ओवेसींचा ‘असली चेहरा’ नेमका कोणता?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2021   
Total Views |

ovc_1  H x W: 0

आपण केवळ मुस्लीम समाजाच्या मागे उभे नसून, अन्य समाजातील सर्व उपेक्षित वर्गांच्या मागे उभे असल्याचा दावा करणारा ओवेसींचा एमआयएम या पक्षामध्ये केवळ मुस्लीम व्यक्तींचीच नेता म्हणून कशी निवड होते? हे पाहिले की, ओवेसींच्या पक्षाचा असली चेहरा कोणता आहे, याची कल्पना आल्यावाचून राहत नाही.

‘मुस्लीम इत्तेहादुल मुस्लिमन’ (एमआयएम) या पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी हे नेहमीच वादग्रस्त भूमिका घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. भारतातील मुस्लीम समाजाचे आपणच तारणहार आहोत, अशा भूमिकेत ते वावरत असतात. आपण मुस्लीम, दलित, ओबीसी, वनवासी या सर्व समाजघटकांसाठी कार्य करीत असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात मुस्लीम समाजाव्यतिरिक्त अन्य कोणाचा विचार त्यांच्याकडून होत असल्याचे दिसून येत नाही. एवढेच कशाला, त्यांच्या पक्षाकडून संसदसदस्य म्हणून वा आमदार म्हणून जे निवडून आले आहेत, त्यामध्ये दिसून येतात ती फक्त मुस्लीम नावे! दलित, ओबीसी, वनवासी यापैकी कोणीही त्या पक्षाचा आमदार वा खासदार म्हणून निवडून आला असल्याचे दिसून येत नाही. आपण मुस्लिमांप्रमाणे अन्य पददलित समाजाच्या बाजूने असल्याचा आव आणायचा; पण प्रत्यक्षात कैवार घ्यायचा तो केवळ मुस्लीम समाजाचा, असा ओवेसी आणि त्यांच्या या पक्षाचा व्यवहार राहिलेला आहे.

आता हेच पाहा ना! या पक्षाचे विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये १४ आमदार आहेत. हे सर्व आमदार मुस्लीम आहेत. तसेच जे दोन विधान परिषद सदस्य आहेत, तेही मुस्लीमच आहेत. तसेच या पक्षाचे दोन संसद सदस्य आहेत. त्यापैकी एक आहेत स्वतः असदुद्दीन ओवेसी आणि दुसरे आहेत महाराष्ट्राच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले इम्तियाज जलील. हे दोघेही मुस्लीमच! अन्य कोणाचे नाव ओवेसी यांना सापडले नाही!

एमआयएमने आता आपले हातपाय देशातील दहा राज्यांमध्ये पसरले असून, त्यामध्ये तेलंगण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, झारखंड आदी राज्यांचा समावेश आहे. पण, या दहा राज्यांच्या प्रदेशाध्यक्षपदी एकही मुस्लिमेतर नेता नाही. तसेच या पक्षामध्ये महिलांना शून्य प्रतिनिधित्व आहे. या पक्षाचे जे दोन राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांची नावे आहेत सय्यद असीम वकार आणि वारीस पठाण. या पक्षाचे सरचिटणीस सय्यद अहमद पाशा कादरी आहेत. तेही मुस्लीम आहेत. आपण केवळ मुस्लीम समाजाच्या मागे उभे नसून, अन्य समाजातील सर्व उपेक्षित वर्गांच्या मागे उभे असल्याचा दावा करणारा हा पक्ष केवळ मुस्लीम व्यक्तींचीच नेता म्हणून कशी निवड करू शकतो? हे पाहिले की, ओवेसींच्या पक्षाचा असली चेहरा कोणता आहे, याची कल्पना आल्यावाचून राहत नाही. ओवेसींच्या पक्षाने नेहमीच हिंदूविरोधी भूमिका घेऊन मुस्लीम समाजाला हिंदूंच्या विरोधात भडकविण्याचे काम केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीसंदर्भात जो ऐतिहासिक निकाल दिला, तोही त्यांना पचनी पडलेला नाही. या निकालाने मुस्लीम समाजावर अन्याय झाला, अशी त्यांची भावना आहे. त्या निकालाविरुद्ध शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. प्रत्यक्षात त्यांनी इतिहासामध्ये डोकाविण्याचा प्रयत्न केला, तर हिंदू समाजाची कित्येक मंदिरे मुस्लीम आक्रमकांनी उद्ध्वस्त केल्याचे दिसून येईल. पण, तो इतिहास त्यांना लक्षातच घ्यायचा नाही. भूतकाळात ज्या अक्षम्य चुका मुस्लीम आक्रमकांकडून झाल्या, त्याबद्दल काही खेद व्यक्त करायचा नाही, अशी भूमिका धर्मांध मुस्लीम पक्षांकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून घेतली जात आहे. त्यापैकी एक आहेत असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचा पक्ष.
 
