मुंबई: घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे होत असलेल्या नव्या उड्डाणपुलाला सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यावरून मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘सोनिया मातोश्रीं’च्या चरणी गेल्यापासून शिवसेनेने ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगले’ अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी रविवार, दि. १३ जून रोजी केली.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे एक नवीन उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शेवाळे यांनी ही मागणी केली आहे. त्यासाठी शेवाळे यांच्याकडे मुस्लिम संस्थांकडून निवेदने आल्याचे त्यांनी सांगितले आहे. छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लीम असल्यामुळे या उड्डाणपुलास सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन मुस्लीम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.
राहुल शेवाळे यांच्या या मागणीवरून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून भातखळकरांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. “ ‘जय भवानी, जय शिवाजी’ पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा ‘हजरत टिपू सुलतान की जय’पर्यंत येतो तेव्हा अशा पत्रांचे आश्चर्य वाटत नाही. काँग्रेस, असरुदुद्दीन ओवेसींच्या मतपेढीला शिवसेनेने तीव्र स्पर्धा निर्माण केली आहे. सोनिया मातोश्रींच्या चरणी गेल्यापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगले आहे,” असे जहाल ट्विट भातखळकर यांनी केले.