इतरांच्या मुलांना आपले मानून त्यांना आईबाबा मिळावे, याकरिता नि:स्वार्थीपणे धडपडणारी अनाथांची जननी म्हणजे डोंबिवलीतील ‘जननी आशिष’ या संस्थेच्या डॉ. कीर्तिदा प्रधान. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
डॉक्टर म्हणजे खर्या अर्थाने देवदूत. डॉक्टर म्हणजे विश्वास आणि दिलासा. अशा व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. कीर्तिदा प्रधान यांनी रुग्णसेवा करताना ‘जननी आशिष’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलांना त्यांच्या हक्कांचे आईवडील मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कुमारी माता’ म्हणून आईने पालकत्व नाकारलेल्या, गरिबीमुळे पालकांनी रस्त्यावर सोडलेल्या शेकडो मुलांना ’जननी आशिष’ या संस्थेच्या माध्यमातून मायेचे आणि आधाराचे छत्र लाभले आहे.
कीर्तिदा यांचे बालपण मुंबईत सी. पी. टँक परिसरात गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण ‘जय हिंद महाविद्यालया’त झाले आणि पुढे ‘जी. एस. मेडिकल महाविद्यालया’त त्यांना गुणवत्तेवर प्रवेश मिळाला. त्याकाळी ‘पीसीबी’वर प्रवेश निश्चित केला जात होता. ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नाक, कान आणि घसा यात तज्ज्ञता प्राप्त केली. कीर्तिदा या अभ्यासात खूप हुशार होत्या. मेडिकल क्षेत्रात त्यांनी अनेक प्रकारचे अभ्यासक्रमही पूर्ण केले. परदेशात जाऊन ‘एफआरसीएस’ केले. परदेशातून परत आल्यावर केईएम रुग्णालयात वरिष्ठ अधीक्षक हे पदही त्यांनी भूषविले. ‘सेंच्युरी रेयॉन’मध्ये त्यांनी ‘प्रॅक्टिस’ केली. डॉ. कीर्तिदा यांनी टीव्हीवर एक बातमी पाहिली. एका मुलाला चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्याचा हात कापण्याची वेळ आली. ही बातमी ऐकून त्यांचे मन हेलावले. ज्या मुलावर ही वेळ ओढावली होती, त्याला पालक नव्हते. मग त्याच्यासाठी कोण भांडणार? कोण लढा देणार? अशा निराधारांना कोण आधार देणार? अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्या मनात काहूर माजले अन् त्यांच्या ममत्वाला पाझर फुटला. या मुलांसाठी काहीतरी करायला हवे, असे त्यांना वाटू लागले. निराधार मुलांना सांभाळणे अवघड काम आहे. पण, एखादे काम करायचे ठरविले तर कोणतीच गोष्ट कठीण नसते. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. या निराधार मुलांचे त्यांनी संगोपन करण्याचा निर्णय घेतला.
मुलांचे संगोपन करण्याचा केवळ निर्धार करून भागणारे नव्हते. त्यासाठी जागा आणि आर्थिक व मनुष्यबळाची गरजही होतीच. कीर्तिदा यांच्या घरी त्यांच्या काही मैत्रिणींची बैठक झाली. सधन घरातील त्यांच्या २१ मैत्रिणींनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी सहकार्याचा हात दिला. यातूनच ’जननी आशिष’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. डॉ. कीर्तिदा यांचा समाजोन्नतीचा हा उदार हेतू लक्षात घेऊन माजी मंत्री नकुल पाटील यांनी त्यांना जागा मिळवून देण्यासाठी मदत केली. कीर्तिदा आणि त्यांच्या २१ मैत्रिणींनी पैसे काढून जागा खरेदी घेतली. जागा मिळाली, पण तरीही इमारत उभी करण्यासाठी खर्च येणार होता. एक संस्था उभी करताना अनेक अडचणींतून त्यांना मार्ग काढावा लागत होता. इमारत उभी करण्यासाठी त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले, वर्गणी गोळा केली. मुख्य न्यायधीश पी. एन. भगवती यांच्या हस्ते १९९३ मध्ये संस्थेचा शुभारंभ झाला. अनेक अनाथांच्या डोक्यावर मायेचे छत्र धरणारी ही इमारत आजही मोठ्या डौलाने उभी आहे. संस्थेच्या इमारतीचाही आता विस्तार होत आहे. कायम विना-अनुदानित तत्त्वानुसार संस्था सुरू करण्याच्या अटींवर मान्यता मिळाली. गेली २८ वर्षे ही संस्था निराधार मुलांना आईवडील आणि त्या आईवडिलांच्या पदरी पालकत्वाचे दान टाकते.डॉ. प्रधान म्हणतात की, “आपल्या मुलांवर तर सगळेच प्रेम करतात, पण याच प्रेमातून निराधार मुलांना थोडी आर्थिक मदत केली, तर त्यांनाही स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहता येईल. तुमच्या या कृतीतून प्रेम, आपलुकी आणि परोपकाराचे नकळतपणे संस्कार तुमच्या मुलांवर होतील.”संस्थेची क्षमता 25 मुलांची आहे. मात्र संस्थेत सध्या ३५ मुले आहेत. संस्थेत येऊन मुलांचे वाढदिवस साजरे करा. त्यांना वस्तू स्वरूपात भेट म्हणून द्या, असेही कीर्तिदा आवाहन करतात.
‘कोविड’ काळात संस्थेला येणार्या मदतींचा ओघ कमी झाला आहे. संस्थेच्या गुंतवणुकीतून त्यांचा खर्च करावा लागत आहे. बँकेतील ‘एफडी’ मोडावी लागत आहे. ‘कोविड’ काळात आपले पालक गमावलेल्या मुलांना बेकायदेशीररीत्या दत्तक देणे आणि घेणे हे योग्य नाही. त्यात ‘कोविड’ काळात पालकांचा मृत्यूमुळे मुले अनाथ होण्याची समस्या गंभीर झाली आहे. मुले बेकायदेशीर दत्तक दिल्याने भविष्यात गंभीर समस्येलाही तोंड द्यावे लागू शकते. त्यात न्यायालयाशिवाय दत्तक मुले देणे, ही प्रक्रियाच पूर्ण होत नाही, असे कीर्तिदा सांगतात.सध्या मुलांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने दत्तक दिले जाते. ‘ऑनलाईन’ ही पद्धत चांगली आहे. या पद्धतीतून फसवणुकीचे प्रकार रोखण्यास मदत झाली आहे. ‘कोविड’मुळे ही दत्तक देणे आणि घेणे ही प्रक्रिया थांबलेली नाही. आजही मुलांना दत्तक घेतले जात आहे. पालक मुलांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने पाहू शकतात. त्यामुळे पालक आणि मुलांची भेट होते. दत्तक प्रक्रिया ‘कोविड’ काळातही सुरू आहे. निराधार मुलांसाठी डॉ. कीर्तिदा यांची प्रेमळ धडपड गेल्या २८ वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या या कार्याला आणि पुढील वाटचालीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम...!