जगाला चिंता ‘सायबर’ हल्ल्यांची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2021   
Total Views |

Cyber _1  H x W




माहिती-तंत्रज्ञान युगात पारंपरिक युद्धापेक्षा सायबर हल्ल्यांना हल्ली महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जगातील विविध देशांसमोर आता ‘सायबर’ हल्ल्यांचे नवे संकट घोंघावत आहे. होणारे सायबर हल्ले हा सध्या एक मोठा गंभीर प्रश्न म्हणून समोर येत आहे. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेणार्‍या भारतालाही आता नव्याने काही कायदे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
 
 
 
अमेरिकेमधील सर्वात मोठ्या इंधन पाईपलाईनवर नुकताच सायबर हल्ला करण्यात आला. त्यानंतर संबंधित भागात आणीबाणी लागू करण्यात आली. ‘कोलेनियल’ पाईपलाईनवर हल्ला करण्यात आल्याने अमेरिकेतील पूर्व किनारपट्टीकडील राज्यांत डिझेल, गॅस आणि जेट इंधनाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. कारण, या पाईपलाईनच्या माध्यमातून दररोज २५ लाख बॅरल तेलाचा पुरवठा करण्यात येत असतो. यापैकी ४५ टक्के पुरवठा हा पूर्व किनारपट्टी भागात होत असतो. ’डार्कसाईड’ नावाने एका हॅकर टोळीने हा हल्ला केला असल्याचे समोर येत आहे.
 
 
 
पोलिसांच्या तपासातून हॅकरची टोळी उघडकीस आली आणि तातडीने कारवाईदेखील करण्यात आली. ‘डार्कसाईड’ सायबर गुन्हेगारी जगातील सर्वच देशांना माहीत आहे, असे नाही. परंतु, ‘रॅन्समवेअर’सारखे हल्ले कोणत्याही उद्योगापुरते किंवा कार्यालयापुरते मर्यादित राहत नसून, कोणत्याही देशाची औद्योगिक व्यवस्था मोडकळीस आणण्याचे कामदेखील ते करू शकतात आणि हे यापूर्वीदेखील विविध प्रकरणांतून सिद्ध झाले आहे. लंडन येथील ‘सायबर’ सिक्युरिटी कंपनीच्या मते ‘डार्कसाईड’ ही व्यावसायिक कंपनीप्रमाणे काम करते, जी चोरी आणि ‘हॅकिंग’साठी ‘सॉफ्टवेअर’ तयार करते, यानंतर ती कंपनी गुन्ह्यात सामील होणार्‍या सहकार्‍यांना प्रशिक्षण देते आणि सायबर हल्ला कसा घडवून आणायचा, याचे तंत्र शिकवते.
सध्या कोरोना संसर्गामुळे शेकडो इंजिनिअर ’वर्क फ्रॉम होम’ करत आहेत आणि ‘पाईपलाईन कंट्रोल सिस्टीम’वर घरातूनच लक्ष ठेवत आहेत. याचा गैरफायदा ‘सायबर’ गुन्हेगार घेत आहेत. ‘सायबर’ हल्ला अमेरिकेत झाला असला, तरी तो जगभरासाठी धोक्याची घंटा नक्कीच ठरू शकत असतो. भारतातही वेगाने ‘डिजिटायजेशन’ होत असताना अशा प्रकारचे हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वीच चीनच्या हॅकर्सनी भारतातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘भारत बायोटेक’ या लसनिर्मात्या कंपन्यांवर ‘सायबर’ हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबईत ‘पॉवर ग्रीड’ ‘फेल’ होण्याची घटना घडली होती आणि त्यामुळे मुंबईत काळोख दाटला होता.
 
 
अमेरिकेच्या ‘मॅसाच्युसेट्स’ येथील ‘सायबर सिक्युरिटी’ कंपनीने ‘रेकॉर्डेड फ्युचर’ने अहवालात म्हटले की, चिनी सरकारचे पाठबळ असलेल्या ‘हॅकर’च्या एका गटाने ‘मालवेअर’च्या माध्यमातून मुंबईतील ‘पॉवर ग्रीड’ला ‘टार्गेट’ केले होते. अर्थात, केंद्र सरकारने अशा प्रकारच्या ‘सायबर’ हल्ल्याला दुजोरा दिला नव्हता. बहुतांश सायबर हल्ले हे बँकिंग आणि विमा क्षेत्राशी निगडित कंपन्यांवर झाले. २०२० मध्ये आशियात झालेल्या एकूण ‘सायबर’ हल्ल्यात सात टक्के हल्ले भारतीय कंपन्यांवर झाले. सायबर हल्ले कोणत्याही मार्गाने आणि पद्धतीने होऊ शकतात. जसे की, ‘संकेतस्थळ डिफेसिंग.’ यात कोणत्याही सरकारी संकेतस्थळाला ‘हॅक’ करून त्याची रचना बदलता येते. यावरून एखादे संकेतस्थळ सायबर हल्ल्याला बळी पडले आहे, असे कळते. दुसरा मार्ग म्हणजे ‘फिशिंग अटॅक.’
 
 
 
यात हॅकर ई-मेल किंवा मेसेजच्या माध्यमातून लिंक पाठवतो आणि त्यावर क्लिक करताच संगणक किंवा संकेतस्थळाचा सर्व ‘डेटा’ हा लिंक होऊन हॅक केला जातो. याशिवाय ‘बॅकडोअर अटॅक’देखील एक मार्ग आहे. यात संगणकात एक ‘मालवेअर’ पाठवण्यात येतो. या आधारावर ग्राहकांची सर्व माहिती ‘हॅकर’ काढून घेतात. ‘सायबर’ हल्ल्यांचा सामना करण्यासाठी भारतात दोन संस्था आहेत. ‘सीईआरटी’, त्यास ‘कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीम’ या नावाने ओळखले जाते. दुसरी संस्था म्हणजे ‘नॅशनल क्रिटिकल इन्फर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर.’ ती संरक्षण, दूरसंचार, परिवहन, बँकिंग आदी क्षेत्रांत ‘सायबर’ सुरक्षेसाठी बांधील आहे. ही संस्था २०१४ पासून कार्यरत आहे. भारतात आतापर्यंत सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात नाही. सध्या अशी कारवाई माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार करण्यात येते. तेव्हा, आधुनिक काळात घोंघावणार्‍या या संकटाचा सामना करण्यासाठी भारत आणि जगातील देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@