पॅट्रिशिया फारा या ब्रिटिश विदूषीचं सर आयझॅक न्यूटनवरचं ‘लाईफ आफ्टर गॅ्रव्हिटी’ या मथळ्याचं हे पुस्तक नुकतंच म्हणजे मे २०२१च्या सुरुवातीला प्रकाशित झालं आहे. पुस्तकाचा उपमथळा आहे ‘आयझॅक न्यूटन्स लंडन करिअर’.
नारायण गणेश उर्फ नानासाहेब गोरे हे महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध राजकारणी होते. समाजवादी विचारांच्या मुशीतून घडलेल्या नानासाहेब गोर्यांनी ‘राष्ट्र सेवा दल’, समाजवादी पक्ष, १९४२चं, ‘भारत छोडो’ आंदोलन इत्यादी कार्यांमध्ये खूप काम केलं. ते प्रथम लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार होते. दोन-अडीच वर्षांच्या मोरारजी देसाई सरकारमध्ये तर ते ब्रिटनमध्ये भारताचे राजदूत होते. नानासाहेब चांगले वक्ते आणि लेखकही होते. मात्र, ते कमालीचे संघद्वेष्टे होते. रा. स्व. संघ आणि हिंदुत्व विचार यांच्यावर हल्ला करण्याची एकही, नव्हे अर्धी संधीसुद्धा, ते सोडत नसत. एवंगुणविशिष्ट नानासाहेब गोरे १९९३ साली वारले. सर्वच वृत्तपत्रांनी भरभरून स्तुती करणारे मृत्युलेख लिहिले. हिंदुत्व विचाराच्या वृत्तपत्रांनीही त्यांच्या गुणांचा उल्लेख करणारे लेख लिहिले. कारण, ‘अवगुण विसरा आणि गुणांकडे पाहा’ अशीच मुळी हिंदू संस्कृती आहे. फक्त एका लेखकाने त्यांची अगदी सौम्यशी खिल्ली उडवत लेख लिहिला आणि तरीही प्रांत प्रचारक त्या लेखकावर नाराज झाले. त्यांनी सौम्य शब्दांत त्या लेखकाला समज दिली की, ‘मरणान्तानि वैराणी - मनुष्य मरण पावला, वैर संपलं.’
काय गंमत आहे की, माणूस मेल्यावर त्याच्याबद्दल वाईट बोलू नये, हे एक जीवनमूल्य म्हणून फार उच्च आहे, यात संशयच नाही. पण, मग त्यामुळे एखाद्या मोठ्या व्यक्तीचं योग्य मूल्यांकन, पुनर्मूल्याकंन करण्याची प्रक्रिया घडतच नाही. हे फक्त राजकीय व्यक्तींबद्दल घडतं असं नव्हे, तर सामाजिक कार्य, धर्म, साहित्य, विज्ञान, किंबहुना जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत घडताना दिसतं. त्या-त्या क्षेत्रांत उत्तुंग कार्य करून गेलेल्या महान व्यक्तींचा आपण एक तर इतका गौरव करतो की, त्याला एक प्रकारे देव्हारे माजवण्याचं रूप येतं, नाहीतर मग आपण एखाद्या व्यक्तीवर इतकी टीका करतो की, त्याला व्यक्तिविद्वेषाचं रूप येतं, तटस्थ मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, बदलत्या काळाच्या निकषावर नव्याने मूल्यांकन हा प्रकारच आपल्याकडे हाताळला जात नाही. आता हेच पाहा ना; साने गुरुजी, एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे ही महाराष्ट्रातही फार मोठी माणसं होती. पण, त्यांनी हिंदुत्व विचारांचा मनापासून द्वेष केला आणि अशा प्रवृत्तीच्या माणसांना उद्देशून प. पू. श्रीगुरुजी ‘घरच्या म्हातारीचे काळ’ असा शब्द वापरत असत, हे नव्या अभ्यासकांना कळायला तर हवं ना!
