दरडींची दहशत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2021   
Total Views |

landslide_1  H
 
 
गेल्या काही दिवसांत पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आणि पुराबरोबरच दरडी कोसळण्याच्या घटनांनी अख्खी गावंच्या गाव माळीणसारखीच क्षणार्धात होत्याची नव्हती झाली. मुंबईसारख्या महानगरातही अजून दरडींचा धोका कायम आहे. हा एकूणच घटनाक्रम आणि संभाव्य उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
 
मोसमी पावसाच्या तीव्रतेमुळे महाराष्ट्रातील १.३५ लाखांपेक्षा अधिक लोकांना बेघर केले आहे. सातारा, मुंबई उपनगरे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, ठाणे, पालघर, सांगली आणि रत्नागिरी येथे अनेक नागरिकांची सुटका करून त्यांना सुखरूप स्थळी हलविण्याची व्यवस्था करावी लागली आहे. दरडी कोसळून अनेक घरांची पडझड झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ११२ वर पोहोचला आहे. सततच्या व मुसळधार पावसामुळे सर्वात जास्त ५२ मृत्यू हे एकट्या रायगड जिल्ह्यातील आहेत आणि तेथे डझनहून जास्ती दरडी कोसळल्या आहेत आणि ८७५ गावांमधील लोक बेघर होऊन ९९ माणसांचा शोध अद्याप लागलेला नाही, अशी प्राथमिक माहिती समजते.
 
 
 
राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेकडून या अडकलेल्या लोकांच्या सुटकेकरिता रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांकरिता सरकारकडून प्रत्येकी दोन कोटी व इतर जिल्ह्यांसाठी ५० लाखांचा निधी उभा केला आहे. ‘राष्ट्रीय आपत्काल प्रतिसाद व्यवस्थापन’ (एनडीआरएफ)चे आता काम पुष्कळ वाढल्यामुळे २६ वरून ३४ बचाव पथके केले गेले आहेत. मुंबई महापालिकेनेसुद्धा दोन बचाव पथके रायगड व कोल्हापूरला पाठविली आहेत. प्रत्येक बचाव पथकाबरोबर मदतकार्याकरिता एक फिरती व्हॅन, चार पाण्याचे टँकर, एक वाहने ओढणारी लॉरी, दुरुस्ती मशीन व ७५ घनकचरा विभागातील पालिका कर्मचारी यांचा समावेश आहे. शिवाय राज्य सरकारची आपत्कालीन संस्थेची दोन बचाव पथके, नौदल, सैन्यदल, कोस्ट गार्ड व बचाव पथके, ‘एनडीआरएफ’कडून ५९ बोटी रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर व सांगली भागात मदतीला गेले होते. यापूर्वी मुसळधार पावसामुळे आतापर्यंत घरे व पूल पडत होते. आता विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांमध्येही वाढ झालेली दिसते.
 
 
 
रायगड, सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात अनेक घरे मातीखाली गेली. तसेच मृत झालेले अनुक्रमे ५३, १८ व तीन तर बेपत्ता झालेले लोक अनुक्रमे ४३, २२ व १७ आहेत. दूधसागर रेल्वेमार्गावर दरड कोसळली आहे. महाडमध्ये दरड कोसळली आणि ३२ घरांमधील अनेक जण मातीच्या ढिगार्‍याखाली गेले.
 
 
कळव्याला दरड कोसळून दोन जखमी झाले व पाच माणसांचा बळी गेला.
 
 
पुण्यातील एका गावातील दरड कोसळून ३२ घरे मातीखाली गेली व ४९ माणसे मृत्यू पावली.
 
 
खारघर टेकडीवर दरड कोसळल्याने ११६ जणांची सुटका करावी लागली.
 
 
तसेच मुंबईच्या कडेकपारीतील संकटग्रस्त झोपड्यांतील वस्त्यांमधून अनेकांना सुखरुप स्थळी स्थलांतरीत करण्यात आले.
 
 
मुंबईत दरडीचा धोका असलेल्या एकूण २९९ झोपडपट्ट्यांच्या वस्त्या आहेत, त्यापैकी ६० धोकादायक, २० अतिधोकादायक, १८७ कमी धोकादायक व ६२ धोका नसलेल्या ठिकाणांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात माहुल व विक्रोळी येथे दरडी कोसळल्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला व या सर्व ठिकाणांचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून सर्वेक्षण केले गेले. भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाचीही त्यासाठी मदत घेतली गेली. २०१९ मध्ये या ठिकाणांची पाहणी करून त्यांनी आपला अहवाल सादर केला होता.
 
