‘ड्रोन’ विमानांचं आर्थिक गणित महागच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Drone_1  H x W:
 
 
विमानचालक विरहित विमान आपल्या किंवा शत्रूच्या प्रदेशावर पाठवायचं. त्याद्वारे टेहळणी, पाहणी, छायाचित्रण किंवा बॉम्बफेक करता येईल का? या ‘अन-मॅन्ड एरियल व्हेईकल’चं संचालन भूमीवरून रिमोट कंट्रोलद्वारे कसं करायचं? याबाबत जारीने संशोधन सुरू झालं. १९८०, १९९० आणि २०००च्या दशकांमध्ये हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत गेलं. त्यालाच आपण आज ‘ड्रोन’ तंत्रज्ञान म्हणतो.
 
 
 
राजीव हरिओम भाटिया म्हणजे कोण माहिताय तुम्हाला? १९८०च्या दशकाच्या मध्यापासूनच हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका प्रभावी गटाने अतिशय पद्धतशीरपणे एका विशिष्ट समाज गटातले तरुण ‘हिरो’च्या भूमिकेत ‘पेरायला’ सुरुवात केली. भोळ्याभाबड्या (पक्षी : बावळट) भारतीय जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं. या हिरोंना पुढे ‘खाना’वळ असं म्हणण्यात येऊ लागलं. या खानावळीच्या लोकप्रियतेला टक्कर देऊन उभे राहण्यात यशस्वी झालेल्या अगदी निवडक लोकांमधला एक म्हणजे राजीव हरिओम भाटिया किंवा अनेकांचा आवडता नट अक्षय कुमार.
 
 
अक्षयचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि चांगले कुस्तीगीर होते. अक्षय मुळात कराटे खेळाडू होता. पुढे त्याने ‘तायक्वांडो’ या कोरियन युद्ध कलेमध्ये ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवला. मात्र, १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा त्याने हिंदी चित्रपटात काम सुरू केलं, तेव्हा त्याच्या दिसण्यावर, कामावर सरळच अमेरिकन अभिनेता टॉम क्रूझ याची छाप होती. प्रेक्षक त्याला हिंदीतला टॉम क्रूझच म्हणायचे.
 
 
टॉम क्रूझ आज हॉलिवूडमधल्या सर्वाधिक मानधन घेणार्‍या नटांपैकी एक आहे. १९८६ साली त्याचा ‘टॉप गन’ हा चित्रपट पडद्यावर आला आणि एकच धमाल उडाली. एखाद्या चित्रपटाच्या, माध्यमांमध्ये येणार्‍या समीक्षणांबद्दल असं बोललं जातं की, निर्मात्याने ठेवलेली मेजवानी आणि तिच्यातील उत्तेजक पेये इत्यादी, ज्या समीक्षकांना आवडतात ते चित्रपटाबद्दल बरं लिहितात. ज्यांना पसंत पडत नाहीत, ते चित्रपटाला झोडून काढतात. तर या शिरस्त्यानुसार ‘टॉप गन’बद्दल त्यावेळी संमिश्र अभिप्राय आले. पण, आठवडाभरात एकाएकी अमेरिकन नौदल कार्यालयात एका मागोमाग एक दूरध्वनी खणखणू लागले. देशभरातून अनेक तरुण आणि तरुणी चौकशी करत होत्या की, “आम्हाला अमेरिकन नौदलाशी संबद्ध असलेल्या वायुदलात म्हणजे ‘नेव्हल एअर फोर्स’मध्ये भरती व्हायचंय, तेव्हा त्यासाठी काय प्रक्रिया आहे, ते सांगा.” अमेरिकन नौदलाचे भरती अधिकारी सांगतात की, “पुढच्या वर्षभरात नौदल भरतीसाठी येणार्‍या अर्जांमध्ये ५०० टक्क्यांनी वाढ झाली.” तरुणांना ‘टॉप गन’मधला नायक टॉम क्रूझ किंवा सहनायक व्हाल किल्मर यांच्याप्रमाणे ‘एफ-१४ टॉॅमकॅट फायटर जेट’ हे विमान चालवायचं होतं: तर तरुणींना नायिका केली मॅक्गिलिस हिच्याप्रमाणे विमानोड्डाण शास्त्रज्ञ बनायचं होतं. चित्रपट ही अत्यंत प्रभावी अशी दुधारी तलवार आहे. माफिया टोळ्यांवरचे चित्रपट बघून मुलांना गुंडगिरी करावीशी वाटते, तर सैनिकांचा पराक्रम बघून मुलांना सैन्यात भरती व्हावंसं वाटतं. अलीकडच्या काळातल्या जवळपास सर्व हिंदी-मराठी दूरदर्शन मालिका या अवैध स्त्री-पुरुष संबंध किंवा लग्न एवढ्याच विषयांभोवती का फिरत असतात, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पुराणकथांमध्ये देव, ज्यांनी दुष्टांच्या संहारासाठी अवतार घेतला होता, त्यांचं चरित्र दाखवतानासुद्धा युद्धाचा भाग थोडासाच दाखवून, दोन बायकांमधली त्यांची फरफट आणि त्यांच्या दरबारातली नाच-गाणीच दाखवली जातात. समाजाला पद्धतशीरपणे लंपट बनवण्याचा हा डाव असावा, असं भासतं.
 
