डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विदयार्थ्यांची गुणवत्ताच वाढली नाही त्यामुळे येत्या वर्षात विदयार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचे आवाहान शिक्षकांसमोर असणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळे शिक्षकांसाठी येणारे शैक्षणिक वर्ष डोकेदुखीच ठरणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय जिल्हा परिषदेच्या अनुदानित, विनाअनुदानित, खासगी, प्राथमिक, माध्यामिक सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना लागू होईल. सर्वंकष मूल्यमापनाच्या आधारावर यंदा विदयार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन न झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. यंदाच्या वर्षी गुगल, झूम, व्हाट्स अॅप, टीव्ही चॅनल या विविध माध्यमातून अथक प्रयत्न करून ही ऑनलाईन शिक्षण नेमके किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत किती भर पडली हा प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे. राज्य सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून काढणार, त्यासाठी काही उपाययोजना अंमलात आणणार का? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
आरटीई २००९ च्या कायदयानुसार, विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात घेऊन जावे असा नियम आहे. पण दरवर्षी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करीत, जे विद्यार्थी अभ्यासात कमी पडतात असे वाटते त्यांना उन्हाळी सुट्टीत शाळेत बोलावून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविली जाते. पण यंदा कोरोनाने शिक्षणाचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे.
अनेक विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देखील नव्हती. ग्रामीण भागात मुलांच्या हातात मोबाईल आणि लॅपटॉप नव्हते. तसेच इंटरनेटचा ही समस्या होती. या समस्या केवळ ग्रामीण भागातच होत्या असे नव्हे तर शहरी भागात ही अनेक विद्यार्थ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागले होते. शाळेतील शिक्षण हे आनंददायी असते. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ही फारसे रूचले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता किती वाढली हा प्रश्नच आहे. आपल्या मुलांचा अभ्यासाचा पाया कच्चा राहिला, ही चिंता ही पालकांना सतावत आहे.
"सरकारने दिलेल्या निर्णय शाळांनीही स्वीकारला आहे. शाळांना कायद्याच्या विरोधात जाता येत नाही. आठवीच्या विद्यार्थ्यांची वर्षभर गुणवत्ता वाढली नाही. त्यामुळे नववीच्या वर्गात त्यांच्याकडून सर्व अभ्यास करून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांपुढील आवाहान वाढले आहे. तसेच पुढील वर्षात शाळा उघडणार की नाही हा एक प्रश्नच आहे. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना फारसे जमले नाही", असे कल्याण डोंबिवली मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी सांगितले.