 
या सर्वेक्षणात डोंगरउतारावर वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या जमिनीची प्रत, जमिनीच्या उताराची मजबुती, संबंधित जमिनीवर असलेल्या दगड-खडकांचे प्रमाण, २००६ ते २०१६ या काळातील पावसाचे प्रमाण, अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची माहिती इत्यादी बाबींचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला होता. त्यावर उपाययोजनाही सुचविण्यात आल्या होत्या. २० अतिधोकादायक वस्त्या भांडुप, विक्रोळी पार्क साईट, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, जोगेश्वरी आणि चेंबूर या ठिकाणी आढळल्या. डोंगर उतारावरच्या वस्त्यांना अतिधोका आहे. सर्वात जास्त ठिकाणे घाटकोपरला आहेत, त्या खालोखाल भांडुपला व उर्वरित ठिकाणे शिवडी, अंधेरी प., कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, मुलुंड व मालाडमध्ये आहेत.
 
 
पालिकेचे अधिकार मर्यादित
 
 
याबाबत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, “दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असलेल्या वस्त्या बहुतांशी सरकारी जमिनीवर वा ‘म्हाडा’च्या जमिनीवर आहेत. अशा ठिकाणी मुंबई महापालिकेला कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या वस्त्यांना आम्ही नोटीस देतो. तेथे पोहोचणे अवघड होऊ नये म्हणून या ठिकाणांचा आढावाही घेतला जातो. या वस्तीतील लोकांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. अन्य संबंधित प्राधिकरणांबरोबर बैठका घेऊन त्यांना आम्ही योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही देत राहतो.”
 
 
दुर्घटनाग्रस्त बेघर वार्‍यावर...
 
 
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. या वर्षी अशा घटना तुलनेने जास्त घडल्याचे आकडेवारीवरुन दिसते. अशा दुर्घटनांमुळे वस्तीमधील नागरिक बेघर होतात. सुरुवातीला त्यांचे तात्पुरते पुनर्वसन होतेही. पण, नंतर त्याच जागी वा परिसरात पक्की घरे बांधली जावीत, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे धोरण आहे. या आधीच्या दरडग्रस्तांची पक्की घरे केवळ कागदावरच राहिली आहेत. दरड कोसळल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांसाठी महापालिकेचे धोरण योग्य असले तरी ‘एमएमआरडीए’चे त्याकरिता सहकार्य घेतले जाते. यासंबंधीच्या एका अहवालात शहरात ३८, पूर्व उपनगरात २१९ व पश्चिम उपनगरात ३३ दरडप्रवण क्षेत्रे आहेत. शीव येथील रावळी टेकडी, डॉकयार्ड रोड स्टेशन जवळची भंडार टेकडी या भागांतही शेकडो नागरिक टेकडी उतारावर वा पायथ्याशी जीव मुठीत धरून जगत आहेत. हा भाग दरडप्रवण असल्याने त्यांना पावसाळ्याच्या पूर्वी पालिकेकडून जागा रिकामी करण्याच्या नोटिसा येतात. पक्की घरे मात्र अजून होत नाहीत.
 
 
मुंबईत याआधी मोठी दरड घाटकोपर पश्चिमेला टेकडी उतारावर कोसळली होती. त्यात ७८ जणांचे बळी गेले होते. या दरडग्रस्तांना टेकडीच्या दुसर्‍या भागात नंतर जागाही दिली गेली. आर्थिक मदतही केली गेली. पण, अजून तेथे बांधलेली घरे कच्च्या स्वरुपाची आहेत.
 
 
मुंबई शहर व उपनगरे मिळून २४ वॉर्डांमधील २१ विभागांत दरडी कोसळण्याची अशी एकूण २९१ ठिकाणे आहेत. त्यापैकी भांडुप, विक्रोळी, साकीनाका खाडी नंबर दोन, कुर्ला, मलबार हिल येथे सर्वाधिक दरडप्रवण क्षेत्र आहेत. या डोंगरउताराच्या परिसरात एक लाखांहून अधिक लोकांची वस्ती झाली आहे.
 