 
असो. तर १९८६ साली ‘टॉप गन’ चित्रपट अवघ्या १५० लाख डॉलर्समध्ये तयार झाला आणि त्याने निर्मात्याला तब्बल ३,५७० लाख डॉलर्सचा घसघशीत नफा दिला. एखाद्या चित्रपटाने भरभरून कमाई केली की, त्याचा दुसरा भाग लगेच आणायचा, अशी हल्ली हॉलिवूडची पद्धत आहे. त्यानुसार ‘टॉप गन-२’ची जुळवाजुळव सुरू झाली. पण, काहीना काही कारणांनी हा चित्रपट गेली ३४ वर्षे लांबत गेला. अखेर ‘टॉप गन-मॅव्हरिक’ या नावाने तो २०२० साली पडद्यावर येणार, तोच कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे सध्या तरी, नोव्हेंबर २०२१मध्ये तो पडद्यावर येईल, असं जाहीर झालेलं आहे. ‘पॅरामाऊंट पिक्चर्स’ ही हॉलिवूडची प्रख्यात कंपनी त्याचं वितरण करणार आहे. या चित्रपटाला १,५२० लाख डॉलर्स एवढा निर्मिती खर्च आला आहे. यात टॉम क्रूझ ‘एफ-ए-१८-ई सुपर हॉर्नेट’ हे अमेरिकन नौदल वायुसेनेतलं सर्वाधिक नवं झुंजी विमान हाताळताना दाखवला आहे. १९८६च्या चित्रपटातील ‘एफ-१४ टॉमकॅट फायटर’ आणि आता या भावी चित्रपटातील ‘सुपर हॉर्नेट’ ही विमानं खरोखरच अमेरिकन नौदलात आहेत. पहिल्याची किंमत आहे ५०० लाख डॉलर्स आणि या नव्याची किंमत ६०० लाख डॉलर्स. ६००वर पाच शून्य, एवढी एका विमानाची किंमत! आणि अशी अनेक किंवा याहूनही भारी विमानं अमेरिकन सेनादलांकडे आहेत. आपण फक्त शून्य मोजू शकतो, नाही का? १९९१च्या पहिल्या आखाती युद्धात आणि २००३च्या दुसर्‍या आखाती युद्धात अमेरिकेने हा-हा म्हणता इराकी सैन्याचा सुपडा साफ केला होता, तो अशाच विमानांच्या आणि क्षेपणास्त्रांच्या बळावर. अमेरिकेच्या कजाखी अग्निवर्षावासमोर इराकी राजधानी बगदाद १५ दिवससुद्धा तग धरू शकली नव्हती. अमेरिका महासत्ता आहे, ती उगीच नव्हे!
 
