प्रेम अर्पावे ते, विचार व बुद्धिपूर्वक!

    16-Jun-2021
Total Views |

prem 2_1  H x W
 
 
गरज आहे ती प्रेम व सद्बुद्धी यांच्या सन्मिलनाची! या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील, तेव्हा निश्चितच सर्वांच्या मनातून द्वेषाची भावना नाहीशी होईल. सर्वजण बंधू-भगिनी बनून जीवन जगतील.
 
 
सहृदयं सांमनस्यमविद्वेषं कृणोमि व:।
अन्यो अन्यमभिहर्यत वत्सं जातमिवाघ्न्या॥(अथर्ववेद-३.३०.१)
 
अन्वयार्थ
 
परमेश्वर म्हणतो - मी (व:) तुम्हा सर्वांना (सहृदयम्) सहृदयी-हृदयाने युक्त, (सांमनस्यम्) सुमनाचा-चांगल्या मनाने परिपूर्ण आणि (अविद्वेषम्) द्वेषरहित (कृणोमि) बनवतो, करतो. (अन्य:) एका माणसाने (अन्यम्) दुसर्‍या माणसाशी (अभिहर्यत) असा प्रेमळ- व्यवहार करावा की, (इव) जशी (अघ्न्या) गाय (जातम्) आपल्या नवजात-नुकत्याच जन्मलेल्या (वत्सम्) वासरासोबत करीत असते.
 
विवेचन
 
या जगात मानव कितीही ज्ञानी असला, तरी तो अल्पज्ञच! त्याला इतरांच्या उपदेश किंवा मार्गदर्शनाची खूपच गरज असते. आपल्याकडील सीमित व अपूर्ण ज्ञानामुळे जो गर्विष्ठ बनून मजहुनी ज्ञानी कोण आहे, असेच जर म्हणत असेल तर त्याच्यासारखा शहाणा तोच! जे काही उपदेश दिले जातात, ते प्रत्यक्ष परमेश्वराकडून मानव समूहास किंवा एखाद्या गुरु, आचार्यांकडून आपल्या शिष्यांना अथवा वक्ता वा व्याख्यात्यांकरवी श्रोत्यांना! जेणेकरून मानवाचा सर्वदृष्टीने विकास होईल व त्याचे अल्पज्ञत्व गळून जाईल. सदर अथर्ववेदीय मंत्रात परमेश्वराकडून माणसाला अंतःकरणातील पावित्र्य जपण्याबरोबरच इतरांशी बुद्धी व विचारपूर्वक प्रेम-व्यवहार करण्याचा प्रेरक असा उपदेश मिळाला आहे.
 
भगवंत मानव समूहास संबोधित करताना म्हणतो आहे- ‘व: कृणोमि’ तुम्हा सर्वांना मी (निर्माण) करतो, बनवितो आहे. पण काय बनवतो? तर त्याचे उत्तर पहिल्या तीन शब्दांत आहे- सहृदयम्, सामंजस्यम् व अविद्वेषम्! माणसाला हृदयाने व मनाने परिपूर्ण बनवत त्याला सर्व प्रकारच्या द्वेष भावनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे. हृदय व मन तर सर्वांनाच दिले आहे. पण, सर्वांचीच हृदये व मने ही पवित्र असतील कशावरून ? हृदय हे प्रेमाचे प्रतीक, मन हे बुद्धीचे तर द्वेषरहितता हे विश्वहिताचे प्रतीक! या तिन्ही बाबींचा संगम असणे आवश्यक ठरते. सहृदयता म्हणजे प्रेम, दया, करुणा, ममता, वात्सल्य आणि पवित्रता! सांमनस्यता म्हणजे सद्बुद्धी, विवेक, सद्विचार, धार्मिकता आणि अविद्वेष्यता म्हणजे समग्र प्राणिमात्रांविषयी कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावनेचा अभाव. ज्यांच्या हृदयात इतरांविषयी प्रेमाची भावना नसेल, ज्यांच्या मनामध्ये प्रत्येक कार्याबाबत सद्बुद्धीचा विचार नसेल आणि ज्यांच्यात जगातील प्राणिसमूहांविषयी अविद्वेषाची भावना नसेल, तर त्यांचे जीवन व्यर्थच मानले जाते. यासाठी मानवाने स्वतःच्या हृदय, मन व भावनेला विशाल बनविले पाहिजे.
 
