आज घटकेला महाराष्ट्र कोणी नि कुठे नेऊन ठेवलाय, ते आपण रोज पाहतोच आहोत. पण, आजच्या 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आपण वेध घेऊया, हा महाराष्ट्र आला कुठून त्याचा....
गेल्या काही वर्षांपासून दोन घोषणा खूप लोकप्रिय ठरल्या आहेत. पहिली घोषणा ‘मेरा भारत महान! मग महाराष्ट्रच का लहान?’ आणि दुसरी घोषणा- ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय, हा महाराष्ट्र माझा?’ १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या मोक्यावर भारतीय जनता पक्षाने या घोषणा निर्माण केल्या. त्या चांगल्याच लोकप्रिय झाल्या. आज घटकेला महाराष्ट्र कोणी नि कुठे नेऊन ठेवलाय, ते आपण रोज पाहतोच आहोत. पण, आजच्या १ मे या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आपण वेध घेऊया, हा महाराष्ट्र आला कुठून त्याचा....
आपल्या भारत देशाच्या भौगोलिक रचनेचे साधारणपणे चार भाग होतात. पश्चिमेला काश्मीरपासून पूर्वेला अरुणाचल प्रदेशपर्यंत हिमालय पर्वतामुळे निर्माण झालेला पर्वतीय प्रदेश, या प्रदेशाच्या लगेच खाली पंजाबपासून बंगालपर्यंतचा सखल मैदानी प्रदेश. या भागांना सर्वसाधारणपणे ‘उत्तर भारत’ असं म्हटलं जातं. मग नर्मदा नदीने या उत्तर भारताला जणू खालच्या दक्षिण भारतापासून वेगळं केलं आहे. नर्मदेच्या दक्षिणेचा पठारी प्रदेश हा उत्तर भारतीय मैदानापेक्षा उंचावर आहे आणि या पठाराच्या दोन्ही बाजूंना आहेत समुद्री किनारपट्टीचे प्रदेश. नर्मदा नदी ही विंध्य पर्वतातून उगम पावते. नर्मदा ओलांडून आपण दक्षिणेच्या पठारी भागात आलो की, आपण ‘महाराष्ट्र’ या नावाने ओळखल्या जाणार्या राजकीय प्रांतात येतो. प्रथम आपल्याला लागतं तापी नदीचं खोरं. तापी ही मुख्य नदी आणि पूर्णा ही तिची उपनदी. तापीचं खोरं म्हणजे जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे. हा उत्तर महाराष्ट्र, वर्हाड आणि गोदावरीच्या खोर्याचा काही भाग यांचा मिळून ‘अश्मक’ नावाचा देश व्हायचा. अश्मक देशाचा राजा महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूने लढला होता नि अभिमन्यूच्या हातून ठार झाला होता.
या तापी-पूर्णा खोर्यानंतर आपण सह्याद्री पर्वताची ‘सातमाळा’ नावाची रांग पार करतो नि उतरतो गोदावरीच्या खोर्यात. मग लागते बालघाट रांग. ती पार केली की, आपण उतरतो भीमा नदीच्या खोर्यात. साधारणपणे असं म्हणता येईल की, हे गोदावरी खोरं आणि भीमा खोरं मिळून होणार्या भागाला पूर्वी म्हणायचे ‘मूलक’ देश. भीमेच्या खोर्यानंतर लागते शंभू महादेव रांग. ती ओलांडली की, आपण उतरतो कृष्णा नदीच्या खोर्यात. हा कृष्णा खोर्याचा भाग आणि शेजारच्या कर्नाटक नि आंध्र या राज्यांमधला काही भाग मिळून व्हायचा ‘कुंतल’ देश. म्हणजे असं म्हणता येईल की, साधारणपणे आज आपण ज्यांना खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा म्हणतो, तोच सगळा भूभाग पूर्वी ‘अश्मक’, ‘मूलक’ आणि ‘कुंतल’ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात होता. यांच्या पश्चिमेला ‘अपरांत’ म्हणजे कोकण आणि पूर्वेला विदर्भ किंवा वर्हाड हे जमेस धरले की, साधारणपणे आपल्या आजच्या महाराष्ट्र प्रांताचं चित्र उभं राहतं. ‘अश्मक’, ‘कुंतल’, ‘मूलक’, ‘विदर्भ’ आणि ‘अपरांत’ ही सगळी नावं महाभारतात आलेली आहेत. कृष्ण हा मथुरेच्या वृष्णि राज्याचा राजपुत्र होता, तर रुक्मिणी ही भोज वंशाच्या विदर्भराजाची कन्या होती. भाषाशास्त्रात मराठी भाषेला ‘कठोर भाषा’ म्हणतात. पण, मराठी माणसं सीतेचा उल्लेख ‘सीतामाई’ असाच करतात, त्याप्रमाणे रुक्मिणीचा उल्लेखही ‘मायबाई रुक्मिणी’ असाच करतात. केवढा गोडवा भरलाय या संबोधनांमध्ये!
