तोंडाळ तोफगोळ्याची तोफ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2021   
Total Views |

Nana _1  H x W:



राजकारणात काही तोफा या फुसका बार सोडणार्‍या असतात. त्या आवाज करतात, धूर सोडतात, परंतु तोफगोळा कधी लक्ष्यावर पडत नाही आणि त्याचे परिणामदेखील काही दिसत नाहीत. नाना पटोले ही अशी तोफ आहे. आवाज खूप करते, धूरही खूप सोडते, पण सगळे बार फुसके निघतात.
 
 
तोफांचे अनेक प्रकार असतात. महाराजांच्या काळात एक फार मोठी तोफ होती, तिचे नाव होते, मुलुखमैदान. नंतर तोफा बनविण्याच्या तंत्रामध्ये खूप सुधारणा होत गेल्या. अत्याधुनिक ‘बोफोर्स’ तोफा आल्या. नेपोलियन तोफखाना दलाचा प्रमुख होता. युद्धात तोफांचा वापर कसा करायचा, यातील तो अत्यंत कुशल सेनापती होता. क्रांतीकाळातील फ्रान्समधील बंड तोफांचा कौशल्याने वापर करुन त्याने मोडीस काढले.
 
 
ही झाली रणांगणावरील तोफांची माहिती. राजकारणाच्या रणांगणातदेखील अशा अनेक तोफा असतात. आणीबाणीच्या काळात ‘राजनारायण’ ही अशी एक तोफ होती. संयुक्त महाराष्ट्र्राच्या आंदोलनाच्या काळात ‘आचार्य अत्रे’ ही अशीच भारी तोफ होती. ‘अटलबिहारी वाजपेयी’देखील प्रचंड शक्ती असलेली तोफ होती. राजकारणातील या तोफांनी त्यांच्या त्यांच्या काळात इतिहास घडविणारी कामगिरी केली आहे.
 
 
राजकारणात काही तोफा या फुसका बार सोडणार्‍या असतात. त्या आवाज करतात, धूर सोडतात, परंतु तोफगोळा कधी लक्ष्यावर पडत नाही आणि त्याचे परिणामदेखील काही दिसत नाहीत. नाना पटोले ही अशी तोफ आहे. आवाज खूप करते, धूरही खूप सोडते, पण सगळे बार फुसके निघतात. २०१४ साली प्रफुल्ल पटेल यांचा गोंदियात पराभव करुन भाजपच्या तिकिटावर ते खासदार झाले. नंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करीत पक्ष सोडला, खासदारकीदेखील सोडली.
 
 
२०१९च्या निवडणुकीत ते नितीन गडकरींच्या विरोधात उभे राहिले आणि पडले. मोदी सरकार आणि फडणवीस सरकार शेतकरीविरोधी आहे, हा त्यांचा आरोप आहे. तसे ते मूळचे काँग्रेसचे. १९९० ते २००८ ते काँग्रेसमध्ये राहिले. २००९ ते २०१४ मध्ये ते भाजपत राहिले आणि दोन वर्षांपूर्वी ते स्वगृही (काँग्रेस) परतले.
 
 
भाजप सोडण्याचे न सांगितलेले कारण हे असावे की, भाजपत राहिल्याने क्रमांक एकचा नेता होणार नाही, मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, त्यापेक्षा काँग्रेस बरी. ते काँग्रेसतर्फे विधानसभेचे अध्यक्ष झाले. नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. म्हणजे मुख्यमंत्री बनण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. यासाठी त्यांनी घोषणा दिली की, काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल. याचा अर्थ महाविकास आघाडीबरोबर आघाडी करुन निवडणूक लढविली जाणार नाही. काँग्रेस स्वबळावर निवडून येईल. (असा पटोले यांचा आशावाद आहे) पटोलेंनी सोडलेला हा एक तोफेचा गोळा आहे. या गोळ्यामुळे महाविकास आघाडी काही हादरली नाही. चर्चा सुरु झाल्या. शरदराव पवार यांनी म्हटले की, प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे आणि त्याने स्वतःच्या वाढीचा विचार करणे काही गैर नाही.
 
 
नाना पटोले यांनी अनेक तोफगोळे सोडलेले आहेत, त्यातील काही पाहूया.
 
* २०१७ साली माझे फोन ‘टॅप’ केले जात होते. फडणवीस सरकारच्या काळात हे काम झाले.
 
 
* सुभाष देसाई यांच्यावर त्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला.
 
* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवील.
 
