मतभेद आहेतच; पण समजून घेऊ एकमेकांना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

putin_1  H x W:
 
पुढची चाल मात्र पुतिन यांनी अपेक्षित चपळाईने केली. त्यांनी एकट्याची स्वतःची पत्रकार परिषद बोलावली. पुतिन म्हणाले की, “आमच्यात अनेक बाबतीत मतभेद आहेत. पण, आम्ही एकमेकांना समजून घ्यायला उत्सुक आहोत, तसेच आमच्यातले मतभेद मिटवण्याचे मार्ग शोधण्याचीही आमची तयारी आहे. एकंदरीत आमची ही बैठक बर्‍यापैकी रचनात्मक झाली.”
 
 
 
१९८५ साली सोव्हिएत रशियात मिखाईल गोर्बाचेव्ह हे राष्ट्राध्यक्ष झाले. आर्थिकद़ृष्ट्या डबघाईला आलेलं सोव्हिएत साम्राज्य त्यांनी विसर्जित केलं. अनेक सोव्हिएत प्रांत भराभर बाहेर पडून स्वतंत्र देश बनले. ही प्रक्रिया १९९१ साली पूर्ण झाली. सोव्हिएत रशिया या महासत्तेतले उर्वरित प्रांत एकत्र येऊन त्यांनी ‘रशियन फेडरेशन’ हा नवा लोकशाही देश अस्तित्वात आणला. बोरिस येल्त्सिन हे नवे राष्ट्रध्यक्ष बनले. १९९१ ते १९९९ या आपल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी रशियाला साम्यवादी अर्थव्यवस्थेवरून भांडवलदारी व्यवस्थेवर आणले. १९९९मध्ये ब्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्याकडून सूत्र घेतली, म्हणजेच गेली २२ वर्षे पुतिन रशियाचे सर्वेसर्वा आहेत. एखाद्या नेत्याने आपल्या पदावर, चार वर्षांच्या सलग दोन कार्यकाळांपेक्षा अधिक काळ (म्हणजे आठ वर्षानंतर) राहू नये. या राज्यघटनेतील तरतुदीचं पालन करण्यासाठी ते पहिली आठ वर्षं राष्ट्राध्यक्ष, पुढची आठ वर्षं पंतप्रधान मग त्यापुढची आठ वर्षे पुन्हा राष्ट्रध्यक्ष, असा राजकीय खो-खो खेळत सर्वोच्च पदावर भक्कम बैठक जमवून बसलेले आहेत. ते अत्यंत कुशल राजकीय खेळाडू आहेत आणि त्यांना रशियाला पुन्हा महासत्तापदावर नेऊन बसवायचं आहे, हे गेली दोन दशकं जग पाहातं आहे.
 
 
रोनाल्ड रीगन हे १९८१ ते १९८९ असे आठ वर्षे म्हणजे चार वर्षांचे दोन कार्यकाळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकन राज्यघटना असं म्हणते की, कोणताही माणूस राष्ट्राध्यक्षपदी दोन कार्यकाळ (टर्मस्)पर्यंतच राहू शकतो. नंतर जरी तो लोकप्रिय असला, सक्षम असला तरीही तो तिसर्‍या वेळेस निवडणूकच लढवू शकत नाही, अमेरिकन राज्यघटनेच्या निर्मात्यांनी अतिशय दूरदर्शीपणे हुकूमशाही किंवा घराणेशाहीच्या शक्यताच मोडून काढल्या आहेत आणि या घटनेत दुरुस्ती वगैरे करण्याची हिंमत गेल्या २०० वर्षांत कुणीही केलेली नाही.
 
 
तर, रोनाल्ड रीगन सरकारने १९८३ सालीच्या ‘स्टार वॉर’ म्हणजे अवकाशातून आण्विक क्षेपणास्त्रे फेकू शकण्याच्या क्षमतेने अमेरिकन सैन्याला सुसज्ज केलं, त्यामुळेच एक प्रकारे नामोहरम होऊन गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत महासत्तेचं विसर्जन केलं, म्हणजेच १९४५ पासून सुरू असलेलं अमेरिका-रशिया यांच्यातलं शीतयुद्ध अमेरिकेने जिंकलं, तेव्हा अमेरिकेचा नायक होता रोनाल्ड रीगन. पण, त्यांचा कार्यकाळ १९८९ साली संपला. त्यामुळे १९९१ साली रशियाच्या ठिकर्‍या उडालेल्या पाहण्याचा सन्मान नवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश थोरले यांना मिळाला.
 
