या शेवटच्या टप्प्यावर ते रोगाची लक्षणे दाखवतात. मस्तानीबरोबरच व्याघ्र सफारीतील सर्वात जुन्या 'बसंती' वाघिणीचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 'बसंती'चा मृत्यू हा वृद्धापकाळाने झाल्याचे माहिती मिळाली आहे. 'बसंती' आणि 'मस्तानी'च्या आकस्मिक मृत्यूमुळे आता राष्ट्रीय उद्यानात पाच वाघांचा अधिवास राहिला आहे. यामध्ये 'मस्तानी'सोबत पेंच मधून आणलेल्या 'बिजली' वाघिणीसह नागपूरहून आणलेली 'दुर्गा' आणि बसंतीची मुलगी 'लक्ष्मी' वाघिणीचा समावेश आहे. तर नरांमध्ये 'बाजीराव' आणि 'सुलतान' हे दोन नर आहेत.
 
 
 
पाच महिन्यात पाच प्राण्यांचा मृत्यू
 
गेल्या पाच महिन्यांमध्ये राष्ट्रीय उद्यानाच्या पिंजराबंद अधिवासातील पाच प्राण्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यामध्ये बिबट्या निवारा केंद्रातील दोन बिबटे, सिंह सफारातील एक मादी सिंह आणि व्याघ्र सफारीतील दोन वाघिणींचा समावेश आहे. सध्या राष्ट्रीय उद्यानात पिंजराबंद प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पूर्ण वेळ निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नाही. उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार डाॅ. शैलेश पेठे यांच्याकडे आहे. त्यामुळे पिंजराबंद अधिवासातील प्राण्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी उद्यानामध्ये निवासी पशुवैद्यक असणे आवश्यक आहे. वन विभागाअंतर्गत पशुवैद्यकांच्या भरतीचा प्रस्ताव अजूनही रखडलेला आहे. या पदांची भरती मार्गी लावून राष्ट्रीय उद्यानामध्ये पूर्ण वेळ निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नेमणे या प्राण्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे गरजेचे झाले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.