अवघ्या २० रुपयांसाठी इसमाची हत्या !

    24-May-2021
Total Views |

२०_1  H x W: 0
 
 
 
उल्हासनगर : नशेच्या आहारी गेलेल्या साहिल मैराळे या तरुणाने २० रुपयांसाठी अनिल आहुजा या इसमाची काल रात्री हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे .उल्हासनगर-५ येथील जय जनता कॉलनी परिसरात अनिल आहुजा वय वर्ष ३६ हा इसम त्याच्या कुटुंबासह राहतो. अनिल कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी एका चहाच्या दुकानात नोकरचे काम करीत होता . याच परिसरात आरोपी साहिल मैराळे वय वर्ष २०  हा सुद्धा राहत असून दिनांक २१ मे रोजी नशेच्या आहारी गेलेल्या साहिलने नशेसाठी अनिल कडून २० रुपये मागितले होते मात्र अनिलने पैसे देण्यास नकार दिला होता. यावरून दोघांचे भांडण देखील झाले होते. यावेळी साहिलने अनिलला शिवीगाळ करून "तुला बघून घेईल" अशी धमकी दिली व तेथून निघून गेला.
 
 
 
 
काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अनिल त्याचा मित्र सागर नायकर याच्यासोबत घराजवळ उभा असता पुन्हा साहिल त्या ठिकाणी आला आणि अनिलला शिवीगाळ करू लागला यावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले, साहिलने अनिलला चापट मारली तर स्वतःचा बचाव करण्यासाठी अनिलने देखील साहिलला चापट मारली . या नंतर संतप्त झालेल्या साहिलने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने अनिलच्या पोटावर , पाठीवर वार केले.
 
 
 
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी मयत घोषित केले ,या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केलीय जात आहे.या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले .डी बी पथकातील अजय गायकवाड ,अजय अहिरे ,शेखर पाटील ,विक्रम जाधव आणि नवनाथ काळे यांनी अवघ्या २ तासात आरोपी साहिल याला उल्हासनगर -४ येथील सर्टिफाईट ग्राउंड जवळून ताब्यात घेतले ,त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला चाकू आढळून आला.पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली असून त्याच्या विरोधात कलम ३०२ ,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे पोपट करडकर हे करत आहे.