व्याधिग्रस्त रुग्णांमध्ये चैतन्य फुलवत त्यांची सेवा करणार्या नाशिक येथील डॉ. चैतन्य बुवा यांच्या कार्याविषयी...
समाजात डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यांचे अनेक प्रवाह आपणास दिसून येतात. रुग्ण हा केवळ आजार बरे होण्याकामी डॉक्टरकडे जात नसतो, तर त्या भेटीतून रुग्णाच्या मनात निर्माण होणारी आत्मविश्वासाची भावना हीच खर्या अर्थाने रामबाण औषध असते. व्याधिग्रस्त रुग्णांमध्ये चैतन्य फुलविणे हेच वैद्यकीय क्षेत्राचे कार्य आहे. हे कार्य एक व्यावसायिक नव्हे, तर एक सेवकच करु शकतो.
नाशिक येथील डॉ. चैतन्य बुवा हे कार्य अत्यंत समाधानाने आणि प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्यामुळे ते वैद्यकीय व्यावसायिक न ठरता, एक सेवकच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरु नये. सांगली जिल्ह्यातील जतच्या डॉ. बुवा यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. शिक्षकी पेशात असलेल्या आईवडिलांचे सामाजिक जाणिवेचे संस्कार त्यांच्यावर बालवयातच झाले. त्यांनी सोलापूर येथून ‘एमबीबीएस’, ‘एमडी’ (मेडिसिन)पर्यंतचे शिक्षण घेतेले. ‘एंडोक्रायनोलॉजी’ (हार्मोन्स सायन्स) या विषयात त्यांनी ‘सुपर स्पेशलायजेशन’ केले. ग्रामीण भागात बालपण गेल्याने नागरिकांना भेडसावणार्या आरोग्य समस्या डॉ. बुवा यांनी जवळून अनुभवल्या. त्यामुळे सामाजिक सेवा आणि स्वास्थ्य यासाठी वैद्यकीय क्षेत्र हा एक उत्तम मार्ग असल्याचे डॉ. बुवा यांना जाणवले. तसेच, सामाजिक जाणिवांचे बाळकडू ज्या माता-पित्यामार्फत डॉ. बुवा यांना प्राप्त झाले होते, त्यांचीदेखील हीच इच्छा होती. त्यामुळे अनेक पर्याय उपलब्ध असतानादेखील त्यांनी वैद्यकीय क्षेत्राची निवड केली.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. नोकरीनिमित्त नाशिकला आलेले डॉ. बुवा येथील वातावरणात रमले ते कायमचेच. जगभरात अनेक आजार असून त्यावर उपचार करणारे तज्ज्ञदेखील आहेत. मात्र, बहुतांश आजाराचे मूळ हे मधुमेह आणि हार्मोन्समध्ये होणारे किंवा झालेले बदल हे असतात. मधुमेह या आजारावर अजून बरेच काम होणे बाकी आहे. मधुमेह हा खर्या अर्थाने व्यक्तीला आतून पोखरत असतो. त्यामुळे त्याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात आपल्या राज्यात मधुमेहाबाबत फारशी जागृती नाही. वेळीच त्यावर उपचार झाले, तर पुढील अनेक आरोग्यसमस्या या आटोक्यात आणणे सहज शक्य होते. मधुमेह उपचार पद्धती ही उपशाखा नाही. बर्याचदा मधुमेहग्रस्त व्यक्तीला कोणताही त्रास होत नसतो. मात्र, तो आजार त्याचे काम करत असतो. अशा वेळी सामाजिक स्वास्थ्य उत्तम राखण्याकामी डॉ. बुवा यांनी या क्षेत्राला आपल्या सेवेचे माध्यम बनविले. नागरिकांमध्ये सजगता निर्माण व्हावी, यासाठी ते या क्षेत्रात झोकून देऊन कार्यरत आहेत.
सध्या कोरोनाकाळात अनेक आव्हानांचा सामना वैद्यकीय क्षेत्राही करावा लागत आहे. तसेच या काळात मधुमेह असणार्या कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करताना किंवा कोरोना बरा झालेल्या मधुमेहग्रस्तांना उपचार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात ज्यांना ‘इन्सुलिन’ची गरज नसणार होती, अशा रुग्णांनादेखील ते द्यावे लागते, असे डॉ. बुवा सांगतात. जे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, अशा रुग्णांच्या घरातील व्यक्तींना त्यांनी रुग्णाची काळजी कशी घ्यावे, यासाठी पुढाकार घेत डॉ. बुवा यांनी प्रशिक्षित करण्याचे काम केले आहे. वैद्यकीय व्यवसायाच्या सध्या दोन बाजू समोर येत आहेत, आपण याकडे कसे पाहता असे डॉ. बुवा यांना विचारले असता ते सांगतात की, “डॉक्टर यांना देव म्हणणे चुकीचे आहे. तसेच त्यांच्यावर विनाकारण आरोप करणेदेखील चुकीचे आहे. समाजात काही अपवाद असतात. जेव्हा एखादा डॉक्टर चुकतो, तेव्हा तो कदाचित माणूस म्हणून चुकत असेल. डॉक्टरचे खरे समाधान हे रुग्ण बरे होण्यात आहे. आज भारत आणि भारतातील डॉक्टर हे आपापल्या परीने प्रयत्न करत कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.”
एका रुग्णास हार्मोन्सबाबत अनेक समस्या होत्या. त्यामुळे खुजेपण, इतर शारीरिक वाढ यामुळे तो रुग्ण त्रस्त होता. त्याचे डॉ. बुवा यांनी उपचार केले असता त्याच्या जीवनात नवचैतन्य फुलले. त्या रुग्णाने श्रद्धास्थान आणि नवजीवन दिल्यामुळे डॉ. बुवा यांचा फोटो आपल्या पाकिटात ठेवण्याची मनीषा व्यक्त केली. हा प्रसंग वैद्यकीय सेवकाचे आपल्या सर्वांच्याच जीवनात असणारे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. त्यामुळे आपण अपवाद पाहणार की उत्तमाची आराधना करणार, हे आपल्या हातात आहे, हेच यावरून सांगावेसे वाटते. “कोरोनाकाळात रुग्णांची बदलणारी मानसिकता हे सध्या सर्वात मोठे आव्हान आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही केवळ एकटेच नाही तर सर्व समाज विविध समस्यांत आहे,” असे सांगत डॉ. बुवा आपल्या रुग्णांच्या समुपदेशनावर भर देत आहेत. तसेच त्यांच्या ‘साथ फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून आगामी काळात रुग्ण व समाज यासाठी सेवा देण्याचादेखील त्यांचा मानस आहे. आपुलकी भावनेतून विचार आणि सेवा केल्यास नक्कीच रुग्णसेवा साधता येते. हेच डॉ. बुवा यांच्या कार्यातून दिसून येते. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!