संगीत साधनेचा ध्यासकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2021   
Total Views |

Aviraj tayade_1 &nbs
 
 
 
अविरत साधना आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय निश्चित गाठता येते. हेच आपल्याला नाशिक येथील प्रख्यात गायक डॉ. अविराज तायडे यांच्या आजवरच्या जीवनप्रवासावरून दिसून येते. त्यांच्याविषयी...
 
 
ध्यास.. ध्येय.. आत्मविश्वास.. ही यशस्वीतेची त्रिसूत्री. जी व्यक्ती या त्रिसूत्रीने झपाटून जात कार्य करते, ती जीवनात नक्कीच यशोशिखर गाठत असते. प्रख्यात गायक डॉ. अविराज तायडे हेही त्यांपैकीच एक.
 
 
‘भीमसेन जोशी यांची गायिकी’ या विषयात विद्यावाचस्पती असलेले तायडे यांचा बालपणापासूनचा संगीत शिक्षणाचा प्रवास मोठा विलक्षण आहे. विदर्भातील ‘घातंगी’ हे तायडे यांचे गाव. येथीलच ‘समर्थ शिक्षण मंडळ’ येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांची आई सुशीला या संगीताचे कोणतेही शिक्षण न घेता उत्तम भजने, आरत्या यांचे गायन करत. त्यामुळे लहानपणापासून तायडे यांना गायनाची आवड निर्माण झाली. त्यांचे वडील कृष्णराव तायडे यांना मुलाचे भारी कौतुक. मात्र, संगीत हा उपजीविकेचा मार्ग नसावा, अशी त्यांची ठाम भूमिका. उत्तम आणि स्थैर्य असणारे आयुष्य व्यतीत करण्याकामी विज्ञान शाखेतील शिक्षण प्राप्त करावे, अशीच त्यांची भूमिका होती. त्यामुळे शालेय शिक्षणापश्चात तायडे यांनी विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमाचा काहीशा अनास्थेने प्रारंभ केला. नावडत्या ठिकाणाचा प्रवास सुरू केल्यावर ध्येयप्राप्तीत अपयश येते, तसेच काहीसे तायडे यांचे झाले.
 
 
त्यामुळे त्यांच्या वडिलांनी, “उत्तीर्ण हो; अन्यथा घराबाहेरचा रस्ता धर,” असा निर्वाणीचा इशारा तायडे यांना दिला. त्यानंतर तायडे यांनी विदर्भातून गाठले ते थेट पुणे. येथे तायडे यांनी पं. भीमसेन जोशी यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्याच्या दृष्टीने त्यांची भेट घेतली. मात्र, ज्याला आपण गुरुत्व बहाल करणार आहोत तो शिष्यदेखील पट्टीचा हवा. तसा तो आहे किंवा नाही, हे जाणून घेण्याकामी तायडे यांना पं. भीमसेन जोशी यांच्या सत्त्वपरीक्षेस सामोरे जावे लागले. यावेळी तायडे यांनी पं. भीमसेन जोशी यांच्यासमोर ‘बिंद्रावनी सारंग’ या राग सादर केला. या सादरीकरणावर त्यांनी दाद दिल्याने यात तायडे उत्तीर्ण झाले.
 
 
आणि सुरू झाला एक विलक्षण संगीतसाधनेचा प्रवास. विदर्भात असताना शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असलेल्या व उत्तम बासरीवादक असलेल्या देवरावजी भालेराव यांच्याकडे तायडे यांनी संगीताचे काही प्राथमिक धडे गिरविले होते. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांनी तायडे यांना पं. रामभाऊ माटे यांच्याकडे संगीताचे धडे गिरविण्यास सांगितले. त्यानुसार तायडे हे पं. माटे व पं. भीमसेन जोशी यांच्याकडे संगीत शिक्षण घेऊ लागले. त्याचदरम्यान पुणे येथील स.प. महाविद्यालयातून त्यांनी ‘समाजशास्त्र’ या विषयात पदवी संपादित केली.
 
 
दरम्यान, आपला मुलगा हा आता पं. भीमसेन जोशी यांचा शिष्य आहे, याची वार्ता तायडे यांच्या वडिलांना समजली होती व त्यांचा विरोधदेखील आता मावळला होता. त्यामुळे पुढील काळात वडिलांची भक्कम साथ तायडे यांना लाभली. याच दरम्यान, हिमाचल प्रदेश सरकारच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शास्त्रीय संगीतात तायडे हे संपूर्ण भारतात प्रथम आले. याचा त्यांच्या वडिलांना मनस्वी आनंद झाला. पदवीपश्चात तायडे यांनी एम.ए. (संगीत)पर्यंत शिक्षण घेतले. त्याच दरम्यान, ते पुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ या शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर १ जून, १९९६ पासून ते नाशिक येथील ‘एसएमआरके’ महाविद्यालयात संगीत विभागप्रमुख कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी ‘एसएनडीटी’ विद्यापीठ, मुंबई येथे ‘ललित कला महाविद्यालया’चे अधिष्ठाता म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
 
 
गत २८ ते ३० वर्षांपासून संगीताची सेवा करणारे तायडे यांनी डॉ. आशिष रानडे, ज्ञानेश्वर कासार, डॉ. प्रीती कुलकर्णी, रसिका जानोरकर, आरोह ओक, मधुरा मोघे, गीतांजली बापट असे कितीतरी शिष्योत्तमांची मांदियाळी निर्माण केली आहे. कामकाजाच्या निमित्ताने मुंबई येथे संपर्क वाढल्याने तायडे यांना पुढील काळात पं. सी. आर. व्यास यांचे मार्गदर्शन लाभले. आजवर तायडे यांनी हरिहरन, सुरेश वाडकर, आर्या आंबेकर अशा अनेक दिग्गज गायकांसमवेत आपली कला सादर केली आहे. तसेच मागील १३ वर्षांपासून ते मलेशिया येथे ‘टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स’ या महाविद्यालयातदेखील अध्यापनाचे कार्य करत आहेत. ऑस्ट्रेलिया, थायलंड, सिंगापूर आदी देशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.
 
 
विशेष म्हणजे, नुकतीच तायडे यांची ‘सेन्सार बोर्ड’वर सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे. या माध्यमातून दर्जेदार चित्रपट, ‘वेबसीरिज’ रसिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. “यश हे उथळपणे कधीही प्राप्त होत नसते. त्यासाठी मेहनत आणि साधना आवश्यक असते. तसेच, ज्या शिष्याची आपल्या गुरूवर अढळ श्रद्धा आणि विश्वास असतो, त्याला यश हमखास प्राप्त होत असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी यशासाठी कोणताही जवळचा मार्ग अवलंबू नये तर मेहनत करावी,” असा संदेश ते तरुणांना देतात. विरोधाचा सामना करत तायडे यांनी प्राप्त केलेले हे यश ध्येयासक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@