हृदयात प्रेम आहे, पण मनात सद्विचार व सद्बुद्धी नसेल तर जगाचे कल्याण होऊ शकत नाही. त्याचबरोबर माणूस चांगल्या बुद्धीने परिपूर्ण आहे, पण हृदय मात्र पाषाण आहे. यामुळेदेखील कोणाचेच भले होणार नाही. हृदयात प्रेम व मनात सद्विचारदेखील आहेत, पण अंतरंगात मात्र द्वेषाची ज्वाळा धकधकतेय. असे जीवन काय कामाचे ? म्हणूनच अल्पज्ञ मानवांकरिता स्वयंभू परमेश्वराचा हा त्रितत्त्व संगमाचा मौलिक उपदेश!
 
 
प्रेम असावे, पण विचार व बुद्धिपूर्वक! आपण सर्वांनी लहानपणी प्रेमळ अशा निर्बुद्ध नोकराची गोष्ट वाचलीच असेल. झोपी गेलेल्या राजाची प्रेमाने सेवा करणारा सेवक बाजूला पहारा देत बसलेला. इतक्यात एक माशी राजाच्या नाकावर बसते. आपल्या राजाची झोपमोड होऊ नये, म्हणून तो प्रेमाळू पण निर्बुद्ध असा सेवक हातात तलवार घेऊन त्या माशीला मारण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी घडते ते विपरितच! माशी उडून जाते आणि राजाच्या नाकाचा शेंडाच छाटला जातो. हृदयातील प्रेमभावनेबरोबरच मनात सद्विचार व सद्बुद्धी आवश्यक असते, तेव्हाच तर कामे यशस्वी ठरतात. आजपर्यंत बुद्धिहीन व विचारविहीन प्रेमांमुळे अनेक अनर्थ घडले आहेत. असंख्य आई-वडील आपल्या मुलांवर उदात्त विचारांअभावी केवळ मोहात्मक प्रेम करतात. हजारो तरुण-तरुणी फक्त विवेकहीन बाह्य प्रेमामुळे उद्ध्वस्त होतात. कधीही विचार करत नाहीत की आपल्या या वासनात्मक प्रेमामुळे आपल्या भविष्याचे काय होईल? असंख्य मित्रवर्ग असा आहे की, जो स्वार्थी विचाराने प्रेरित होऊन आपल्या मित्रावर प्रेमाचा वर्षाव करतो. मोठ्या प्रमाणात असा भक्त समुदाय आहे की, जो आपली अंधभक्ती प्रकट करीत बुवा, बाबा व गुरु लोकांवर आपली प्रेमश्रद्धा व्यक्त करतो. असे असंख्य देशभक्त सापडतील की, ज्यांनी बुद्धीचा वापर न करता केवळ प्रेम भावनेपोटी विदेशी शत्रूंना आपलेसे केले. परिणामी, हा देश कितीतरी वर्षे पारतंत्र्यात राहिला. यासाठीच गरज आहे ती प्रेम व सद्बुद्धी यांच्या सन्मिलनाची! या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील, तेव्हा निश्चितच सर्वांच्या मनातून द्वेषाची भावना नाहीशी होईल. सर्वजण बंधू-भगिनी बनून जीवन जगतील.
 
 
उपनिषदात आचार्य आणि शिष्य हे दोघेही व्रत धारण करीत म्हणतात- मा विद्विषावहै। आम्ही दोघे कधीही एक दुसर्‍यांचा द्वेष करणार नाहीत. प्रत्येक शाळा-महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी जेव्हा बुद्धिपूर्वक प्रेमाने व्यवहार करतील, तेव्हा निश्चितच द्वेष भावना लयास जाईल.
 
वेदमंत्रातील पहिल्या चरणाचा हा उदात्त भाव अंगी बाळगल्यास केवळ भारतातीलच नव्हे, तर विश्वातील प्रत्येक मानव आनंदी जीवन जगण्यास समर्थ होईल. मंत्राचा उत्तरार्ध पुढील अंकात पाहूया...(क्रमश:)
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य