महाराष्ट्रातील संतांनी भूतदया पाळावी, असा संदेश दिला आहे. संतांच्या काळात त्याचे लोक अनुकरण करीत होते. आजच्या काळात डोंबिवलीतील डॉ. मनोहर अकोले संतांनी दिलेला संदेश केवळ ऐकत नसून त्यांनी तो कृतीत आणला आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश.
माजी शिक्षणमंत्री मधुकर असोदे यांच्या गावातीलच डॉ. मनोहर आहेत. त्यांची सर्व जडणघडण त्याच गावात झाली. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील शिरोदा या गावी झाला. शिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयामध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जुन्या काळातील एसएससी केली होती. अमळनेर येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. मेडिकलला जायचे असे त्यांनी ठरविले होते. नांदेड येथे आयुर्वेदिक महाविद्यालय होते. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मनोहर हे मुंबई येथे आले. मुंबईतही त्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळाला नाही.
पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या यादीत डॉ. मनोहर यांचे नाव आले खरे, पण मुंबईला जाऊन आल्यावर मेडिकलला नंबर लागला नाही, त्यामुळे ते निराश होते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या यादीत ‘टॉप फाईव्ह’मध्ये त्यांचा नंबर होता. घरी त्यांनी याविषयी कोणालाच काही सांगितले नव्हते. त्यांच्याच गावातील एका मुलाने त्याच वर्षी पशुवैद्यकीयचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याने मनोहर यांना पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळू शकतो, असे त्यांच्या घरी सांगितले होते. त्यामुळे मनोहर यांनादेखील आपल्याला यादीत नाव लागल्याचे घरी सांगावे लागले. घरी ही गोष्ट समजताच डॉ. मनोहर यांना त्यांचे काका पुन्हा मुंबईला घेऊन आले. डॉ. मनोहर हे शेतकरी कुटुंबात वाढले असल्याने त्यांना प्राण्यांविषयी जिव्हाळा होता. ही गोष्ट त्यांच्यासाठी ‘प्लस पॉईंट’च ठरली होती.
आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाच्या मुंबई पशुवैद्यक विद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. त्याकाळात ते वसतिगृहात राहत होते. गुरांचे डॉक्टर या क्षेत्राकडे विद्यार्थी फारसे वळत नव्हते. सरकार हा अभ्यासक्रम शिकणार्या विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन देत होते. डॉ. मनोहर यांची पहिली बॅच होती. त्यामुळे त्यांना विद्यावेतन मिळाले नव्हते. डॉ. मनोहर यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याकाळात त्यांना 75 रूपयांची शिष्यवृत्ती मिळत होती. डॉ. मनोहर यांच्या घरातूनही त्यांना पशुवैद्यक होण्यासाठी सकारात्मक पाठिंबा होता. गावातील ते दुसरे पशुवैद्यक होते.
गरीब माणसाने मुंबईला जाणे खूपच मोठी गोष्ट होती. त्यावेळी डॉ. मनोहर यांनी मुंबईला येऊन शिक्षण पूर्ण केले. ते एकत्र कुटुंबात लहानाचे मोठे झालेले होते. त्यांचे काकाही मुंबईत सोबत राहिले. कारण, मनोहर पुन्हा गावी परततील, अशी त्यांना भीती होती. पदवीनंतर शल्यविशारदमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण लगेचच पूर्ण केले. डॉ. के. एस. देशपांडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. घरातून त्यांना 100 रुपयांची मनीऑर्डर येत होती. त्यावेळी खानावळीचा खर्च 60 रूपये होता. तोही त्यांना न परवडणारा होता. त्यामुळे एका साध्या खानावळीतून 30 रूपयांमध्ये जेवण मिळत होते. कोणता इलाज नसल्याने डॉ. मनोहर तिकडून जेवण घेत होते.
