जेरुसलेमची हवा, कायमच गरम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

jeru_1  H x W:
 
 
जगभरातून ज्यू लोक ‘वेलिंग वॉल’वर माथा टेकवायला जातात. या सगळ्या प्राचीन पवित्र स्थानांना धारण करून उभ्या असलेल्या ‘माऊंट मोरिया’ला आज म्हणतात ‘टेंपल माऊंट.’
 
 
दख्खनच्या इतिहासात पुणे प्रांताला म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्राला फार महत्त्व होतं. भीमा नदीच्या खोर्‍यात असलेला हा भूभाग लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा, मोक्याचा होता, आजही आहे. किल्ले सिंहगड किंवा कोंडाणा हे त्या पुणे प्रांताचं हृदय होतं. म्हणून किल्ले कोंडाण्यासह पुणे प्रांत आपल्या ताब्यात राहावा, यासाठी निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही आणि मराठेशाही यांच्यात सतत संघर्ष चालू असलेला आपल्याला दिसतो. एकाला तो भाग आपल्या ताब्यात हवा असायचा आणि दुसर्‍याला तो आपल्या ताब्यातून सोडायचा नसायचा. मग घमासान लढाया व्हायच्या.
 
 
अगदी तोच प्रकार जेरुसलेम हे शहर आणि इस्रायल देशाचा भूभाग यांच्याबाबत आहे. इस्रायल म्हणजेच पॅलेस्टाईनच्या भूमीत युरोप, आफ्रिका आणि आशिया या तिन्ही खंडामधून येणारे समुद्री नि खुष्कीचे मार्ग एकमेकांना भेटतात. या तिन्ही खंडांमधले व्यापारी आपापल्या भूमीतला नानापरींचा माल उंटांवर, खेचरांवर, गाढवांवर आणि बैलांवर लादून इथूनच पुढे सरकायचे. व्यापारी तांड्यांच्या संरक्षणासाठी साहजिकच लष्करी ठाणी नि लष्करही आलंच.
 
 
तसंच हे पॅलेस्टाईन भूमीतलं सर्वात प्राचीन ठाणं म्हणजे शहर जेरुसलेम. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते हे शहर इसवी सन पूर्व ३००० या काळात म्हणजेच आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी वसलं असावं. युरोपीय विद्वान ज्याला ‘मध्यपूर्व’ असं म्हणतात आणि आपण ज्याला ‘पश्चिम आशिया’ असं म्हणतो, त्या भूभागात गेल्या पाच हजार वर्षांच्या काळात अनेक संस्कृती नि अनेक राज्य उदयाला आली. त्या प्रत्येकाने पॅलेस्टाईनसह जेरुसलेमवर कब्जा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि मिळवलासुद्धा.
 
 
ज्यू किंवा यहुदी या नावाने जो उपासना संप्रदाय ओळखला जातो, त्यांची अशी परंपरागत श्रद्धा आहे की, मोझेस या महापुरुषाने ज्यू लोकांना ईजिप्तच्या फारोह राजांच्या गुलामगिरीतून सोडवून पॅलेस्टाईनमध्ये आणून वसवलं. त्यांच्या श्रद्धेनुसार मोझेसचा कालखंड आहे इ. स. पूर्व १३६१ ते इ. स. पूर्व १२७१.
 
 
मोझेसने पॅलेस्टाईनमध्ये आणलेल्या या ज्यू लोकांनी आपलं एक प्रबळ राज्य उभं केलं. त्यांचा सगळ्यात प्रसिद्ध आणि बलवान राजा म्हणजे डेव्हिड. ज्यू पुराणांनुसार राजा डेव्हिडचा कालखंड इ. स. पूर्व १००० हा होय. राजा डेव्हिडने प्रजेला सुखी केलं, शत्रूंना नमवलं वगैरे तर झालंच; पण त्याने एक फार महत्त्वाची गोष्ट करायला सुरुवात केली. राजधानी जेरुसलेमच्या पूर्व भागात एक टेकडी होती. तिचं नाव ‘माऊंट मोरिया.’ या टेकडीवर एक अत्यंत पवित्र असा खडक किंवा दगड होता. इस्रायलमध्ये पुष्कळ छोट्या टेकड्या, डोंगर आहेत. त्यातला सगळा दगड मात्र चुनखडीचा आहे. खडक किंवा दगड म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जसा काळा कभिन्न खणखणीत बेसॉल्ट दगड येतो, तसा तो नाही, तर ‘माऊंट मोरिया’वरच्या या दगडावर म्हणे परमेश्वराने सृष्टी रचनेला सुरुवात केली, म्हणजे परमेश्वराने प्रथम माती घेतली तिची एक पुरुष मूर्ती बनवली. तिच्यात प्राण फुंकले आणि पृथ्वीवरचा पहिला मानव अस्तित्वात आला. त्याचं नाव अ‍ॅडम. मग परमेश्वराने त्या अ‍ॅडमची एक बरगडी काढली आणि तिचा स्त्री आकार बनूवन तिच्यातही प्राण फुंकले. ही पृथ्वीवरची पहिली स्त्री. तिचं नावं ईव्ह. या दोघांपासून पुढे मानवजात चालू झाली. म्हणजे हा खडक हेच अवघ्या मानवजातीचं जन्मस्थान आहे, असं ज्यू पुराणं म्हणतात.
 
