नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाची 5G विरुद्धीची याचिका फेटाळली. तसेच, प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही याचिका करण्यात आली असून कायद्याचा अवमान करणारी असल्याचे ताशेरे ओढत दिल्ली उच्च न्यायालयाने जुही चावलाला २० लाख रुपयांचा दंडदेखील केला. जुही चावला आणि इतर दोघांनीही मिळून दिल्ली उच्च न्यायालयात 5G विरुद्ध याचिका केली होती.
5G नेटवर्क हे आरोग्यासाठी हानिकारक असून याचा पर्यावरणावरदेखील विपरित परिणाम होत असल्याने याच्या विरोधात जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमुर्ती जे आर मिधा या याचिकेवर सुनावणी करताना म्हणाले की, "फिर्यादींनी म्हणजेच जुही चावला आणि इतर दोन सहयाचिकाकर्त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेचा अवमान केला आहे आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवला आहे."
ही याचिका प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात आल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने जुही चावला आणि सहयाचिकाकर्त्यांना फटकारले आहे. जुही चावला खटल्याच्या कामकाजाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या लिंक सोशल मीडियावर शेअर करत होती. त्याचा परिणाम होत खटल्याच्या सुनावणीदरम्यान वारंवार व्यत्यय येत होता. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका सदोष असल्याचे नमूद केले होते. जुही चावलाने ही याचिका दाखल करण्यापूर्वी सरकारकडे तिच्या 5G तंत्रज्ञानाविषयीच्या शंका उपस्थित का केल्या नाहीत, असा प्रश्नदेखील दिल्ली उच्च न्यायालायने उपस्थित केला होता.