सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत अन्य दोन दहशतवादीही ठार
नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामध्ये लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर मुदासिर पंडितसह अन्य दोन दहशतवाद्यांना यमसदमी धाडले आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश असल्याचे काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुदस्सीर पंडितचा खात्मा होणे हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी मोठा धक्का असल्याचे काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी स्पष्ट केले. मुदस्सीर पंडित हा पोलिसांच्या हिट लिस्टमध्ये होता, प्रदेशात २०१८ पासून त्याने विविध दहशतवादी कृत्ये केली होती. पंडित याने तीन पोलिस कर्मचारी, दोन नगरसेवक आणि दोन सर्वसामान्य नागरिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या रडारवर होता. त्याच्यावर दहा लाख रुपयांचे इनामही घोषित करण्यात आले होते.