प्रतिचालीची योजना करा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2021   
Total Views |

aaghadi_1  H x

 
राजकारण हा बुद्धीचा खेळ आहे. यासाठी आपले विरोधक आपल्या विरुद्ध एकवटणार नाहीत, यासाठी काय करायला पाहिजे याची बुद्धी चालविली पाहिजे. सरळ चालीला सरळ चालीने उत्तर द्यायचे असते आणि तिरक्या चालीला तिरक्या चालीने उत्तर द्यायला पाहिजे. भाजपने बेसावध असता कामा नये.



मनीष तिवारी आणि के. सी. सिंग यांनी ‘राष्ट्र मंच’ स्थापन केला. यशवंत सिन्हा त्यात सामील झाले. या ‘राष्ट्र मंच’ने दिल्लीत भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलाविली. ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीचा विषय २०२४ च्या निवडणुका आणि विरोधी पक्षांची एकजूट असा होता. गुरू प्रशांत किशोर यांनी भाजपविरुद्ध लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे गठबंधन केले पाहिजे, हा गुरुमंत्र शरद पवार यांना दिला. यामुळे ही बैठक झाली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते माजीद मेमन म्हणतात, “वर्तमानपत्रात अशा बातम्या आल्या आहेत की, ‘राष्ट्र मंचा’ची बैठक शरद पवार यांनी भाजपविरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी बोलाविली. हे पूर्णतः असत्य आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. परंतु, त्यांनी ही बैठक बोलाविली नाही. काँग्रेसला वगळून एकजूट करण्याची ही मोठी चाल असण्याचा अर्थ कृपया कुणी काढू नये.”

 
वर्तमानपत्रांनी तसा अर्थ काढला. कारण, या बैठकीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी कुणीही नव्हते. राहुल गांधी आणि सोनिया गांधी कुणीतरी बोलावलेल्या अशा बैठकीत जाऊ शकत नाहीत. यशवंत सिन्हा हे वृत्तपत्रीय माध्यमांच्या दृष्टीने मोठे नाव आहे. तथापि, ते राजकीयक्षेत्रात मृत लाकडाचा ढेपा आहेत. त्यांच्या बोलवण्यावरून प्रथम श्रेणीचे राजनेते बैठकीला येणे शक्यच नाही. काँग्रेसचे दुय्यम-तिय्यम दर्जाचे नेते उपस्थित होते.
 
अन्य पक्षांचा विचार केला तर ओमर अब्दुल्ला काही मिनिटे बैठकीत उपस्थित राहून निघून गेले. कवी जावेद अख्तर बैठकीत पूर्ण वेळ होते. पुढे येणार्‍या एखाद्या चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी बैठकीतील संवाद त्यांना उपयोगी पडतील. माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, के. सी सिंग, निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. शहा बैठकीला उपस्थित होते. राजकारणात ज्या लोकांचा मते गोळा करण्यास शून्य उपयोग आहे, अशी ही सर्व नावे आहेत. ओमर अब्दुल्ला ज्या पक्षाबरोबर जाईल, त्याची नौका बुडायला वेळ लागणार नाही. ज्याच्या भारत आणि संविधाननिष्ठेबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, असा हा माणूस आहे. या घराण्याने काश्मीरमध्ये दहशतवाद पोसलेला आहे. त्याची अखिल भारतीय विश्वासार्हता काय?
 
माजीद मेमन म्हणतात की, “ही बैठक शरदराव पवारांनी बोलाविलेली नव्हती.” यावर मेमन सोडून आणखी कुणीही विश्वास ठेवणार नाही. शरद पवारांनी बैठक बोलाविली नाही, तर बैठक आपल्या निवासस्थानी का ठेवली? दिल्लीमध्ये अन्यांची निवासस्थाने आहेत, तिथेही बैठक ठेवता आली असती. अखिल भारतीय राजकीय स्तरावर यशवंत सिन्हा यांचे वजन काय? भाजपने तिकीट नाकारल्यामुळे, मंत्रिपद नाकारल्यामुळे बंडखोरी करून (लाचार होऊन) अन्य पक्षात जाणारा हा नेता आहे. ज्याचे बूड स्थिर नाही, त्याचे निमंत्रण स्वीकारून बैठकीला कुणी आले असतील, यावर मेमन सोडून अन्य कुणी विश्वास ठेवणार नाही.
 
