परिस्थिती विपरीत, मात्र विजय सुनिश्चित !; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

    15-May-2021
Total Views |
rss_1  H x W: 0



मनात नकारात्मक विचारांना थारा न देण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सध्याची परिस्थिती विपरीत आहे, निराश करणारीही आहे. मात्र, त्याचा सामना अत्यंत सकारात्मकतेने करण्याची गरज आहे. समाजाच्या आवश्यकतांची पूर्ती करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही कार्यरत आहेत. त्यामुळे या विपरीत परिस्थितीतही आपला विजय सुनिश्चित आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवारी केले.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कोव्हिड रिस्पॉन्स टीम, धार्मिक आणि सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी हम जितेंगे – पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. करोना काळात मनातील नकारात्मकता दूर व्हावी, या हेतूने ही व्याख्यानमाला आहे. व्याख्यानमालेचा समारोप सरसंघचालकांच्या संबोधनाने झाला.
 
 
 
सध्याची परिस्थिती विपरीत आणि निराश करणारी असली तरीदेखील नकारात्मक नाही. ती नकारात्मक होऊ न देण्याची जबाबदारी समाज म्हणून आपल्या सर्वांची आहे. सध्याच्या काळात मनोबल दृढ ठेवून सामुहिक प्रयत्न करण्याची आहे. त्यामध्ये सर्वांत मोठी जबाबदारी आहे ती मनात नकारात्मक विचारांना थारा न देण्याची. कारण मनात नकारात्मकता निर्माण झाल्यास आपल्या लढाईवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे मनात निराशा न येऊ देता विजय मिळेपर्यंत लढा देऊन विजय प्राप्त करणे आवश्यक आहे. भारत एक प्राचीन राष्ट्र आहे, यापूर्वीदेखील अनेक संकटांचा सामना करून आपण विजय प्राप्त केला आहे, याचा विसर पडू देता कामा नये असे सरसंघचालक म्हणाले.
 
 
 
करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर सर्वच गफलतीमध्ये राहिल्याचे मोहनजी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, करोना संसर्गाची तिसरी लाटही येणार असल्याचे संशोधक आता सांगत आहेत. अर्थव्यवस्था, रोजगार, शिक्षण आदींवर करोनाचा गंभीर परिणाम झाला आहे. येत्या काळात अर्थव्यवस्थेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता असून त्यासाठी आतापासूनच प्रत्येकाने तयारी करण्याची गरज आहे. अर्थात, भविष्यातील आव्हानांना घाबरून जाण्याचेही काही कारण नाही. त्यासाठी स्वत:ला सजग, सक्रिय आणि तंदुरूस्त ठेवून धैर्य व अनुशासानाचे पालन करून सेवा कार्यांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. करोनाग्रस्तांना रुग्णखाटा, ऑक्सिजन आणि अन्य आवश्यक त्या प्रत्येक गोष्टीची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही सरसंघचालकांनी यावेळी नमूद केले.