आपण सर्वांनीच लहानपणी पंचतंत्राच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तेव्हा मजेशीर वाटणार्या गोष्टींबद्दल आज इंटरनेटवर शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर ‘मानवी जीवनाच्या पाच सूत्रांवर उपदेश’ हा त्या गोष्टींमधून अभिप्रेत होता. मला वाटत नाही आपल्यापैकी अनेकांनी प्रौढावस्थेत त्या गोष्टी, तो उपदेश घेण्यासाठी पुन्हा वाचायला घेतल्या असतील. त्याचं कारण सोपं आहे. प्रौढावस्थेत उपदेश घेण्यापेक्षा उपदेश करण्यात आपल्याला जास्त रस असतो. हा लेखप्रपंच उपदेश करण्याच्या हेतूने अजिबात केलेला नाही. उलटपक्षी आज ज्या रोगाने जगभरात आणि आपल्या देशातसुद्धा धुमाकूळ घातला आहे, त्या ‘कोविड-१९’वर पंचतंत्राच्या गोष्टीप्रमाणे पाच सूत्रांचा आपण सर्वांनीच विचार करावा हा आहे. एक वर्ष या आजाराच्या रुग्णांना आणि त्याने निर्माण केलेल्या सामाजिक प्रश्नांना जवळून पाहिल्यानंतर हे विश्लेषण आहे, असे म्हणणेसुद्धा कदाचित वावगे ठरणार नाही.
‘कोविड-१९’ आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय यावर न लिहिता पुढील पाच प्रश्न आणि त्यावर संभाव्य उत्तरे याकडे वळूया.
सामान्य माणसाचे गृहविलगीकरण
आज आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला असताना गृहविलगीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात सामान्य मध्यमवर्गीय माणूस जो चाळीत राहतो, ‘वन रूम किचन’मध्ये राहतो, त्याने अशा परिस्थितीत जावं कुठे? छोट्याशा घरात पाच माणसं असताना विलगीकरण होऊ शकते का? आजच्या तारखेला यावर सर्वात उत्तम उपाय हा रोगाची लक्षणे दिसताच कोणताही फेरविचार न करता, शासनाने किंवा महानगरपालिकेने निर्माण केलेल्या विविध विलगीकरण केंद्रांमध्ये स्वतः स्थलांतरित होणे हा आहे. त्यात अनेक खासगी हॉटेल्स मुंबईसारख्या शहरात महानगरपालिकेने विलगीकरण केंद्रांमध्ये रूपांतरित केलेली आहेत, जिथे काही रक्कम भरून आपण राहू शकतो. हेसुद्धा जेव्हा शक्य होत नाही, तेव्हा घरातच एक निश्चित केलेल्या जागेवर आपला वावर मर्यादित ठेवणे आणि पूर्ण वेळ मास्कचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे. जगभरात झालेल्या संशोधनानुसार, ‘कोविड-१९’हा प्रमुखपणे श्वासाच्या, शिंकेच्या किंवा खोकताना निर्माण झालेल्या ‘एरोसोल्स’मुळे पसरतो. मास्क वापरून त्याचा प्रसार जर आपण नियंत्रणात आणला, तर पुष्कळ अंशी आपण इतरांना संक्रमित होण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे मास्क वापरायला वाटणारा कमीपणा, कंटाळा किंवा अन्य कोणताही भाव टाळायलाच हवा!
लसीकरणाचे फायदे
६० वर्षांवरील सर्वांसाठी आणि ४५ वर्षांवरील इतर शारीरिक व्याधी असणार्यांसाठी लसीकरण सुरू झाले आणि अनेकांनी त्याचा लाभ घेतला. लाभ घेतलेल्या, अगदी एक लस घेतलेलेसुद्धा, रुग्णांमध्ये संक्रमित झाल्यानंतर आजाराची तीव्रता बर्याच अंशी कमी झालेली पाहायला मिळत आहे. अशाच स्वरूपाचा निकाल डॉक्टर, पोलीस व अन्य ‘फ्रंटलाईन वर्कर्स’मध्येसुद्धा पाहायला मिळतो आहे. याला लसीने निर्माण केलेल्या शरीरातील अॅण्टिबॉडी कारणीभूत आहेत, असे मानायला हरकत नाही. त्यामुळे लसीकरण अत्यंत प्रभावीपणे व वेगाने करणे, हाच या आजाराला सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न होण्यापासून थांबवण्याचा राजमार्ग आहे. आज अनेक केंद्रांमध्ये दिवसाचे सहा-आठ तास लसीकरण केले जाते, तसेच लसीकरण केल्यानंतर अर्धा तास संबंधित व्यक्तीला निगराणी करीत एका कक्षात बसवले जाते. लसीकरणाचा वेळ वाढवून दिवसाचे १२-१६ तास ते राबविण्याची मुभा आणि लसीचा साठा या केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आला, तसेच लसीकरणानंतर असलेली निगराणी अर्ध्या तासावरून १५ मिनिटांवर कमी करण्यात आली. पुढील एका महिनाभरात महाराष्ट्रातील लक्षणीय लोकसंख्या यात समाविष्ट करता येईल. या विषयासाठी फक्त सरकारी व्यवस्थेवर अवलंबून न राहता ‘टाटा’, ‘रिलायन्स’, ‘महिंद्रा’ सारख्या मोठ्या उद्योजकांनी आपल्याकडील नोंदणीकृत कर्मचार्यांना ‘फायझर’, ‘मोडर्ना’सारख्या कंपन्यांची लस परस्पर विकत घेऊन देण्याची सोय सरकारची मान्यता घेऊन केली, तर लसीकरण मोहिमेला अधिक वेग येऊन त्याचे दूरगामी चांगले परिणाम उद्योगांवर आणि एकंदरीत देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरसुद्धा होतील. गरज आहे ती फक्त लसीकरणाचे महत्त्व जाणून केंद्र आणि राज्य सरकारने कुठल्याही स्वरूपाच्या अनाठायी नियमावलीत या लसीकरणाच्या मोहिमेला न अडकवण्याची.
