‘रंगावली’चे ‘यश’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2021   
Total Views |

masaa _1  H x W


आपल्या आजोबांकडून मिळालेल्या कलेचा वारसा जपणार्‍या यश महाजन यांच्या रांगोळीशिवाय कोणताही ‘इव्हेंट’ कल्याणमध्ये पूर्णच होत नाही. त्यांच्या या कलाकौशल्याविषयी...
 
यश महाजन यांची बोटे कधी रांगोळीत रंग भरतात, तर कधी चित्रांच्या माध्यमातून जनजागृती करतात. एकूणच मानवी सजर्नशीलतेचा आविष्कार त्यांच्या कलाकृतीतून प्रतिबिंबित होतो. अशा या कलाकराचा जीवनप्रवास जाणून घेऊया. यश यांचे बालपण हे जळगाव जिल्ह्यातील कळमसरे या गावात गेले. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण शारदा माध्यमिक विद्यालयात झाले. चित्रकलेची आवड असल्याने बारावीनंतर पदवी शिक्षणाकडे न वळता, त्यांनी ललित कला केंद्रातून ‘एटीडी’ (आर्ट टीचर्स कोर्स) केला.
 
त्यानंतर यश हे अंबरनाथमध्ये वास्तव्यास आले. अंबरनाथमध्ये आल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातून ‘आर्ट मास्टर’चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी एक वर्ष ‘फिल्मसिटी’मध्ये कलादिग्दर्शनाचेही काम केले. गेल्या १६ वर्षांपासून आता ते कल्याणमध्ये वास्तव्यास आहेत. यश हे कल्याणमधील गोकुळ नगरीत राहतात. यश हे ‘एम. डी. डेढिया’ शाळेत कला शिक्षक म्हणू कार्यरत आहेत. १६ वर्षांपासून ते कलेची उपासना करत असून पोट्रेट्स, संस्कार भारती रांगोळी आणि निसर्गचित्रे या माध्यमांतून ते आपला कलाविष्कार सादर करतात.
 
 
यश यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे अगदी हलाखीच्या परिस्थितीत त्यांना जगावे लागत होते. आई-वडिलांकडून त्यांच्या कलेला, त्यांच्यातल्या कलाकाराला पाठिंबा होताच. पण, ग्रामीण भाग असल्याने कलेविषयी फारशी सुरक्षिततेची भावना नव्हती. त्यात यश यांनी कोणतेही कलाविषयक प्रशिक्षण घेतले नव्हते. पण, शेतात काम करताना ते मातीपासून काही वस्तू मात्र तयार करायचे. गावात एखादा कार्यक्रम असेल तर रांगोळी काढण्याच्या कामात ते आवर्जून पुढाकार घेत. शेतातही त्यांचा कुंचला चित्र रेखाटत होता.
 
 
या कलाप्रेमाने यश यांना स्वावलंबी बनविले. इयत्ता आठवीपासून त्यांना चित्रकलेची कामे मिळत गेली. त्यातूनच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. यश यांची चित्रकला पाहून अनेकांनी त्यांना ‘एटीडी’सारखे कोर्स करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास त्यांनी सुरूवात केली. पण, काही अभ्यासक्रमांचा खर्च जास्त असल्याने त्यांनी ‘एटीडी’सारखा अभ्यासक्रम स्वीकारला. चित्रकला हा विषय शाळांमध्ये ग्रेडेड, वैकल्पिक विषय गणला जातो. निकालाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम जाणवत नाही. त्यामुळे त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याऐवजी चित्रकला विषय गुणात्मक दर्जाचा सक्तीचा झाला पाहिजे, असे यश सांगतात.
 
 
यश हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून महापुरूषांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने नेहमी रांगोळीतून अभिवादन करतात. पण, गेल्या ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना रस्त्यावर रांगोळी काढणे शक्य होत नाही. त्यामुळे गेले वर्षभर महापुरूषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी घरात बसूनच त्यांची चित्रे रेखाटली. अंगणात फारशी जागा नसल्याने त्यांनी रांगोळीसाठी त्यांनी चित्रांचा पर्याय शोधला आहे. रांगोळीने चित्र रेखाटणे सर्वात अवघड, कठीण तसेच परिश्रमाचे असते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प काही वर्षांपूर्वी जेव्हा भारत दौर्‍यावर होते, त्यावेळी यश यांनी मुंबईत जागोजागी त्यांचे चित्र रांगोळीने रेखाटले होते. त्या रांगोळीचे अनेकांनी अगदी तोंडभरुन कौतुकही केले होते. त्यांची अशी अनेक चित्रे, रांगोळी कायमच चर्चेत राहिली. कलेचे कौतुक होते, पण त्याने पोट भरत नाही. त्यामुळे कलेला व कलाकाराला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे, असेही यश सांगतात.
 
 
“सरकार एकीकडे मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शाळा आकर्षक करण्यासाठी चित्रकला या माध्यमाचा उपयोग करते आणि दुसरीकडे कलाशिक्षकांची भरती केली जात नाही. एकूणच शालेय स्तरावर ‘कला’ या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या ‘लॉकडाऊन’च्या काळात खासगी शाळेतील कला शिक्षकांच्या तासिका होत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे,” अशी खंतदेखील यश व्यक्त करतात.
 
 
यश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, अभिनेता अमिताभ बच्चन, खा. अमोल कोल्हे, समाजसेविका सिंधुताई सपकाळ, क्रिकेटपटू विराट कोहली, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अशा अनेक व्यक्तींची रेखाचित्रे, भावमुद्रा केवळ रांगोळीतून हुबेहुब रेखाटल्या आहेत. महाजन यांना मुंबई, ठाणे, आणि कल्याण शहराच्यावतीने चाळीसहून अधिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यश यांना त्यांच्या या कामात पत्नी भावना यांचीदेखील साथ लाभते.
 
 
यश यांनी चित्रकलेमध्ये विद्यार्थी घडवावेत, यासाठी ‘वेदांत आर्ट अकॅडमी’ सुरू केली. या अकॅडमीतील विद्यार्थ्यांचे ते दरवर्षी चित्रकला प्रदर्शन भरवित असतात. मात्र, ‘लॉकडाऊन’मुळे गेल्या वर्षी हे प्रदर्शन भरविण्यात आले नव्हते. यंदा मात्र १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांनी ‘ऑनलाईन’ चित्रकला प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो, म्हणूनच चित्रप्रदर्शन भरविणे गरजेचे असल्याचे ते म्हणतात. ‘लॉकडाऊन’च्या काळात विविध रंग मिळाले नसले तरी पेन्सिलींचा वापर करून आणि आपल्याकडे असलेल्या साहित्याचा उपयोग करून, अनेक विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली असल्याचे यश सांगतात. अशा या यशस्वी कलाकाराला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...


@@AUTHORINFO_V1@@