लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती; आई-वडीलांसह महिला एजंटला अटक
कल्याण : राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशातच कल्याणमधून लॉकडाऊनमुळे पोटाच्या मुलाला विकण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
संबंधित घटना अशी की, रिक्षाचालक असणाऱ्या लहान बालकाच्या वडिलांचा लॉकडाऊन काळात रिक्षाचा व्यवसाय होत नव्हता. त्यात आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने हतबल झालेल्या या पालकांच्या संपर्कात एक महिला एजंट आली. या महिलेने या पालकांकडून पाच महिन्याचे बाळ विकत घेतले. या गैरप्रकाराची कुणकुण ठाणे मानवी तस्करी विरोधी पथकाला लागली होती. यापथकाने कल्याण रेल्वे स्टेशनला सापळा रचून आई-वडिल आणि त्या महिला एजंटला अटक केली. या तिघांना कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
संबंधित पालक मूळचे मुरबाडचे रहिवासी आहेत. सध्या ते शहाड येथे पत्नी आणि सहा मुलांसह राहतात. सहा मुलांमध्ये तीन मुली आणि तीन मुलगे आहेत. रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण लॉकडाऊनमध्ये रिक्षाचा व्यवसाय फारसा होत नव्हता. त्यात आधीपासूनच डोक्यावर कर्ज होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. लॉकडाऊनमुळे आर्थिक विवेचानात असलेल्या या कुटुंबाच्या संपर्कात महिला एजंट आली. या महिला एजंटने पाच महिन्याच्या मुलांची मागणी केली. त्याबद्दल्यात त्यांना ९ हजार रुपये देण्याचे कबूल केले. या महिलेला मात्र या मुलाच्या सौद्यात दोन लाख रूपये मिळणार होते.
महिला एजंट आणि रिक्षाचालक दाम्पत्य कल्याण स्टेशन परिसरातील दीपक हॉटेल येथे येणार असल्याची माहिती मानवी तस्करी विरोधी विभागाच्या ठाणे कार्यालयाला मिळाली. या विभागाचे अधिकारी अशोक कडलक यांनी सापळा रचून या तिघांना अटक केली आहे. महिला एजंट ही बदलापूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. ती एका सामाजिक संस्थेत कामाला होती. ही महिला एजंट खरेदी विक्रीच्या मानवी तस्करीचा व्यवहार किती दिवसापासून करीत आहे. ती हा मुलगा दोन लाख रूपयांत कोणाला विकणार होती. या गोष्टीचा पोलिस तपास करीत आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे एपीआय सचीन पत्रे करीत आहेत. या तिघांना कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.