 
आता राजा डेव्हिडने असं ठरवलं की, मोरियावरच्या या खडकाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्यावर एक भव्य मंदिर बांधायचं. त्याने पहिलं काम हे केलं की, टेकडीच्या सर्व अंगांना दगडमातीचे प्रचंड भराव टाकून टेकडीला एक बर्‍यापैकी समतल सपाट असं पठार बनवलं. एवढं होईपर्यंत त्याचं आयुष्य संपलं. मग त्याचा मुलगा राजा सॉलोमन याने मात्र बापाच्या इच्छेनुसार त्या खडकावर एक फारच टोलेजंग मंदिर बांधलं.
 
 
ही घटना ख्रि. पू. ९५७ या सालची. आणखी ४०० वर्षे उलटली. जवळच्या बॅबिलोनिया म्हणजे आजचा इराक, त्याचा राजा नेबुचाडनेझार याने जेरुसलेम जिंकलं आणि राजा सॉलोमनचं हे प्रसिद्ध मंदिर पाडून टाकलं, ही घटना ख्रि. पू. ५८७ या सालची. या नंतरच्या काळात आशिया खंडात पर्शियन साम्राज्य आणि युरोपात ग्रीक गणराज्यं यांचा उत्कर्ष सुरू झाला. सॉक्रेटिस हा प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता होता. त्याचा शिष्य प्लेटो नि प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल, अ‍ॅरिस्टॉलचा शिष्य मॅकेडोनियाचा राजा अलेक्झांडर हा तत्वज्ञ नसून युद्धखोर होता. त्याने भूमध्य समुद्रात मुसंडी मारून प्रथम पॅलेस्टाईन जिंकला. मग पुढे बॅबिलोनिया, पर्शिया जिंकत तो थेट भारतापर्यंत पोहोचला, तर या अ‍ॅरिस्टॉटलची आणि पॅलेस्टाईनच्या काही ज्यू लोकांची गाठ पडली असता त्यांनी अ‍ॅरिस्टॉटलला सांगितलं की, “आम्ही मूळचे भारतातले आहोत. कित्येक शतकांपूर्वी आम्ही भारतातून बाहेर पडून इकडे भूमध्य सागरी प्रदेशात आलो.” अ‍ॅरिस्टॉटलचा कालखंड इ. स. पूर्व ३८४ ते इ.स. पूर्व ३२२ असा आहे.
 
 
पुढे इसवी सन पूर्व पहिल्या शतकात पॅलेस्टाईनमध्ये हेरॉड नावाचा राजा झाला. नेबुचाडनेझारने उद्ध्वस्त केलेलं खडकावरचं मंदिर त्याने पुन्हा बांधलं. यानंतर सुरू झाला रोमन कालखंड. रोमन लोकांनी पुन्हा एकदा पॅलेस्टाईन जिंकलं. जेरुसलेममध्ये राहणार्‍या त्यांच्या सुभेदाराचं नाव होतं पाँटियस पिलेत. हेरॉड राजाच्या देवळाचे पुजारी पाँटियसकडे तक्रार घेऊन गेले की, “आमच्यापैकीच एक जोसेफ नावाचा सुतार आहे, त्याचा पोरगा येशू हा लोकांना पाखंडी बनवतो आहे, म्हणून त्याला मारा.” रोमनांनी येशूला देहान्त शिक्षा दिली. ही घटना इ.स. ३६ सालची.
 
