ठाणे,दि.१८ (प्रतिनिधी) : भिवंडी तालुक्यातील कारीवली गाव येथील मित्तल इंटरप्राइजेस या कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तब्बल १२ हजार जिलेटीन कांड्या आणि ३ हजार ८ इलेक्ट्रीक डिटोनेटर्सच्या स्फोटकाचा साठा सोमवारी रात्री जप्त केला.ही स्फोटके विनापरवाना साठवून ठेवणाऱ्या गुरुनाथ काशिनाथ म्हात्रे (५३) यास अटक करण्यात आली असुन ठाणे न्यायालयाने त्याला २२ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी भिवंडी येथील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या स्फोटक पदार्थांची बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली.दरम्यान,प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोर जिलेटीनच्या कांड्या भरलेली मोटार ठेवल्याचे प्रकरण ताजे असतानाच ठाण्यातच पुन्हा स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.