विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी धडपडणारे ‘गुलाबराव’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2021   
Total Views |

गुलाबराव पाटील _1 &n
 



कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालयात गोरगरिबांची मुले येतात. त्या मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे आणि संघर्ष करणारे शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्याविषयी जाणून घेऊया.


पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिरसोले या गावी झाला. आई-वडिलांनी शेती करून दोन्ही भावंडांना शिकविले. पाटील हे शिक्षकी व्यवसायाकडे वळले, तर त्यांचा भाऊ डॉक्टर झाला. गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. याकाळात त्यांना सुतार गुरूजी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बाहेरगावी वसतिगृहात घेतले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेत आपला खर्च भरून काढता येईल आणि घरीही काही आर्थिक मदत करता यावी, या उद्देशाने आठवीनंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी ते कामाला जात असत. त्या पैशांतून शैक्षणिक खर्च, वसतिगृहाचे शुल्क ते भरत.
 
 
धुळ्याच्या वसतिगृहात असताना एकदा रविवारी ते आणि त्यांचा मित्र फिरायला गेले. एका हॉटेलजवळून जात असताना मिसळ खाण्याची इच्छा त्यांना झाली. पण दोघांकडेही खिशात पैसे नव्हते. त्यांना एक फलक दिसला. त्यावर कामासाठी मुले पाहिजेत. वेतन दररोजच्या दररोज दिले जाईल, असे लिहिले होते. दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता मॅनेजरची भेट घेतली. या कामासाठी एका दिवसाला आठ रुपये देऊ असे सांगितले. पाटील आणि त्यांचा मित्र यांनी काय काम असेल, याची माहिती करून घेतली. त्यानंतर नाष्टा आणि जेवण मिळेल का, हेही विचारले. त्यावर मॅनेजरने ‘हो’ सांगितले. त्यादिवशी हॉटेलमध्ये मिसळ खाण्याचा आनंदही लुटता आला आणि हातात थोडे पैसेही आले. काम करून शिक्षण घेत असतानाही त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता कधीही ढासळू दिली नाही.
 
 
मार्च १९८५ ला इयत्ता दहावीची परीक्षा दिली. प्रथम श्रेणीत ते उत्तीर्णही झाले. शाळेत तिसरा क्रमांक मिळविल्याने त्यांना आणि आई-वडिलांना खूप आनंद झाला. आता महाविद्यालयीन शिक्षणासाठी आणखी एक पेच समोर होता. त्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागणार होते. त्याठिकाणी राहण्याची व्यवस्था नव्हती. शेवटी पाटील यांच्या आईने त्यांच्या मावशीकडे राहण्याची व्यवस्था केली. त्यांना कोणत्या शाखेत जायचे याविषयी काहीच माहिती नव्हती. त्यांनी लिपिकाला ज्या शाखेत कमी खर्च येईल तिकडे प्रवेश द्या असे सांगितले.
 
 
त्यावर लिपिकांनी गुण चांगले असल्याने विज्ञान शाखेकडे जाण्याचा सल्ला दिला. शुल्क तीन टप्प्यांत भरले तरी चालणार असल्याने त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर त्यांनी आई-वडिलांच्या सांगण्यानुसार डीएड करण्यासाठी अर्ज भरला. पण दुर्दैवाने ‘डोनेशन’ भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना प्रवेश मिळाला नाही. पुढे त्यांनी नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालयातून बी. एस्सीचे शिक्षण पूर्ण केले. ‘कमवा आणि शिका’ या योजनेत ते सहभागी झाले. बी. एस्सीच्या पहिल्या वर्षी दोन विषय राहिल्याने त्यांना अपयश आले. आई-वडील आणि ते या निकालामुळे नाराज झाले. पण त्यांच्या आई-वडिलांनी त्यांची समजूत काढली. १९९१ ला त्यांना पदवी प्राप्त झाली. त्याकाळात वीस मुलांमध्ये केवळ चारच मुले उत्तीर्ण झाली. त्यांचा वनस्पतिशास्त्र विषय असल्याने त्यांना नोकरी मिळत नव्हती.
 
 
नोकरी न मिळाल्याने त्यांनी बी.एड् करण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती पुढे हार न मानता औरंगाबाद येथे ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या ंमहाविद्यालयात ‘बीपीएड्’ केले. पुढे ‘एमपीएड्’सुद्धा प्रथम श्रेणीत ते उत्तीर्ण झाले. नोकरीच्या शोधात 1995 ला 100 रुपये आणि बॅग घेऊन ते मुंबईत आले. कल्याण स्थानकात रात्र आणि दिवस नोकरी शोधण्यासाठी संघर्ष त्यांचा सुरू होता. स्थानकावर तीन ते चार दिवस काढल्यानंतर राजेंद्र सोनावणे यांनी त्यांना आसरा दिला. बसमधून प्रवास करताना त्यांना सम्राट अशोक विद्यालयाची जाहिरात दिसली. शिक्षक म्हणून ते या शाळेत रूजू झाले. ४०० रु. पगारावर त्यांनी नोकरी स्वीकारली. शिकवणी घेऊन त्यांनी कुटुंबाला आर्थिक हातभारही लावला.
 
 
 
एकदा संस्था अध्यक्षांनी त्यांना दोन वर्गखोल्यांची एक वर्गखोली करताना मधली भिंत तोडण्यास सांगितले. ते कामही त्यांनी केले. त्यांची काम करण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिस्त लावली जात होती ते पाहून ऑगस्टमध्ये उपमुख्याध्यापक पद त्यांना दिले. पदवीधर सेवा ज्येष्ठ शिक्षक असल्याने माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पद संस्थेने त्यांना दिले. माध्यमिक विभागाला त्यांनी शासकीय मान्यता मिळवून दिली. गेल्या १२ वर्षांपासून शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागत आहे. शाळा २००३ ला अनुदान तत्त्वावर आली. त्यासाठी पाटील यांनी प्रयत्न केले होते. शाळेत दररोज सकाळी विद्यार्थ्यांना ‘मेडिटेशन’ शिकवले जाते. बैलपोळा, कारागृहातील कैदी बांधवांना राखी बांधणे, सीमेवरील जवानांना राखी पाठविणे, बाल साहित्य संमेलन भरविणे, आजी-आजोबा स्नेहसंमलेन भरविणे असे विविध क्रियाशील उपक्रम शाळेत राबविले जातात.
 
 
 
त्यांच्या कामांचे कौतुक म्हणून त्यांना ‘पोलीस मित्र’, ‘कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार’, तसेच विविध संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. शासनाने २०१८ मध्ये ‘राज्य शिक्षक पुरस्कार’ तत्कालीन शिक्षणमंत्री आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान केला आहे. समाजकार्याची आवड असल्याने शिक्षकांसाठी काम करायला हवे म्हणून ते शिक्षक चळवळीत सहभागी झाले. कल्याण-डोंबिवली जिल्हास्तरीय माध्यामिक व उच्च माध्यामिक मुख्याध्यापक संघाचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा कार्यवाह तसेच शिक्षकांसाठी निर्माण केलेल्या पतसंस्था विद्यासेवक को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेचे ते संचालक आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणार्‍या या शिक्षकाला दै.‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!
@@AUTHORINFO_V1@@