 
पुढे इ. स. ७० साली रोमन लोक काही कारणाने सगळ्याच ज्यू लोकांवर भयंकर संतापले. त्यांनी संपूर्ण ज्यू जमातीला पॅलेस्टाईनमधून हद्दपार केलं आणि राजा हेरॉडचं भव्य मंदिर पुन्हा एकदा उद्ध्वस्त केलं. मायभूमीतून परागंदा झालेले ज्यू लोक आशिया, आफ्रिका, युरोप असे सर्वत्र पांगले. आपल्या भारतातही सिंध, कच्छ, गुजरात, महाराष्ट्र, केरळ असे किनारपट्टी धरून बसले.
 
 
आणखी ३०० वर्षे उलटली. या काळात येशू ख्रिस्ताचे अनुयायी असणार्‍या ज्यू लोकांचा एक नवाच संप्रदाय बनला. त्यांना नाव मिळालं ‘ख्रिश्चन.’ याच काळात रोमन साम्राज्याचा डोलारा डळमळू लागला. तो सावरण्यासाठी सम्राट कॉन्स्टन्टाईन याने सर्वसामान्य जनतेत प्रिय ठरलेला ख्रिश्चन संप्रदाय स्वीकारला. जो सम्राटाचा संप्रदाय, तोच प्रजेचा, असा प्रघात असल्यामुळे रोमन साम्राज्याचे सगळे प्रजाजन आपोआपच ख्रिश्चन झाले. जेरुसलेमवर आपोआपच ख्रिश्चन सत्ता आली. या सत्ताधार्‍यांनी ‘माऊंट मोरिया’वरच्या उद्ध्वस्त मंदिराकडे फार लक्ष दिलं नाही. पण, त्यांनी समोरच्याच ‘माऊंट ऑलिव्ह’ नावाच्या टेकडीवर येशू ख्रिस्ताच्या समाधीचं मंदिर उभारलं. त्याचं नाव ‘द चर्च ऑफ होली सेपल्कर’. सेपल्कर म्हणजेच समाधी. ही घटना इ.स. ३२५ सालची.
 
 
पुढे पॅलेस्टाईनच्या पूर्वेला अरबस्तानात मक्का इथे प्रेषित महंमद यांचा जन्म झाला. इ.स. ५७० ते इ.स. ६३२ हा त्यांचा कालखंड आहे. त्यांनी ‘इस्लाम’ या नव्या संप्रदायाची सुरुवात केली. इ. स. ६२१ साली प्रेषित महंमदांना एक विलक्षण स्वप्नदृष्टान्त झाला. गॅब्रियल हा देवदूत आणि बुराक हा पवित्र दैवी घोडा त्यांच्या स्वप्नात आले. बुराकचं अंग घोड्याचं. पण, तोंड माणसाचं असतं. प्रेषितांना बुराकवर बसवून गॅब्रियल त्यांना मक्केहून आकाशमार्गे जेरुसलेमला घेऊन गेला. तिथे त्यांना त्या पवित्र खडकासमोर उतरवण्यात आलं. संपूर्ण मानवजातीचं जन्मस्थान असलेल्या त्या पवित्र खडकासमोर प्रेषितांनी प्रार्थना म्हणजेच नमाज अदा केली. मग गॅब्रियलने त्यांना पुन्हा बुराकवर स्वार केलं आणि थेट सातव्या स्वर्गात नेलं. तिथे प्रथम त्यांना अ‍ॅडम, येशू, जॉन, जोसेफ, एनॉक, एरॉन, मोझेस आणि अब्राहम हे सगळे महापुरुष भेटले. मग त्यांना सर्वशक्तिमान ईश्वरासमोर नेण्यात आलं. ईश्वराने त्यांना रोज ५० वेळा नमाज अदा करण्याची आज्ञा केली. तेव्हा मोझेसने रदबदली करून ५०चे पाच करून घेतले. ही सगळी घटना ‘हदिस’मध्ये नोंदवलेली आहे.
 