 
आता धनाढ्य महासत्ता असो वा एखादा छोटा व्यापारी असो. खर्च कमी करून नफा कसा वाढवता येईल: किंवा वाचलेला पैसा अन्यत्र कसा गुंतवता येईल, असा विचार कुणीही करणारच. आता इतकं महाग असणारं एखादं विमान गेलं, तरी काही दशलक्ष डॉलर्स गेले. शिवाय ते हाताळणारा निष्णात विमानचालक जाणं, म्हणजे तर पैशांत न मोजता येणारं नुकसान. १९५९ सालच्या सुमारास अमेरिकन सेनाश्रेष्ठी याविषयी गंभीर विचार करू लागले. विमानचालक विरहित विमान आपल्या किंवा शत्रूच्या प्रदेशावर पाठवायचं. त्याद्वारे टेहळणी, पाहणी, छायाचित्रण किंवा बॉम्बफेक करता येईल का? या ‘अन-मॅन्ड एरियल व्हेईकल’चं संचालन भूमीवरून रिमोट कंट्रोलद्वारे कसं करायचं? याबाबत जारीने संशोधन सुरू झालं. १९८०, १९९० आणि २०००च्या दशकांमध्ये हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत गेलं. त्यालाच आपण आज ‘ड्रोन’ तंत्रज्ञान म्हणतो.
 
 
कोणत्याही देशाची सेनादलं नव्याने उपलब्ध झालेल्या यांत्रिक-तांत्रिक ज्ञानाला एका शिस्तबद्ध प्रणालीचं रूप देतात. तसं अमेरिकन सेनादलांनी माहिती काढणं, उघडपणे पाहणी करणं आणि छुपी टेहळणी करणं, या कामांसाठी एक प्रणालीच बनवली आहे. तिला म्हणतात ‘आयएसआर’ म्हणजे ‘इंटेलिजिन्स सर्व्हेलन्स अ‍ॅण्ड रीकनायसान्स सिस्टीम’ या प्रणालीत ‘ई-८’, ‘ई-३’, ‘आरसी-१३५’, ‘यू-२’ इत्यादी जुनी वैमानिक असणारी विमानंसुद्धा आहेतच. त्यांचा सरासरी वार्षिक खर्च दर विमानासाठी १२० लाख डॉलर्स एवढा आहे. तर या प्रणालीत आता नव्याने आलेल्या ‘एमक्यू ९ ए रिपर’ आणि ‘ग्लोबल हॉक’ या वैमानिकरहित ‘ड्रोन’ विमानांचा खर्च आहे, सरासरी वार्षिक ३० लाख डॉलर्स. म्हणजे फक्त पाचपट! साहजिकच सेनाश्रेष्ठींना फारच आनंद झाला. १०० डॉलर्सच्या ठिकाणी फक्त २५ डॉलर्सच खर्च झाले, तर कुणाला आनंद होणार नाही?
 
 
परंतु, आता परिस्थिती बदलत चालली आहे. याला कारण आहे अफगाणिस्तान, इराक, सीरिया आणि मध्यपूर्वेतील इतर देशांमधली युद्धमान स्थिती. अफगाणिस्तान किंवा इराकमधलं मोठं युद्ध अमेरिकेने जिंकलं. पण, तिथे शांतता निर्माण होऊन जीवन सुरळीत झालेलं नाही. तालिबान, ‘अल कायदा’ यांच्यानंतर आता ‘ईसिस’ किंवा तत्सम असंख्य गनिमी संघटना सतत आत्मघाती हल्ले, बॉम्बस्फोट, घातपात करीतच आहेत. सीरियात यादवी युद्धच सुरू आहे. येमेन वगैरे देशांमध्ये बंडखोर गट सतत उठाव करतच आहेत. ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ नंतर आता ‘हमास’ने इस्रायलविरुद्ध शस्त्र उपसलं आहे. अशा सर्व ठिकाणी अमेरिकन सैन्यदलं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने गुंतलेली असतातच, कारण अमेरिकेला मध्यपूर्वेतून होणारा स्वस्त तेलाचा पुरवठा अखंडित चालू राहायला हवा आहे.
 