* ‘ये फेविकॉल का मजबूत जोड हैं।’ शासन पाच वर्षे सत्तेवर राहील (महाविकास आघाडीसंबंधी)
 
* अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे नट वाढत्या तेलदराबद्दल काही बोलत नसल्यामुळे त्यांच्या चित्रपटांवर आम्ही बहिष्कार घालू.
 
* महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वोच्च पद प्राप्त करुन देणे हे माझे लक्ष्य आहे.
 
* माझ्यावर पाळत ठेवली जाते. ‘आयबी’चा रिपोर्ट रोज सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जातो.
 
नाना पटोले नावाची तोफ काँग्रेस हायकमांडच्या बत्तीने चालत असते. यात तोफगोळ्यातील एक तोफगोळा असाच भारी आहे. स्वबळावर निवडणुका का लढवायच्या? नाना पटोलेंचे म्हणणे आहे की, शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. २०१४ साली त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे भाजपला विधानसभेत पूर्ण बहुमत नसताना पवारांनी भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याची घोषणा केली.
 
नाना पटोले केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरच तोफगोळे टाकतात असे नाही, अधूनमधून भाजपलाही ते लक्ष्य करतात. “भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाजविरोधी असून या समाजातील लोकांचा ते वापर करुन घेतात व नंतर त्यांना बाजूला काढतात. आधी गोपीनाथ मुंडे, नंतर एकनाथ खडसे, आता पंकजा मुंडे यांच्या बाबतीतही तेच घडले आहे. भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलले जात आहे.”‘घरचे झाले थोडे आणि व्याहाने धाडले घोडे’ अशी गत नाना पटोले यांची झालेली आहे. रसातळाला जाणारा पक्ष त्यांना उभा करायचा आहे. हे आव्हानात्मक काम आहे. त्याकडे लक्ष देण्याऐवजी पंकजा मुंडेंवर अन्याय झाला की न्याय झाला, याची उठाठेव त्यांना कुणी सांगितली करायला? पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात अशी काँग्रेसची मोठी नेतेमंडळी आहेत. यात आणखी तीन-चार नावं जोडली तर हे सर्व मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील घोडे आहेत. नाना पटोलेंना त्यांच्या बरोबर धावायचे आहे. आणि घोड्याच्या पायात खोडा अडकविण्यात काँग्रेस नेत्यांइतके तरबेज जगात कुठे सापडणार नाहीत. म्हणून नाना पटोलेंनी आपला विचार करावा.
 
नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले की, “मी लहान माणसांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.” पवारांचे बोलणे नेहमी सूचक आणि अर्थगर्भ असते. एकाच वाक्यात त्यांनी नाना पटोलेंच्या फुसक्या तोफगोळ्यातील थोडीबहुत असलेली दारु काढून घेतली. आता नाना कोणता गोळा टाकतात, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सध्या ते उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. फैजपूरपासून ते सुरुवात करणार आहेत. फैजपूरला काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. आता ती काँग्रेस राहिलेली नाही. आताची काँग्रेस राहुल, सोनिया, प्रियांका हायकमांडची काँग्रेस आहे. त्यांची जोपर्यंत मर्जी आहे, तोपर्यंत नानांचे तोफगोळे सुटत राहतील. आणि जेव्हा ही मर्जी संपेल, तेव्हा नाना पटोलेंचे गोळे थंड होतील.
 
राजकारणात नेत्याला रोज बोलावे लागते आणि रोज कॅमेर्‍यापुढे यावे लागते. जे शहाणे राज्यकर्ते असतात ते याचा योग्य तो वापर करतात. आणि जे नाना पटोले असतात ते माध्यमांना आपला वापर करू देतात. माध्यमांना बातम्या पाहिजेत. महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे, ही बातमी होत नाही. महाविकास आघाडीतील नेते मनात येईल ते बोलतात, ही बातमी होते. अशा बातम्या निर्माण करण्याचे काम नाना पटोले रोजच करीत असतात. म्हणून ते टीव्हीवरही असतात आणि वर्तमानपत्रातही असतात. पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनविण्यासाठी याचा काहीही उपयोग नसतो, हे नानांना विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लक्षात येईल. तेव्हा त्यांनी असे म्हणू नये की, अरे मी पाच वर्षे एवढे तोफगोळे सोडले त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. गर्जेल तो पडेल काय, अशी म्हण आहे. नाना तिचे प्रत्यंतर देणार का?
 
 
@@AUTHORINFO_V1@@