 
‘राष्ट्रवादी काँग्रेस मंच’ याऐवजी ‘राष्ट्र मंच’ हा शब्दप्रयोग केला आहे. ‘राष्ट्र मंच’ हा शब्द ऐकूनही गंमत वाटते. हे सर्व नेते राष्ट्राचा विचार करू लागले आहेत, याचे स्वागत केले पाहिजे. खरं म्हणजे त्यांनी आपल्या कुलपरंपरेप्रमाणे ‘सेक्युलर मंच’, ‘निधर्मी मंच’, ‘सर्वधर्म समभाव मंच’, ‘वंचित जाती मंच’ असे कुठले तरी नाव द्यायला पाहिजे होते, ते त्यांच्या विचारधारेला शोेभून देणारे झाले असते. ‘राष्ट्र’ हा संघविचारधारेचा शब्द आहे. ‘सर्वकाही राष्ट्रासाठी’ हा संघमंत्र आहे. तेव्हा संघाचा शब्द स्वीकारून शरदराव पवार आणि यशवंत सिन्हा काय सांगू इच्छितात? कधीतरी त्यांनी स्पष्ट करावे.
‘राष्ट्र मंच’च्या माध्यमातून राष्ट्राला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणार्‍या नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध प्रशांत किशोर, शरद पवार, यशवंत सिन्हा यांना आघाडी उघडायची आहे. हा एक विरोधाभासच आहे. परंतु, राजकारणात सुसंगती कधी नसते. विसंगती हाच राजकारणाचा गुणधर्म आहे. गमतीने काही जण म्हणतात की, सुसंसगती हा गाढवाचा गुणधर्म आहे आणि विसंगती हा अगाढवांचा गुणधर्म आहे.

 
आघाडी काँग्रेसशिवाय होऊ शकत नाही. म्हणून शरद पवार यांना खुलासा करावा लागला की, “नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देशातील सद्यःस्थितीवर चर्चा करण्यात आली. शेतकरी आंदोलनावर मते जाणून घेतली. देशातील सध्याच्या परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढण्यात येणार असून त्यावर चर्चा करण्यात आली. तिसरी आघाडी स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही व तशी चर्चाही झालेली नाही. केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या विरोधात पर्यायी शक्ती उभी करायची असल्यास काँग्रेससह समविचारी पक्षांना बरोबर घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका मी बैठकीत मांडली,” असे पवार यांनी सांगितले. पर्यायी शक्तीने सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी.
 
यामागे शरदराव पवारांची चाल कोणती असू शकते? काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वाचा गोंधळ आहे. सोनिया गांधी अध्यक्ष आहेत. परंतु, त्या पक्षाला दिशा देऊ शकत नाहीत. राहुल गांधी पक्षाच्या पडत्या काळात अपयशाची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, तेदेखील पक्षात नवचैतन्य निर्माण करू शकत नाहीत. गांधी घराणे सोडून काँग्रेस पक्षात अखिल भारतीय स्तरावरचा समर्थ नेता अजून पुढे आलेला नाही. अशा परिस्थितीत शरद पवार राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे नेतृत्व पुढे आणू इच्छितात. उद्या अशी जर मागणी झाली की, शरद पवार यांनाच काँग्रेसचे कार्याध्यक्ष करा, तर आपल्याला आश्चर्य वाटू नये. शरद पवार हे मुळात काँग्रेसचे आहेत, काँग्रेस संस्कृतीत वाढलेले आहेत, म्हणून स्वगृही परत जाण्यात त्यांना कसलीच अडचण नाही.
 
अखिल भारतीय मान्यता असलेल्या पक्षाशिवाय भाजपशी लढता येणार नाही, हे पवार यांना उत्तम समजते. प्रादेशिक पक्षांच्या प्रादेशिक मर्यादा आहेत. तृणमूल काँग्रेसचा महाराष्ट्रात काही उपयोग नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बिहारमध्ये काही उपयोग नाही. या प्रादेशिक पक्षांना एक केले तर त्याचा अखिल भारतीय प्रभाव काही होत नाही. त्यासाठी अखिल भारतीय पक्ष पाहिजे. शरद पवार यांची राजनेता म्हणून विश्वासार्हता फार कमी आहे. अनेक वेळा त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. आपल्याच पक्षाचे वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. सोनिया गांधींविरुद्ध बंड केले. असा सर्व त्यांचा राजकीय इतिहास आहे. त्यांची पैशाची ताकद प्रचंड आहे. परंतु, ती यश देण्यात उपयोगी पडेल याची खात्री नाही.