‘प्लाझ्मा’
आजवर वैद्यकशास्त्रात रोगावर मात केलेल्या रुग्णाचे ‘प्लाझ्मा’ देण्याच्या पद्धतीचा यशस्वी वापर अनेकदा झालेला आहे. याच धर्तीवर ‘कोविड-१९’मध्ये सुद्धा बरे झालेल्या रुग्णाचा ‘प्लाझ्मा’ वापरण्यात यावा, असा एक मतप्रवाह जगभरात आहे. यावर अनेक ‘क्लिनिकल ट्रायल’ झाल्या आहेत, तर अनेक सुरू आहेत. जगविख्यात ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’चा संपादकीय लेख यावर विशेष भाष्य करतो. गेल्याच आठवड्यात भारतातील अग्रगण्य ‘एम्स’ संस्थेचा ‘कोविड-१९’ प्रोटोकॉल जाहीर झाला, त्यात ‘प्लाझ्मा’ला ‘ऑफ लेबल’ वापरासाठी स्थान मिळालेलं आहे. या राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना तो शासनाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात देण्यात आला, ज्यामुळे ते बरे झाले. आपल्या माहितीत अनेक जण असतील, ज्यांना ‘प्लाझ्मा’ देऊन बरे होण्यास मदत झाली. असे असताना अनेक स्वयंसेवी संस्था आज ‘प्लाझ्मा’दान अभियान घेऊन मैदानात उतरल्या आहेत. मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुण्यात ‘वंदे मातरम्’ संघटना आज जास्तीत जास्त लोकांना ‘प्लाझ्मा’दान करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. यात मेख एकच आहे. जगभरात ज्या ‘क्लिनिकल ट्रायल्स’मध्ये ‘प्लाझ्मा’ उपयुक्त असल्याचे समोर आले आहे, त्या सर्वांमध्ये तो रुग्णाला आजाराच्या पहिल्या सात दिवसांत, काही वेळेस पहिल्या पाच दिवसांत देण्यात आला आहे. आजवर भारताच्या लोकसंख्येला आपण नेहमी एका नकारार्थी भावनेने पाहत आलेलो आहोत. त्याकडे सकारात्मकपणे पाहून ‘प्लाझ्मा’दानाचे अभियान जर प्रत्येक घरात पोहोचले, तर बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल झाल्यादिवशीच ‘प्लाझ्मा’ मिळू शकेल. जेणेकरून आज ज्या औषधांचा तुटवडा भासतो आहे तो निश्चितच त्या प्रमाणात भासणार नाही!
‘रेमडेसिवीर’ - वाजवी की अवाजवी?