 
प्रेषितांच्या अनुयायांनी हे लक्षात ठेवलं. पुढे इस्लामी खलिफांनी म्हणजेच अरबांनी पॅलेस्टाईन जिंकला. तेव्हा तिथे ज्यू लोक शिल्लकच नव्हते. खलिफा अब्द अल् मलिक हा इ.स. ६८५ साली सत्ताधारी झाला आणि त्याने पहिली गोष्ट केली ती म्हणजे पवित्र खडकावर एक भव्य वास्तू बांधली. तसंच पवित्र खडकासमोर जिथे स्वतः प्रेषितांनी नमाज अदा केली होती, तिथेही एक सुंदर मशीद उभी केली. खडकावर जी वास्तू आहे, तिला मशीद म्हणता येत नाही. कारण, इस्लाम हा निर्गुण निराकाराची उपासना करणारा संप्रदाय असल्यामुळे मशीद या वास्तूत आतमध्ये काहीच नसतं. दर्गा म्हणजे एखाद्या इस्लामी संताची कबर आणि खानका म्हणजे मठ. आता खडकावरच्या वास्तूला यातलं कोणतंच नाव लागू पडत नाही. त्यामुळे तिला फक्त ‘होम ऑफ द रॉक श्राईन’ असं म्हणतात. तिच्या समोरच्या मशिदीला मात्र ‘अल अक्सा’ मशीद म्हटलं जातं. या दोन्ही वास्तूंच्या पश्चिमेला खालच्या उतारावर राजा हेरॉडच्या भव्य मंदिराची एक मूळ भिंत अजूनही आहे. तिला म्हणतात ‘वेस्टर्न वॉल’ किंवा ‘वेलिंग वॉल.’ जगभरातून मुसलमान लोक जसे मक्का-मदिनेला जातात, तसेच ‘डोम ऑफ द रॉक’ आणि ‘अल अक्सा’ला पण जातात. तसेच जगभरातून ज्यू लोक ‘वेलिंग वॉल’वर माथा टेकवायला जातात. या सगळ्या प्राचीन पवित्र स्थानांना धारण करून उभ्या असलेल्या ‘माऊंट मोरिया’ला आज म्हणतात ‘टेंपल माऊंट.’
 
 
१९४८ साली ज्यू लोकांना पॅलेस्टाईन ही त्यांची मूळ भूमी परत मिळाली. त्यांनी आपल्या देशाचं नाव ठेवलं इस्रायल. पण, सातव्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत म्हणजे गेली १,३०० वर्षे त्या भूमीत राहत होते अरब मुसलमान. ते तिथून हटायला तयार होईनात. आजूबाजूच्या इजिप्त, सीरिया, जॉर्डन, लेबेनॉन, सौदी अरब, इराक या सगळ्या अरबी देशांनी या पॅलेस्टाईनी अरबांना आणखी उचकवलं. पण, इस्रायलने कुणाचीच डाळ शिजू दिली नाही. १९४८ साली ज्यूंना अर्धच जेरुसलेम मिळालं होतं. १९६७च्या युद्धात इस्रायलने उरलेलं अर्ध जेरुसलेम जॉर्डनकडून हिसकावून घेतलं.
 
 
आज ‘टेंपल माऊंट’च्या भोवताली ज्यू, ख्रिश्चन, आर्मेनियन आणि पॅलेस्टाईनी अरब, अशा सर्वधर्मीय वस्त्या आहेत. यापैकी अरब वस्त्या ज्यूंना नको आहेत. काही ना काही कारणाने अरबांना तिथून हुसकावून काढण्याचा ज्यूंचा सतत प्रयत्न चाललेला असतो. परवाच्या रमजानमध्ये, ‘कोविड’ परिस्थिती लक्षात घेऊन, इस्रायली अधिकार्‍यांनी ‘टेंपल माऊंट’वर एका विशिष्ट संख्येलाच परवानगी दिली. पण, अरबांनी ती संख्या पाच पटींनी ओलांडली (सूत्रांकडून दहा हजारांची परवानगी आणि ५० हजारांची गर्दी, असे आकडे सांगितले जातात.) यातून प्रथम दंगल आणि मग रॉकेटयुद्धच सुरू झालं. ते २३ मे रोजी शेवटी थांबलं. मृतांचा अधिकृत आकडा २५० आहे. त्यात १०० महिला आणि ६१ मुलांचाही समावेश आहे.
 
 
आपला लोकप्रिय अभिनेता धर्मेंद्र म्हणतो, “दारू सोडण्यात काय विशेष? आतापर्यंत कित्येकदा सोडलीय मी.” त्याच चालीवर अरब आणि ज्यू म्हणत असतील, “युद्धबंदी ना? आतापर्यंत कित्येकदा केलीय आम्ही.”
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@