पदव्युत्तर शिक्षण घेताना कुठे नोकरी मिळते का, हे पाहत होते. डॉ. मनोहर यांचे एक डॉक्टर मित्र होते. त्यांना सुरतला ‘डेअरी फार्म’ काढायचे होते. त्यांच्या मार्गदर्शनासाठी मनोहर यांची निवड करण्यात आली होती. दर आठवड्याला मनोहर त्याठिकाणी जात. शुक्रवारी जाऊन सोमवारी पुन्हा सकाळी कॉलेजसाठी परतत यायचे. देशी गाईंचा हा फार्म होता. त्यांनी एक इंग्लिश वळू स्वीडनमधून आणला होता. त्यांची प्रजोत्पत्ती करून नवीन फार्म तयार करायचा होता. त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याचे काम मनोहर करीत होते. मनोहर यांना 125 रूपये मिळत होते. 25 रूपये प्रवासासाठी खर्च येत होता. 75 रूपयांची शिष्यवृत्ती मिळत होती. 175 रूपयांत त्यांना दिवस काढावे लागत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरतचे काम सुरूच होते. फेर्या थोड्या नंतरच्या काळात कमी झाल्या. पण पुढे काय करायचे, हा विचार त्यांच्या मनात घोळत होता.
डॉ. सातारकर हे इन्शुरन्स कंपनीत काम करीत होते. माणसाचा विमा असतो तसा पशु आणि गुरांचा विमा असावा. त्यांना पशुवैद्यक डॉक्टर बरोबर घ्यावा लागत होता. इथे मनोहर यांना वेतन फारच तुंटपुजे होते. 1977 मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यानंतर डोंबिवलीत एका छोट्या घरात ते राहायला आले. ऑफीसमधून आल्यावर सायंकाळचा वेळ त्यांच्या हातात होता. त्या वेळेत प्राण्यांची तपासणी करीत असे. क्लिनीक वगैरे नव्हते. कदम यांच्याकडे इंग्लिश कुत्रे आले. त्यानंतर पशुवैद्यकाविषयी थोडी जनजागृती होऊ लागली. मनोहर यांनी डोंबिवलीत क्लिनीक सुरू केले. डोंबिवलीतील ते पहिले पशु क्लिनीक होते. आता आठ ते दहा क्लिनीक आहेत. त्यांच्या पत्नी संध्या बी.ए., बी.एड झाल्या होत्या. त्या घरी क्लासेस घेत होत्या. त्यांनी लग्नानंतर बी.एडचे शिक्षण पूर्ण केले. मनोहर यांना दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा मयुरेश यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत डॉक्टरी पेशा निवडला. ते ‘ईएनटी सर्जन’ आहेत. मुलगी श्रुती हिने एम.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले आहे. इन्शुरन्स कंपनीतून त्यांनी आधीच रिटायरमेंट घेतली. नोकरीत बदली नको असल्याने नोकरी सोडण्याचा विचार केला आणि पूर्ण वेळ क्लिनीकमध्ये लक्ष देण्यास सुरूवात केली.
मनोहर यांना 2008 मध्ये ‘रोटरी क्लब’चे काही सदस्य भेटायला आले. ते ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे सभासद झाले. 2014-15 ला ‘रोटरी’चे अध्यक्षही झाले. माणसांच्या डॉक्टरांच्या असोसिएशन असतात, तशा प्राण्यांच्या डॉक्टरांच्या असावेत, यासाठी 2012 ला त्यांनी असोसिएशन सुरु केली. आता डोंबिवली, कल्याण अशा विविध ठिकाणच्या डॉक्टरांना संस्थेशी जोडून घेतले. आता 250 हून अधिक डॉक्टर असोसिएशनमध्ये आहेत. ‘जागतिक रेबीज दिना’निमित्ताने रोटरी क्लब आणि असोसिएशनच्या माध्यमातून आठवडाभर हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीकरण केले जाते. भटका कुत्रा कोणी क्लिनीकमध्ये घेऊन आल्यास त्याच्या उपचाराचे पैसे मनोहर घेत नाही. भटक्या कुत्र्यांवर सेवाभावाने उपचार केले जातात. नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून त्रास होतो, तो कमी होण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे, असेही मनोहर सांगतात. या प्राणिप्रेमीला दै.‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!