पर्वतासमान आव्हानांचा सामना करण्याची मानवाची क्षमता – साध्वी ऋतंभरा यांचा संदेश

    14-May-2021
Total Views |
sr_1  H x W: 0



‘हम जितेंगे – पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड’ व्याख्यानमालेमध्ये प्रतिपादन
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : संकटाच्या काळातच समाजाच्या धैर्याची परिक्षा होत असते. त्यामुळे समाजाने आपले आत्मबल मजबूत ठेवणे आवश्यक आहे, कारण मानवाचे आत्मबल आणि साहस यामध्ये पर्वतासमान संकटाचा सामना करण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन साध्वी ऋतंभरा यांनी ‘हम जितेंगे – पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड’ या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या चौथ्या सत्रात गुरूवारी केले.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कोव्हिड रिस्पॉन्स टीम, धार्मिक आणि सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी हम जितेंगे – पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. करोना काळात मनातील नकारात्मकता दूर व्हावी, या हेतूने ही व्याख्यानमाला आहे. व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी साध्वी ऋतंभरा आणि पंचायती आखाडा निर्मलचे पीठाधीश महंत ज्ञानदेवसिंग यांनी संबोधित केले. व्याख्यानमालेचा समारोप १५ मे रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या संबोधनाने होणार आहे.
 
 
 
साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, सध्या संपूर्ण जगासह भारतही विपरित परिस्थितीचा आणि संकटाचा सामना करीत आहे. मात्र, या संकटात्या काळातच समाजाच्या धैर्याची परिक्षा होत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सध्या आपले आत्मबल जागृत करण्याची गरज आहे. आत्मबल, साहस आणि संकल्प यांच्या जोरावर पर्वतासमान संकटांचा सामना करणे सहसशक्य आहे. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहामध्ये मोठमोठ्या खडकांचे वाळूत रूपांतर करण्याची क्षमता असते, त्याचप्रमाणे मानवाच्या आत्मबलाचीही क्षमता मोठी असते. त्यामुळे भारतीयांना या काळात दोषारोप न करता आत्मबल, आत्मसंयम जागृत करून सकारात्मक विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही साध्वी ऋतंभरा यांनी नमूद केले.
 
 
 
सध्याच्या संकटाला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण हे संकट काही कायमस्वरूपी नाही असे महंत ज्ञानदेवसिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, दु:खाचे अथवा संकटाचे दिवस हे स्थिर राहत नाहीत, त्यावर मात करणे समाजाच्या एकत्रित शक्तीमुळ सहजशक्य आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. जर कोणी व्यक्ती संक्रमित झाला तर त्याने सर्वप्रथम वैद्यकीय उपचारांना प्रारंभ करावा. त्यासोबतच मनोबल राखण्यासाठी भगवद्गीता, गुरुवाणी यांचे वाचन करावे. कारण मनात सकारात्मकता असेल तर संकटाचा आयुष्यावर प्रभाव पडू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.