 
 
रशियाबरोबरचं शीतयुद्ध संपलं खरं; पण त्याच वर्षी अमेरिकेने इराकच्या सद्दाम हुसैनविरुद्ध युद्ध सुरू करून एक नवा शत्रू निर्माण केला. १९८९ ते १९९३ जॉर्ज बुश थोरले यांचा कार्यकाळ. मग १९९३ ते २००१ असे बिल क्लिंटन यांचे सलग दोन कार्यकाळ. अशा कालखंडांमध्ये इस्लामी दशहतवाद अधिकाधिक उग्र होत गेला. २००१मध्ये जॉर्ज बुश धाकटे यांचा कार्यकाळ सुरू होऊन फक्त नऊ महिने उलटलेले असताना तो दहशतवाद अमेरिकन भूमीवरच उतरला. ११ सप्टेंबर, २००१ या दिवशी इस्लामी अतिरेक्यांनी ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ या अमेरिकेच्या आर्थिक साम्राज्यावर आणि ‘पेंटेगॉन’ या सैनिकी साम्राज्यावर एकाच वेळी हल्ला केला. वर्ल्ड ट्रेड सेंटरची राखरांगोळी झाली. पण, पेंटेगॉन बचावलं. चवताळलेली अमेरिका इराक आणि अफगाणिस्ताणवर तुटून पडली. २००१ ते २००९ जॉर्ज बुश धाकटे यांचे सलग दोन कार्यकाळ झाले. मग २००९ ते २०१७ असे बराक ओबामा यांचे दोन सलग कार्यकाळ झाले. २०१७ ते २०२१ डोनाल्ड ट्रम्प झाले आणि आता जानेवारी २०२१मध्ये जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.
 
 
 
म्हणजे पुतिन १९९९पासून आजपर्यंत रशियातील सर्वोच्च स्थानावर घट्ट पकड ठेवून असताना अमेरिकेत क्लिंटन, बुश, ओबामा, ट्रम्प असे चार राष्ट्राध्यक्ष जाऊन आता पाचवे बायडन रिंगणात आले आहेत. अमेरिकेचे हे सगळे राष्ट्राध्यक्ष एकतर वकील आहेत. व्यावसायिक म्हणजे व्यापारी आहेत आणि राजकारणी नेते आहेत, म्हणजेच सिव्हिलियन किंवा नागरी पेशाचे लोक आहेत. या तुलनेत पुतिन हे रशियन लष्करात कर्नल होते. लष्करी मनुष्य म्हणजे सणकी डोक्याचा, अशी एक फारच चुकीची समजूत आपल्याकडे रूढ आहे. अत्यंत हुशार अशा कर्नल पुतिनला ‘के.जी.बी.’ या सोव्हिएत रशियन हेरखात्याने लष्करातून आपल्याकडे घेतलं. बोरिस येल्त्सिन यांनी त्यांना तिथून राजकारणात आणलं.
 
 
 
तात्पर्य, अमेरिका इस्लामी दहशतवादविरोधी युद्धात गुंतलेली असताना पुतिन शांतपणे आणि ठामपणे आपलं बळ वाढवत राहिलेले आहेत आणि अमेरिकेचा एकंदर प्रवास पाहता तिला रोनाल्ड रीगन यांच्यानंतर एकही कणखर राष्ट्राध्यक्ष लाभलेला दिसत नाहीये. अमेरिका महासत्ता आहेच. पण, तिच्या कुंकवाचा धनी तगडा भासत तरी नाही.
 
 
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर परवा 16 जूनला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची पहिली भेट जीनिव्हामध्ये झाली. बायडन यांनी जानेवारी २०२१ मध्ये सत्तासूत्रं हाती घेतली. जीनिव्हा हे स्वित्झर्लंड या निसर्गरम्य देशातलं शहर सतत कोणत्या ना कोणत्या बैठका, परिषदा यांनी गजबजलेलं असतं. रेड क्रॉस, संयुक्त राष्ट्रसंघ यांच्यासह असंख्य आंतरराष्ट्रीय संघटनांची मुख्यालयं किंवा विभागीय कार्यालयं त्या शहरात आहेत.
 
 
जीनिव्हा शहरातल्या 18व्या शतकात बांधण्यात आलेल्या ‘व्हिला-ल-ग्रेंज’ नावाच्या एका अतिशय सुंदर हवेलीत बायडन आणि पुतिन एकमेकांना भेटले. गेलं वर्षं-सव्वा वर्षं जगभरचे सगळे राजकारणी एकमेकांना भेटल्यावर कटाक्षाने हात जोडून नमस्कार करीत होते, कारण ‘कोविड’ संसर्गाची भीती. पण, या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. बायडन यांच्याबरोबर अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन, तर पुतिन यांच्याबरोबर रशियन परराष्ट्रमंत्री सर्जी लेव्हरोव्ह हे होते. हे चौघे जण आणि त्यांचे दुभाषे ‘व्हिला-ल-ग्रेंज’मधल्या ज्या आलिशान कक्षात संवाद करण्यासाठी बसले, त्या कक्षाच्या सर्व भिंती जमिनीपासून छतापर्यंत उत्तमोत्तम ग्रंथांच्या घडवंच्यांनी भरल्या होत्या. म्हणजे बैठक दोन राजकारण्यांची आहे की, विद्वान लेखक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यांची आहे, असा प्रश्न बघणार्‍यांना पडावा.
 