पाश्चिमात्य देशांत असं होत नाही. विन्स्टन चर्चिल हा ब्रिटिश लेखक, अभ्यासक, इतिहासकार यांच्या अगदी ‘कलेजे का टुकडा’ असतो आणि असायलाच हवा. त्याची कामगिरीच तशी आहे. पण, म्हणून चर्चिलची भरभरून स्तुती करतानाच ब्रिटिश अभ्यासक त्याच्या पक्षबदलू वृत्तीबद्दल त्याला सटकावायला कमी करत नाहीत. चर्चिल मुळात हुजूर पक्षाचा. कारण, त्याचे पूर्वज हे मार्लबरोचे सरदार होते. पण, स्वार्थासाठी चर्चिलने बेधडक आयाराम-गयारामगिरी केली होती. तशीच गोष्ट नेपोलियन आणि फ्रेंच अभ्यासकांची. फे्रंच राजे आणि सरदार यांच्या दृष्टीने समृद्ध कुटुंबात जन्मलेल्या नेपोलियनने राजकारण, रणांगण आणि सामाजिक सुधारणा ही क्षेत्र गाजवून सोडली. तोफखान्यावरचा एक लहानसा अधिकारी फे्रंच राष्ट्राच्या गळ्यातला ताईत बनला. याबद्दल नेपोलियनवर स्तुतीसुमनं उधळणारे फ्रेंच इतिहासकार, त्याच्या स्त्रीलंपटपणाबद्दल आणि स्वार्थीपणाबद्दल ठणकावून लिहितात. झाकून ठेवत नाहीत.
पॅट्रिशिया फारा या ब्रिटिश विदूषीचं सर आयझॅक न्यूटनवरचं नवीन संशोधनपर पुस्तक हे अशाच पद्धतीचं आहे. ‘लाईफ आफ्टर ग्रॅव्हीटी’ या मथळ्याचं हे पुस्तक नुकतंच म्हणजे मे २०२१च्या सुरुवातीला प्रकाशित झालं आहे. पुस्तकाचा उपमथळा आहे ‘आयझॅक न्यूटन्स लंडन करिअर’. आपल्या उत्तरायुष्यात न्यूटन केंब्रिज विद्यापीठ सोडून राजधानी लंडनमध्ये येऊन राहिला आणि या स्थलांतरामागचा त्याचा हेतू ज्ञानार्जन, ज्ञानपिपासा किंवा ज्ञानदान इत्यादी उच्च-उदात्त वगैरे नसून चक्क व्यावहारिक होता. त्याला पैसा, प्रसिद्धी आणि मोठेपणा हवा होता, असं पॅट्रिशिया बाईंनी ठणकावून लिहिलं आहे. त्यावेळी त्या हेही लिहितात की, ‘न्यूटनचं मोठेपण, एक शास्त्रज्ञ, एक गणिती म्हणून त्याची थोरवी, त्याची कामगिरी ही अलौकिकच आहे. त्याच्या सिद्धान्तांनी विज्ञान संशोधनात नवीन युग निर्माण केलं, यात शंकाच नाही. पण, म्हणून तो ‘अॅबसेंट माईंडेड प्रोफेसर’ होता, त्याला कीर्ती, प्रसिद्धी, संपत्ती, नावलौकिक नको होता; किंवा या सगळ्या भौतिक सुखांकडे पाठ फिरवून तो कायम त्याच्या उच्च बौद्धिक वातावरणात रमलेला असे, असं जे त्याचं चित्र उभं केलं जातं, ते चुकीचं आहे. त्याला कोणत्याही सर्वसामान्य माणसाप्रमाणेच या सर्व भौतिक गोष्टींची हाव होतीच.