हैदराबादच्या निजामाने आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी १९२७ मध्ये ‘मुस्लीम इत्तेहादुल मुस्लिमन’ संघटनेची स्थापना केली होती. निजामाने रझाकारांची फौज उभारून हैदराबाद संस्थानातील हिंदू समाजावर भयंकर अत्याचार केले, हा काळा इतिहास आहे. रझाकारांची फौज उभारली ती ‘मुस्लीम इत्तेहादुल मुस्लिमन’ संघटनेच्या पुढाकाराने. पण, अखेर निजामास शरणागती पत्करावी लागली. १९४८ मध्ये या संघटनेवर बंदी घालण्यात आली. त्या संघटनेचा नेता कासीम रिझवी यास १९४८ ते १९५७ या कालावधीत कारावासात डांबण्यात आले. त्याने पाकिस्तानात जाण्याच्या अटीवरच त्याची कारागृहातून मुक्तता करण्यात आली. पण, तिकडे जाण्याआधी त्याने आपल्या संघटनेची सूत्रे अब्दुल वाहिद ओवेसी यांच्याकडे सोपविली. तेव्हापासून या संघटनेची आणि आता राजकीय पक्षात रूपांतर झालेल्या पक्षाची सूत्रे ओवेसी यांच्याकडेच आहेत.

एमआयएमच्या पार्श्वभूमीची कल्पना या माहितीवरून येईल. ओवेसी यांच्या पक्षाने नेहमीच राष्ट्रहिताच्या, हिंदू समाजाच्या हिताच्याविरोधात भूमिका घेतल्याचे सर्वच जाणून आहेत. रामजन्मभूमीस विरोध, मुस्लीम समाजाच्या हिताचे निर्णय घेतले तरी त्याला विरोध करायचा, अशी त्या पक्षाची भूमिका राहिली आहे. असे करतानाच आपण केवळ मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करीत नसून अन्य पददलित समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहोत, हे भासविण्याचा प्रयत्न त्या पक्षाकडून केला जातो. पण, त्यातील फोलपणा या लेखात दिलेल्या माहितीवरून उघड होईल. हा पक्ष केवळ मुस्लीम समाजाचाच कैवार घेणारा पक्ष आहे; हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे!

‘माझे पूर्वज हिंदू होते;’ बिहारच्या मंत्र्यांचे प्रतिपादन

बिहार राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहम्मद जाम खान यांनी आपले पूर्वज हिंदू असल्याचे ठाम प्रतिपादन केले आहे. आपले पूर्वज राजस्थानमधील राजपूत वंशाचे होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. आपल्या पूर्वजांनी अल्लाउद्दीन खिलजींबरोबर संघर्ष केला होता, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या परिवारास वाचविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी मुस्लीम धर्माचा स्वीकार केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या देशातील सर्वांचा ‘डीएनए’ एकच असल्याचे प्रतिपादन एका पुस्तक प्रकाशन समारंभात केले होते. सरसंघचालकांच्या त्या वक्तव्यावर सध्या बरेच मंथन होत असल्याचे दिसून येत आहे. ही चर्चा सुरू असताना, बिहारमधील एक मुस्लीम मंत्र्याने आपले पूर्वज हिंदू असल्याचे कोणाच्याही रागालोभाची पर्वा न करता स्पष्ट केले, हे कौतुकास्पद मानायला हवे!
 
रजनीकांत यांच्याकडून पक्ष विसर्जित
 
तामिळनाडूमध्ये राजकारणावर कित्येक वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा प्रभाव आहे. असाच प्रभाव आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांमधील राजकारणावरही आहे. मध्यंतरी अभिनेते कमल हसन यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार उतरविले होते. मूळचे मराठी असलेले अभिनेते रजनीकांत यांनीही राजकारणात उतरण्याचा निर्धार करून ‘रजनी मक्कल मंद्रम’ या नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. पण, राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे रजनीकांत यांच्या उशिरा का होईना, लक्षात आले. अखेर त्यांनी आपला पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला राजकारणात प्रवेश करायचा नाही, हेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. “मी जे अपेक्षिले होते तसे न घडल्याने पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय आपण घेतला.
 

आपल्या पक्षाचे पदाधिकारी यापुढे ‘रजनीकांत फॅन क्लब असोसिएशन’चे काम पाहतील,” असेही रजनीकांत यांच्याकडून सांगण्यात आले. रजनीकांत यांनी कमल हसन यांना आलेला अनुभव लक्षात घेऊन वेळीच राजकारणामधून दूर होण्याचा जो निर्णय घेतला, तो योग्य आहे की नाही, हे आगामी काळच सांगू शकेल!





 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@