 
धोकादायक विभाग व दरडीची ठिकाणे खालीलप्रमाणे
 
 
‘एस’ वॉर्ड भांडुप (१५२), ‘एन’ वॉर्ड घाटकोपर (३२), ‘एल’ वॉर्ड कुर्ला (१८), ‘डी’ वॉर्ड ग्रँट रोड (१६), ‘पी उत्तर’ वॉर्ड (११), ‘एम पूर्व’ वॉर्ड चेंबूर (११), ‘जी दक्षिण’ वॉर्ड वरळी (१०), ‘एफ दक्षिण’ वॉर्ड परळ (७)
 
 
मुंबईत १७९ ठिकाणी संरक्षक भिंतींच्या उभारणीचे काम
 
 
पावसाळ्यात दरड कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून ‘म्हाडा’च्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडून डोंगर उतारावरील धोकादायक भागालगत संरक्षक भिंती उभारण्यात येत आहेत. या वर्षी पूर्व व पश्चिम उपनगरांत ५२ ठिकाणी अशा संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत आणि सध्या १७९ ठिकाणी भिंती बांधण्याचे काम सुरू आहे. ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे व सतर्क राहण्याचे आदेश मंडळाच्या मुख्य अधिकार्‍यांनी संबंधित अभियंत्यांनादेखील दिले आहेत. चेंबूर व घाटकोपरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आदेश दिले आहेत. चालू वर्षासाठी जिल्हा नियोजन व आणि विकास मंडळाकडून या कामाकरिता पूर्व उपनगरासाठी रु. २५ कोटी व पश्चिम उपनगरासाठी रु. ३३ कोटी ६० लाख निधी मंजूर झाला आहे.
 
‘एमएमआरडीए’कडून पश्चिम महामार्गावरील दरड कोसळण्याला प्रतिबंध म्हणून भूस्खलन रोखण्याकरिता बंदोनगरी हिलजवळ रु. १३ कोटींची संरक्षक भिंत उभारणीचे काम होणार आहे.
 
 
 
टेकडीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
 
 
 
दरड कोसळण्याची दुर्घटना घडल्यास नेमका कुठे संपर्क साधावा, याची फारशी नागरिकांना माहिती नसते. तर अशा नागरिकांना पुढील काही क्रमांकावर संपर्क साधता येतील - मनपा मुख्यालय नियंत्रण कक्ष (१९१६), पोलीस (१००), अग्निशमन दल (१०१), रुग्णवाहिका (१०८), विभागीय नियंत्रण कक्ष ०२२-२३८६४०००.
 
 
मुंबई महानगरपालिकेने काय खबरदारी घ्यावी?
 
 
मुंबई महापालिकेने जोरदार पावसावेळी सतर्क राहून दरड कोसळण्यापासून तेथे राहणार्‍या नागरिकांचे जीव वाचविण्याकरिता संरक्षण भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
 
 
दरडींच्या विषयाव्यतिरिक्त मान्सूनपूर्वीची इतर महत्त्वाची कामे मुंबई महापालिकेने तेजीने पूर्णकरावीत.
 
 
मिठी नदीवरील धावपट्टी धोकादायक
 
 
नदीचा मार्ग बदलून पुलाची उभारणी केली आहे. तसेच २०० मी. रुंदी ५० मी.पर्यंत कमी केली आहे. परंतु, त्यावर रोज विमानाचा हजारो टनांचा भार दिला जात आहे. तसेच विहार व पवई तलावांचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यावर सोडलेल्या पाण्याने मिठी नदीला पूर येतो. काही क्रांतिनगरसारख्या घरांमध्ये दरवर्षी पाणी शिरते. हे सोडलेले पाणी दुसरीकडे वळवायला हवे. नदीवरचा पूलसुद्धा धोक्याचा झाला आहे. त्यावर उपाययोजना शोधायला हवी.
 
 
भांडुप पेयजल प्रक्रिया केंद्र धोकादायक अवस्थेत
 
 
मुंबईच्या जलपुरवठ्यात बाधा येऊ नये म्हणून भांडुप कॉम्प्लेक्समधील तुंबई टाळण्याकरिता पालिकेने ठरवल्याप्रमाणे सभोवार ड्रेनेज व संरक्षक भिंती बांधण्याची व्यवस्था ताबडतोब करायला हवी. एकूणच अशा दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडून जीवितहानी आणि वित्तहानी होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने तसेच राज्य सरकारनेही तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@