जे प्रत्यक्ष दिसत नाही किंवा जी वस्तू पुराव्याने सिद्ध करता येणार नाही, तिचं अस्तित्व मी मान्य करणार नाही. त्याचप्रमाणे जगातली प्रत्येक वस्तू गणिताने सिद्ध करता येते, असा सिद्धान्त सर्वप्रथम रेने देकार्त या फ्रेंच शास्त्रज्ञाने मांडला. इ. स. १५९६ ते इ.स. १६५० हा देकार्तचा कालखंड आहे. रेने देकार्तच्या मतांना पुष्टी देणारे विचार न्यूटनने मांडले. विश्व हे त्रिमितीचं बनलेलं आहे. म्हणजे त्याला लांबी, रुंदी आणि उंची ही तीन परिमाणं आहेत. या त्रिमितीयुक्त विश्वात संचार करणारे कोणत्याही वस्तूचे मूलभूत कण म्हणजे अणू. या कणांच्या एकत्र येण्यातून वस्तू निर्माण होतात. हे कण किंवा वस्तू विश्वाच्या पोकळीत संचार करत असतात. त्यांच्यामध्ये एकमेकांना आकर्षून घेण्याची शक्ती असते. हीच ती गुरुत्वाकर्षण शक्ती. ही शक्ती एकमेकांकडे आकर्षिल्या जाणार्या दोन वस्तूंचं वस्तुमान आणि त्यांच्यातलं अंतर, यांवर अवलंबून असते, हे न्यूटनने गणिताने सिद्ध केलं. भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्र यांमधील उच्चप्रतिची गणितं सोडवण्यासाठी नुसतं बीजगणित पुरेसं होत नाही. त्यासाठी न्यूटनने ‘कॅलक्युलस’ ही नवीन पद्धत शोधून काढली. या ‘कॅलक्युलस’द्वारे त्याने गुरुत्वाकर्षण सिद्धान्त सिद्ध करून जगासमोर मांडून दाखवला. न्यूटनच्या बुद्धिमत्तेच्या या सेवेने तत्कालीन सुबुद्ध जग थक्क झालं.
आयझॅक न्यूटन या महान ब्रिटिश शास्त्रज्ञाचा कालखंड इ. स. १६४३ ते इ. स. १७२७ असा आहे. या काळात ब्रिटनमध्ये चार्ल्स पहिला, ऑलिव्हर क्रॉमवेल, चार्ल्स दुसरा आणि राणी अॅन यांच्या कारकिर्दी झाल्या. न्यूटनला ‘सर’ ही पदवी राणी अॅनने दिली. आपल्याकडे या कालखंडात छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी आणि छत्रपती शाहू यांच्या कारकिर्दी झाल्या. म्हणजेच मुघल आणि मराठे यांच्या तुंबळ संघर्षाचा हा कालखंड आहे. पाश्चिमात्यांच्या वैज्ञानिक प्रगतीने भारावून गेलेला एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. सर आयझॅक न्यूटन हे नाव उच्चारलं की, हा वर्ग नुसता गहिवरून जातो. लताबाई किंवा भीमाण्णा यांच्या सुंदरशा तानेला दाद देताना ‘अहाहा! अहाहा!’ असे अस्फूट आवाज काढायचे आणि स्वत:च्याच डोक्यावरचे केस ओढायचे, अशी काही लोकांना सवय असते. तसाच काहीसा अविर्भाव करीत हे भारावलेले लोक न्यूटनच्या नावाने भावसमाधीत जातात आणि मग ओठाची एक बाजू वाकडी करून हसत म्हणजेच तुमच्याबद्दल तुच्छता दर्शवत ते म्हणतात, “बघा बघा, तिकडे पश्चिमेत लोक ‘कॅलक्युलस’चा शोध लावत होते आणि आमच्याकडचे बुद्धिमान लोक फक्त धर्म आणि अध्यात्म यातच बुडालेले होते. तिकडचे विचारवंत जे प्रत्यक्ष दिसत नाही, त्याला मान्यता देत नव्हते आणि आमचे कथित बुद्धिमान लोक, न दिसणारा देव आणि कुणी कधी न पाहिलेला परलोक यांच्यामागे जाण्याचा आदेश समाजाला देत होते,” इत्यादी. तात्पर्य काय, पश्चिमेचं सगळं ग्राह्य आणि आमचं सगळं टाकाऊ!
असल्या विज्ञानांध कथित ‘इंटेलेक्चुअल’ लोकांना स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांच्यापासून ते अगदी नीराद चौधरी आणि व्ही. एस. नायपॉल अशा ललित लेखकांनीसुद्धा व्यवस्थित फटकावून काढलेलं आहे. पॅट्रिशिया बाईंचं न्यूटनचं उत्तरायुष्य मांडणारं ताजं पुस्तक अशाच फटक्यांचा नवा वानोळा आहे. न्यूटनच्या अनेक चरित्रग्रंथांमध्ये ‘नेव्हर अॅट रेस्ट’ हे चरित्र अतिशय अधिकृत, साधार आणि उत्कृष्ट समजलं जातं. ते अमेरिकन इतिहासकार रिचर्ड वेस्टफॉल याने १९८० साली लिहिलं. प्रस्तावनेत वेस्टफॉलने स्पष्टच म्हटलं आहे की, “मी, एका महान वैज्ञानिकाचं, अलौकिक बुद्धिमत्तेचं वरदान लाभलेल्या, असंख्य विषयांमध्ये गती असलेल्या असामान्य व्यक्तीचं चरित्र लिहायला बसलो आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यातल्या १६९७ ते १७२७ या शेवटच्या ३० वर्षांच्या कालखंडाला मी फारसा स्पर्श केलेला नाही.”