 
तिसरी आघाडी की दुसरी आघाडी, हा प्रश्न आहे? तिसर्‍या आघाडीत काँग्रेस नसेल. कारण, काँग्रेसची दुसरी आघाडी आहे. काँग्रेसदेखील दुसरी आघाडी मजूबत करण्याचा प्रयत्न करणार. काँग्रेसला गांधी घराण्यातीलच नेता पाहिजे असतो, अन्य कुणी चालत नाही. तेव्हा काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा संघर्ष होईल का? पवार तशी खेळी खेळून राहिले आहेत का? हेदेखील बघावे लागेल. मोदी यांच्याविरुद्ध लढायचे तर दुसरा मोदी उभा करावा लागेल. मोदी यांच्याशी समर्थपणे लढेल असा चेहरा लोकांपुढे आणावा लागेल. शरद पवार हा चेहरा होऊ शकत नाहीत. यासाठी शरद पवार हे बघणार की, मोदींविरुद्धच्या लढ्यात त्यांचे नेतृत्व मान्य करणारे पुरेसे खासदार निवडून आले पाहिजेत. त्यांच्या मदतीने पंतप्रधानपदावर हक्क सांगता येऊ शकतो.
 
 
देशाचे पंतप्रधानपद एकच आहे. त्यावर दावा सांगणारे अनेक आहेत. आपापल्या राज्यात जे प्रादेशिक पक्ष अत्यंत सबळ झालेले आहेत, त्यांच्या नेत्यांना असे वाटते की, मीदेखील पंतप्रधान होऊ शकतो. देवेगौडा, इंदरकुमार गुजराल जर पंतप्रधान होऊ शकतात, तर मी का होणार नाही, असे ममतादीदी, अखिलेश यादव, मायावती, ओमर अब्दुल्ला यांना वाटू शकते. यावरून लिंकनने सांगितलेली एक गोष्ट आठवली.
 
 
एक राजा शिकारीला निघाला. वाटेत त्याला शेतकरी भेटला. तो म्हणाला, “महाराज शिकारीला जाऊ नका, आज पाऊस पडणार आहे.” त्याचे न ऐकता राजा शिकारीला गेला. वादळी पाऊस झाला. त्याला परत यावे लागले. दुसर्‍या दिवशी त्याने शेतकर्‍याला बोलावून घेतले. राजा म्हणाला, “मी तुला राजज्योतिषी करतो. तू चांगले भविष्य जाणतोस.” शेतकरी म्हणतो, “महाराज, मला भविष्यातील काही समजत नाही. पाऊस पडणार असेल तर माझे गाढव कान खाली टाकतो. तेव्हा मला समजते की पाऊस पडणार आहे.” राजा म्हणतो, “मी गाढवालाच राजज्योतिषी म्हणून नेमतो.” लिंकन नंतर म्हणतो की, गाढवालाच राजज्योतिषी नेमल्यामुळे आपण फार मोठी चूक केली, असे राजाला वाटू लागले. गोष्ट ऐकणारे लिंकनला विचारतात, “राजाला असे का वाटले?” लिंकन म्हणतो, “त्यानंतर राज्यातील गाढवांचे मोर्चे राजाकडे आले आणि तेदेखील विविध पदे मागू लागले.” देवेगौडांनंतर आपल्या देशात दुसरे काय घडले?
 
तरीदेखील भाजपला पवार, प्रशांत किशोर आणि त्यांचे साथीदार यांच्या हालचालींवर फार बारीक लक्ष ठेवावे लागेल. सोशल मीडियावर पवार प्रयत्नांची खिल्ली उडविणार्‍या कविता मी वाचल्या, त्या ठीक आहेत. राजकीय पक्ष म्हणून भाजपला हा विषय दुर्लक्ष करण्यासारखा नाही. प्रचंड आग लावण्याचे काम एक छोटी ठिणगीच करत असते, म्हणून त्या ठिणगीची ज्वाला होण्यापूर्वीच तिला विझवावे लागते. राजकारण हा बुद्धीचा खेळ आहे. यासाठी आपले विरोधक आपल्या विरुद्ध एकवटणार नाहीत, यासाठी काय करायला पाहिजे याची बुद्धी चालविली पाहिजे. सरळ चालीला सरळ चालीने उत्तर द्यायचे असते आणि तिरक्या चालीला तिरक्या चालीने उत्तर द्यायला पाहिजे. भाजपने बेसावध असता कामा नये. नेत्यांनी मनोरंजन करणारी भाषणे करू नयेत, ते काम सोशल मीडियाला करू द्यावे. त्यांनी प्रतियोजना करण्याच्या कामाला लागले पाहिजे.
 
@@AUTHORINFO_V1@@