मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल देशमुख यांचे वकील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात दाखल झाले . समन्स प्राप्त झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी सकाळी वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवले आहे. मात्र अटक अटळ आहे, असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे.
भातखळकर ट्वीट करत म्हणाले,"'१०० कोटी क्लब'ची साखळी ईडीसमोर आलीय. अनिल देशमुख यांचे खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक चौकशीत पोपटासारखे बोलू लागलेत. वसुलीच्या पैशांचे वाटेकरी ईडीच्या हाती लागलेत. काळ्या पैशांनी रंगलेल्या हातांचे ठसे जुळून येत आहेत. अटक अटळ आहे !", असेही ते म्हणाले.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी रुपये वसूल प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना, मुंबईतील काही बार मालकांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान मुंबईतील १० बार मालकांनी अनिल देशमुख यांना प्रत्येकी ४ कोटी रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचा दावा ईडीने केला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहायकास (पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुख यांना समन्स पाठवले होते.
अनिल देशमुख यांना ईडीने समन्स दिल्यानंतर वकील वेळ मिळावा यासाठी हजर राहिले त्यामुळे ईडीने आणखी वेळ दिल्यास आज ते चौकशीसाठी हजर राहणार नाहीत, असे वकिलांनी सांगितले. शुक्रवारी दिवसभर सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, शनिवारी ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आले होते. ईडीने अनिल देशमुख यांना शनिवारी सकाळी 11 वाजता कार्यालयात हजर होण्यास सांगितले होते.मात्र ते हजर राहिले नाही.