पॅट्रिशिया बाईंनी हाच कालखंड पकडला आहे. त्यांच्या म्हणण्याचा एकंदर आशय असा- गुरुत्वाकर्षण, ‘कॅलक्युलस’, ‘ऑप्टिक्स’ आणि इतर अनेक शास्त्रीय सिद्धान्त मांडून न्यूटनने वैज्ञानिक क्षेत्र दणाणून सोडलं. हे सगळं कार्य मुख्यतः केंब्रिज विद्यापीठात झालं. कारण, तिथेच तो अध्यापक होता. पण, पन्नाशी ओलांडल्यावर त्याला आपली बुद्धी मंदावतेय असं वाटू लागलं. त्याचं कौटुंबिक जीवन यथातथाच होतं. त्याचा बाप मरण पावल्यावर दोन महिन्यांनी आयझॅक जन्मला. साहजिकच त्याच्या आईने पुनर्विवाह केला. सावत्र बापाचं आणि आयझॅकचं पटत नसे. पुढे आयझॅकनेही लग्न केलं नाही. अशा स्थितीत त्याला केंब्रिजच्या शैक्षणिक वातावरणाचा कंटाळा आला. मग अगदी काटेकोरपणे त्याने पुढचा बेत आखला. त्याने केंब्रिजला रामराम ठोकला आणि तो लंडनला आला. हॅलिफॅक्सचा अर्ल चार्ल्स माँटेग्यू हा त्यावेळी ब्रिटनचा अर्थमंत्री होता. तो न्यूटनचा चाहता होताच. त्याच्या सल्ल्याने न्यूटनने शाही टांकसाळीत अधीक्षक म्हणून नोकरी पत्करली. काही वर्षांनी तो टांकसाळीचा सर्वोच्च प्रमुख बनला. खोटी नाणी बनवणारे कुशल गुन्हेगार त्यावेळीही होतेच. न्यूटन एखाद्या डिटेक्टिव्हप्रमाणे लंडनच्या दारूअड्ड्यांवर फिरला आणि त्याने असे किमान २८ गुन्हेगार पकडून त्यांना शिक्षा देवविल्या. न्यूटनने ‘साऊथ सी कंपनी’ नावाच्या एका नौकानयन कंपनीत मोठी रक्कम गुंतवली. ही कंपनी आफ्रिकेतून काळ्या लोकांना गुलाम म्हणून पकडून अमेरिकेत नेऊन गुरांप्रमाणे विकत असे. हे न्यूटनला माहीत होतं. तरीही त्याने त्या कंपनीत पैसे गुंतवले. म्हणजेच त्याला माणुसकीची चाडबिड नव्हती. पुढे ती कंपनी बुडाली आणि न्यूटनचे पैसेही बुडाले. न्यूटनचा धर्मावर विश्वास होता. बायबलमधल्या कथांचा काळ ठरविण्यासाठी त्याने खूप गणितं, समीकरणं मांडली. न्यूटनचा किमयागारीवर विश्वास होता. किमया म्हणजे विशिष्ट रसायनांच्या प्रयोगाने कोणत्याही धातूला सोन्यामध्ये रूपांतरित करणं किंवा परीस बनवणं. त्यासाठी त्याने पारा या वस्तूवर खूप प्रयोग केले. ते त्याने लिहूनही ठेवले आहेत. मृत्यूनंतर न्यूटनच्या केसांच्या काही बटा जपून ठेवण्यात आल्या होत्या. त्या केसांची तपासणी केली असता, त्यातही मोठ्या प्रमाणावर पारा आढळला. अशी ही सर आयझॅक न्यूटन या असामान्य व्यक्तीच्या सामान्य पैलूंची कथा...