 
आता या सर्व प्रदेशातील सर्व शत्रू आणि मित्रांच्या एकूण एक हालचालींचा ‘इंटेलिजन्स’, ‘सर्व्हेलन्स’ आणि ‘रीकनायसान्स’ करण्यासाठी ‘ड्रोन’ विमानं अखंड २४ तास फिरती ठेवावीत, अशी संबंधित क्षेत्रांच्या सेनापतींनी योजना केली. कधी खर्चाचा आणि कोणत्याही मनुष्यहानीचा धोका नसणारा हा मार्ग खरोखरच उत्तम होता. पण...!
 
 
पण, अखेर माणूस आणि त्याची विवेकबुद्धी यांना पर्याय नाही. मंत्र आणि तंत्र स्वस्त भासली, तरी ती मानवी बुद्धीला पर्याय ठरू शकत नाहीत. हे पुन्हा एकदा समोर आलं. ‘सेंटर ऑफ स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडीज’ आणि ‘रँड कॉर्पोरेशन’ या दोन अध्ययन संस्था किंवा अमेरिकन परिभाषेत ‘थिंक टँक’नी ‘ड्रोन’ विमानांच्या या सगळ्या योजनेचा अभ्यास केला. त्यांना असं आढळलं की, मानवी व्यवस्था किंवा वैमानिकसहित हवाई पाहणी व्यवस्था यांच्यापेक्षा ही ‘ड्रोन’ व्यवस्था दिवसेंदिवस फारच खर्चिक होत चालली आहे.
 
 
समजा, मध्यपूर्वेतलं एक संवेदनशील ठिकाण आहे. तिथे प्रत्यक्ष माणूस पाठवून माहिती, पाहणी, गुप्त माहिती मिळवणं, हे सर्वात स्वस्त. पण, तो काळ मागे पडला. वैमानिकासहित विमानातून हीच सगळी कामं करण्यावर मर्यादा येतात. वैमानिक अमर्याद काळ त्या ठिकाणावर घिरट्या घालू शकत नाही. तसंच खालून शत्रू ते विमान पाडण्याचा धोका आहेच. आता संबंधित सेनापतीने जर २४ तास त्या ठिकाणावर ‘ड्रोन’ फिरवत ठेवायचं ठरवलं, तर एका ड्रोनची सहा तासांची फेरी या हिशोबाने त्याला २४ तासांना चार ‘ड्रोन्स’ लागतील. पण, त्याचवेळी भूमीवरून त्या चार ‘ड्रोन्स’ना हाताळणारी ४९ माणसं लागतील आणि ते चार ‘ड्रोन्स’ भूमीवर उतरल्यापासून पुन्हा उड्डाण करण्याच्या स्थितीत आणण्यासाठी म्हणजेच आवश्यक ती दुरुस्ती-देखभाल यासाठी ५९ माणसं लागतील. शिवाय त्या २४ तासांमध्ये त्या ‘ड्रोन्स’नी मिळवलेली माहिती म्हणजे छायाचित्रं, चित्रफिती इत्यादींचा नीट अभ्यास, विश्लेषण, पृथक्करण करणं, अनावश्यक माहिती बाजूला ठेवून आवश्यक ती गंभीर संवेदनशील माहिती तातडीने वरिष्ठांसमोर ठेवणं, वरिष्ठांनी त्यावर तातडीने निर्णय घेऊन त्वरित आवश्यक ती कारवाई करणं, या सगळ्या कामांसाठी कुशल व्यक्तींची गरज आहे. कुशल व्यक्ती नेमणं म्हणजे खर्चात वाढ ओघाने आलीच.
 
 
तेव्हा ‘ड्रोन्स’मुळे खर्च कमी झालेला नसून, उलट वाढलेलाच आहे. जोपर्यंत मानवी बुद्धीप्रमाणे काय आवश्यक आणि काय अनावश्यक, याचा निर्णय संगणकाची कृत्रिम बुद्धिमत्ता-‘आर्टिफिशियल इंटेजिलन्स’ करू शकत नाही, तोपर्यंत खर्च वाढतच राहणार. हा: एक मोठा फायदा नक्कीच आहे. विमानाबरोबर वैमानिक ठार झाल्यामुळे जी मानवी जीवनाची अमूल्य हानी होते, ती नक्कीच टळेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@