चुकीच्या धोरणामुळे आमच्या मुलांची पाटी कोरी!

    13-Jul-2021
Total Views |

online education_1 &


मुलांना शाळेतून शिक्षण देण्यासाठी ८१ टक्के पालक आग्रही

मुंबई
: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यभरात शाळा आणि महाविद्यालये बंद आहे. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याचदरम्यान राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणामधून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी केली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ८१.१८ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास आम्ही तयार आहोत असं मत व्यक्त केले आहे.

सदर सर्वेक्षण १२ जुलै रोजी रात्री ११.५५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ५ लाख ६० हजार पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकूण ६ लाख ९० हजार ८२० पालकांपैकी ३ लाख ५ हजार २४८ पालक ग्रामीण भागातील, ७१ हजार ९०४ पालक निमशहरी भागातील आणि ३ लाख १३ हजार ६६८ पालक शहरी भागात राहाणारे आहेत. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी सर्वाधिक म्हणजे ७३ हजार ८३८ पालक हे पुण्यातील होते. तसेच मुंबई मनपा क्षेत्रातील ७० हजार ८४२ पालकांनी आपला प्रतिसाद यामध्ये नोंदवला. त्याप्रमाणे कोल्हापूरमधील ३० हजारहून अधिक, नाशिकमधील ४७ हजारांहून अधिक, साताऱ्यातील ४१ हजारांहून अधिक, ठाण्यातील ३९ हजारांहून अधिक पालकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पालकांपैकी २.८९ टक्के पालकांची मुलं ही नर्सरीमध्ये आहेत. तर पहिली ते पाचवीला पाल्य असणाऱ्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांची संख्या २३.४८ टक्के इतकी आहे. सहावी ते आठवीला पाल्य असणाऱ्या ३१.२१ टक्के पालकांनी या सर्वेक्षणात मत नोंदवले आहे. सर्वाधिक ४१.५४ टक्के पालक हे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे होते. तसेच ११ वी आणि १२ वीला पाल्य असणाऱ्या पालकांची १५.२६ टक्के इतकी होती. या सर्वेक्षणामधील आकडेवारीवरुन पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भातील तयारी केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

"मागील दीड ते दोन वर्षांपासून शैक्षणिक विषय राज्य सरकारच्या चुकीच्या हाताळणीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जर सरकारने ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असती तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान टाळता आले असते. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी असणे स्वाभाविकच आहे. पण सरकारने शाळांच्या सॅनिटायझेशनबाबत, मुलांच्या सुक्षिततेबाबत, त्यांची योग्य काळजी घेण्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून एसओपी तयार करावी. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा."

- भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये