मुंबई : मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ) अध्यक्षा, तनुजा कंसल यांनी पहिल्या संपूर्ण महिला स्थानक असलेल्या माटुंगा स्थानकावरील महिला कर्मचा-यांचा सत्कार केला. त्यांनी कर्मचार्यांना २५,०००/- रुपये गट पुरस्कार आणि प्रशंसनीय काम केलेल्या दोन पॉईंट्सवुमन यांना २,५००/- चा वैयक्तिक पुरस्कारही दिला. यावेळी सीआरडब्ल्यूडब्ल्यूओचे कार्यकारी समिती सदस्य उपस्थित होते.
कंसल यांनी कर्मचार्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधला आणि त्यांना त्यांचे कर्तव्य बजावताना येणा-या आव्हानांची माहिती घेतली व त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी असेही म्हटले की, स्त्रियांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कल्याणासाठी स्वत:चे सर्व निर्णय घेण्यास हे सर्वोत्कृष्ट वातावरण आहे. जुलै २०१७ मध्ये माटुंगा रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेतील सर्व महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक झाले आणि २०१८ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. स्थानक व्यवस्थापक, आरपीएफ, पॉईंट्स व्यक्ती, तिकीट तपासणी कर्मचारी, सफाई कर्माचारी यांच्यासह ३५ महिला कर्मचारी येथे कार्यरत आहेत.