‘कोविड-१९’ची पहिली लाट आली, तेव्हा आपण सर्वांनीच या औषधाचे नाव पहिल्यांदा ऐकले. त्यावेळेस बहुतांशी ते फक्त गंभीर रुग्णांना दिले जात असे. ज्यांना दिले जायचे, अशांमधील लक्षणीय रुग्ण बरे होत असत. त्यामुळे या औषधाचा पुष्कळ उदोउदो गेल्या एका वर्षभरात करण्यात आला. दुसरी लाट आली, तेव्हा या औषधाचा सर्रासपणे वापर सुरू झाला. अगदी सौम्य आजाराकरितासुद्धा! अशाने मग अवघ्या काही आठवड्यांत त्या औषधाचा तुटवडा निर्माण होणे स्वाभाविकच होते. वास्तविक पाहता, जगभरातून ‘रेमडेसिवीर’वर येणार्या माहितीनुसार ते वायरल लोड कमी करण्यासाठी अत्यंत कामी येते, हे तसे स्पष्ट आहे. पण, त्याचा वापर हा गंभीर रुग्णांपुरता सीमित असावा, तसेच आजाराच्या पहिल्या दहा दिवसांत ते दिले जावे, या अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टींकडे बर्याच प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आले आहे, हे कितीही नाकारले तरी सत्य आहे. त्यात हा सार्वजनिक आरोग्याचा भीषण प्रश्न निर्माण झालेला असताना काहींनी ‘रेमडेसिवीर’चा काळा बाजार करण्याचे अत्यंत निंदनीय कृत्य केले जे अद्याप सुरूच आहे, ज्यात मूळ किमतीपेक्षा २० ते २५ पट किमतीने ते विकण्याचे काम हे लोक करता आहेत, ज्यामुळे खरोखर गरजू रुग्ण ज्यांना हे मिळणे गरजेचे आहे त्यांना ते मिळू शकत नाही. यावर एक नागरिक म्हणून आज तरी उपाय दिसत नाही. पण, एक डॉक्टर म्हणून निश्चितच दिसतो. ‘रेमडेसिवीर’ हे औषध रक्तवाहिनीतून द्यावे लागते, ज्याला आम्ही ‘इंट्रा-व्हेनस रूट’ म्हणतो. या समान पण काहीसे कमी प्रभावी ‘फेविपिरावीर’
नामक औषध तोंडावाटे घेण्यासाठी गोळ्यांच्या रूपात आपल्याला मिळू शकते. अनेक रुग्णांमध्ये आजाराच्या पहिल्या ४८ तासांत ते घेण्यास सुरुवात केल्यास तो बळावत नसल्याचे आढळून आले आहे. ‘आयसीएमआर’च्या प्रोटोकॉलमध्ये या औषधाचा समावेश आहे. यंत्रणेने निर्माण केलेल्या प्रश्नाचे उत्तर आपले आपल्याला सोडवायचे असेल तर हा मार्ग निर्णायक ठरू शकतो. तसेच यंत्रणेलासुद्धा ‘रेमडेसिवीर’चा प्रश्न खरोखर सोडवायचा असेल तर राज्यात निर्माण होणारे किंवा परराज्यातून आयात केले जाणारे ‘रेमडेसिवीर’ ज्या रुग्णाला दिले जाते, त्याच्या आधार क्रमांकावर लिंक करावे व ही माहिती एका पोर्टलवर सामान्य माणसाला उपलब्ध होईल याची खातरजमा करावी. तसे केल्यास नेमकं पाणी कुठे मुरतंय, तेही लक्षात येईल. गरज भासल्यास सन्मानीय उच्च न्यायालयाने याची ‘सुओ-मोटो’ दखल घेऊन हे पोर्टल आपल्या दक्षतेखाली ठेवावे. एका औषधाच्या अभावी सामान्य माणसाला मरण पत्करावे लागणे आणि अशा परिस्थितीत त्याच औषधाचा काळा बाजार होणे हे क्लेशकारक आहे!
‘कोविड-19’ - ‘लिव्ह इन रेलशनशिप’
तुम्हाला आवडो अथवा न आवडो, आज समाजात अनेक लोक ‘लिव्ह इन रेलशनशिप’मध्ये राहत आहेत. जोवर राहणारे एकमेकांना समजून घेतात, तोवर सारे छान सुरू असते. जेव्हा त्यातील एखाद्याचे काही बिनसते, तेव्हा मग सगळंच चिघळते आणि गोष्टी नकोत त्या वळणावर येतात. आपले आणि ‘कोविड-१९’चे नाते आता काहीसे असेच आहे. ‘कोविड-१९’ पूर्णतः कधी जाईल असे नाही. पण, त्याला नीट समजवून आपण आपले सार्वजनिक जीवन आकारू शकलो तर जो र्हास आज होताना दिसतो आहे, तोच निश्चितच होणार नाही. ‘कोविड-१९’ मानवनिर्मित आहे का? तो तबलिगीने किंवा कुंभमेळ्याने पसरला का? राज्य सरकार अपयशी की केंद्र सरकार? हे प्रश्न विचारावे जरूर. पण, आज नाही. आज आपले ध्येय कितीही कठीण वाटले तरी डोकं थंड ठेवून, सारासार विचार करून ‘कोविड-१९’चा प्रश्न सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न कसा राहणार नाही ते पाहणे हा आहे. वर म्हटल्याप्रमाणे ‘कोविड-१९’ हा इथून पुढे मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, लेप्टो, क्षय यासारखा होऊन आपल्यासोबत राहणार आहे. पण, जसे उदाहरणात असलेली इतर नावं आपले जनजीवन, अर्थकारण, सार्वजनिक आरोग्य विस्कळीत करीत नाहीत, तसेच ‘कोविड-१९’सुद्धा करू शकणार नाही, या गंतव्यस्थानापर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे!
- डॉ. अमेय देसाई