 
जानेवारी २०२१मध्ये राजसूत्रं हाती घेतल्यावर मार्च २०२१मध्ये राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी जाहीरपणे पुतिन यांना ‘खुनी’ म्हटलं. पुतिन यांचा एक राजकीय विरोधक बोरिस नेमत्सोव, रशियाचा माजी हेर सर्जी स्क्रिपाल आणि त्याची मुलगी, तसंच एका खून खटल्याला साक्षीदार डेनिस व्होरोनेन्कोव्ह यांचे खून पुतिन यांच्या आशीर्वादाने करण्यात आले, असं बायडन यांनी जाहीरपणे म्हटलं. ताबडतोब पुतिन यांनी वॉशिंग्टनमधला रशियन राजदूत अनातोली अँटोनोव्ह याला स्वदेशी बोलावून घेतलं नि मॉस्कोतला अमेरिकन राजदूत जॉन सुलिव्हान याची हकालपट्टी केली. अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच घडलेल्या या घटनांमुळे अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या संबंधात खूपच तणाव निर्माण झाला. राजदूताला मायदेशी परत बोलावणं, ही राजनैतिक वर्तुळात खूपच गंभीर चाल मानली जाते. कदाचित, ती युद्धाची पूर्वसूचनाही असू शकते आणि युद्ध कोणालाच नको आहे. त्यामुळे बायडन-पुतिन यांच्या या जीनिव्हा बैठकीबाबत सर्वत्र उत्सुकता होती.
 
 
प्रत्यक्षात बैठक ही जोरदार कुस्तीऐवजी खडाखडीची कुस्ती म्हणजे बेताबेताची सलामी झाली, असं दिसतं. बैठक चार-पाच तास चालेल, असं वाटत होतं. पण, ती जेमतेम तीन तासातच उरकली. नंतर दोघा नेत्यांनी एकत्र जेवणही केलं नाही, अगर एकत्र पत्रकार परिषदही घेतली नाही. दोघेही आपापल्या मुक्कामावर रवाना झाले.
 
 
पुढची चाल मात्र पुतिन यांनी अपेक्षित चपळाईने केली. त्यांनी एकट्याची स्वतःची पत्रकार परिषद बोलावली. पुतिन म्हणाले की, “आमच्यात अनेक बाबतीत मतभेद आहेत. पण, आम्ही एकमेकांना समजून घ्यायला उत्सुक आहोत, तसेच आमच्यातले मतभेद मिटवण्याचे मार्ग शोधण्याचीही आमची तयारी आहे. एकंदरीत आमची ही बैठक बर्‍यापैकी रचनात्मक झाली.”
 
 
एवढं सांगितल्यावर मग अमेरिकेच्या धोरणांबाबत जोरदार टोलेबाजी करताना पुतिन म्हणाले, “हे (म्हणजे अमेरिका) आम्हाला बेभरवशी म्हणतात, ठीक आहे. मग मला सांगा २००२ साली ‘अ‍ॅन्टी बॅलॅस्टिक मिसाईल’ करार कोणी मोडला?” १९७२पासून चालत आलेला वरील ‘ए.बी.एम. करार’ २००२ साली अमेरिकेने अचानकपणे रद्द केला. त्याला उद्देशून हा टोला होता.
 
 
ते पुढे म्हणाले, “मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून हे आम्हाला बोलतात. मग तुमच्याकडे ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चळवळ का उभी राहते?” अमेरिकन गोर्‍या पोलिसांनी एका अश्वेतवर्णीय नागरिकाला भररस्त्यावर ठार मारलं. त्यावर ही टिप्पणी होती.
 
 
“हे आम्हाला खुनी म्हणतात,” पुतीन पुढे म्हणाले, “मग नागरी वस्तीवर ‘ड्रोन’ विमानांमधून गोळीबार करून कित्येक माणसं ठार मारणं; ज्यात अनेक लहान मुलंसुद्धा होती, या कृत्याला तुम्ही काय म्हणाल?” अमेरिकन लष्कराने ‘ड्रोन’मधून गोळीबार करून अफगाण-पाक सीमेवरच्या खेड्यांमधल्या अनेक नागरिकांना ठार मारलं. त्या खेड्यांमधून तालिबानी अतिरेकी अमेरिकन सैन्यावर गनिमी हल्ले चढवत होते. या घटनांना उद्देशून हा फटका होता.
 
 
याउलट बायडन यांनी पत्रकारांना एवढंच सांगितलं की, “आमची बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. पण, आमच्या देशाच्या कारभारात कोणी ढवळाढवळ केली, तर आम्ही कठोर कारवाई करू.” अब देखते रहेंगे क्या होता हैं आगे-आगे।
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@