अरे हो, पण या महाभारतकालातल्या म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राच्या गोष्टी सांगताना मी तुम्हाला पाऊण लाख वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राची गोष्ट सांगायचं विसरलोच.त्याचं असं झालं की, अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट इश्वाकू. ज्याच्या लोकोत्तर पराक्रमामुळे त्याच्या वंशालाच पुढे ‘इश्वाकू वंश’ असं नाव पडलं. त्याला बरीच मुलं होती. त्यातला दंड किंवा दंडक नावाच्या मुलाला त्याने नर्मदेच्या दक्षिणेचं राज्य दिलं. दंड हाही पित्याप्रमाणे कर्तबगार होता. पण, पुढे तो उन्मत्त होऊन प्रजेला पीडा देऊ लागला. राज्यातला एका महान ऋषींचा त्याने फारच भयंंकर अपराध केला. संतापलेल्या ऋषींनी शापवाणी उच्चारली की, “अग्निप्रलय होऊन तुझं राज्य नष्ट होईल.” तसंच घडलं. उकळता लाव्हा रस आणि गरम राखेचे डोंगर यांची वृष्टी दंडाच्या राज्यावर झाली. विंध्य पर्वतापासून शैल्य पर्वतापर्यंत (आजचं श्रीशैलम् तीर्थक्षेत्र) पसरलेलं दंडाचं राज्य त्या लाव्हा आणि राखेत दबून नष्ट झालं. त्या वैराण प्रदेशावर वर्षानुवर्ष पाऊस कोसळत राहिला आणि तिथे एक घनदाट अरण्य बनलं. तेच ‘दंडकारण्य’ किंवा ‘दंडकवन.’
तुम्ही म्हणाल, राजाने अपराध केला, तर त्याला शाप द्यायचा, शासन करायचं, संपूर्ण राज्य नष्ट करून, सामान्य जनतेला देशोधडीला का लावलं? राजाचा राग ऋषींनी प्रजेवर का काढला? तर मग मला असं सांगा की, भारताची फाळणी मान्य केली होती काँग्रेस नेत्यांनी; पण ‘मुस्लीम लीग’चे मानवी लांडगे तुटून पडले पंजाब, सिंध आणि बंगालमधल्या सर्वसामान्य हिंदू जनतेवर; त्या जनतेचा काय अपराध होता? सिंधूसह पंजाबच्या पाच नद्या आणि बंगालच्या पद्मा, मेघना आणि गंगा पाण्याऐवजी निरपराध हिंदूच्या रक्ताने भरून वाहिल्या. कारण नेत्याने, राजाने केलेली चूक नेहमीच जनतेला भोगावी लागते. म्हणून राजाने, नेत्याने फार जबाबदारीने वागायचं असतं आणि जनतेनेही जबाबदार व्यक्तीलाच नेतेपद द्यायचं असतं.असो. तर अशा त्या घनदाट दंडकारण्यात त्याच इश्वाकू कुळातला राजपुत्र राम वनवासासाठी येऊन राहिला. इथून पुढे दंडकारण्याचं पुन्हा नागरीकरण झालं. ‘अश्मक’, ‘मूलक’, ‘विदर्भ’, ‘कुंतल’ इत्यादी राज्यं निर्माण झाली. तुम्ही म्हणाल, आपणा हिंदूंच्या पुराणांत अशा ढीगभर कथा आहेत. एकाही कथेत काळाचा उल्लेख नाही. त्यामुळे त्या सगळ्या भाकडकथा आहेत. नाहीतर ते पाश्चिमात्य लोक बघा. त्यांच्या राजाला वारा सरला, तरी त्याची तारीख, वार, वेळेसकट नोंद ठेवतील. इतकंच काय, राजेसाहेबांनी चणे खाल्ले होते की, शेंगदाणे त्याचीही नोंद ठेवतील. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग आता पुढची गंमत ऐका. १९९३ साली न्यूयॉर्क विद्यापीठातला एक भूगर्भ शास्त्रज्ञ मायकेल रॅम्पिनो आणि हवाई विद्यापीठातला एक ज्वालामुखीतज्ज्ञ स्टीफन सेल्फ यांनी असा सिद्धान्त मांडला की, आजपासून सुमारे पाऊण लाख वर्षांपूर्वी इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटावर एका प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा उद्रेक इतका भयानक होता की, त्यातून बाहेर पडलेला अतितप्त लाव्हा रस आणि राख ही सुमात्रा बेटाच्या लगतचा समुद्र, त्यातील अंदमान-निकोबार बेटांची रांग आणि पुढचा बंगालचा उपसागर पार करून थेट दक्षिण भारतावर कोसळली आणि आजच्या आंध्र प्रदेशच्या किनार्यापासून थेट आजच्या गुजरात किनारपट्टीपर्यंत पसरत गेली.
या भीषण उद्रेकामुळे तत्कालीन संपूर्ण पृथ्वीगोलच हादरला असला पाहिजे. त्यातून निर्माण झालेल्या हवामानबदलामुळे तत्कालीन पृथ्वीवरची अर्ध्याहून अधिक मानवी संख्या खलास झाली असावी. मुळात अॅना गिबन्स नावाच्या एका विज्ञान पत्रकार महिलेने ‘पॉप्युलेशन बॉटलनेक’ या नावाने हा सिद्धान्त मांडला होता. रॅम्पिनो आणि सेल्फ या शास्त्रज्ञांनी तिच्या मूळ सिद्धान्ताला पाठिंबा देताना हा ‘टोबा कॅटास्ट्रोफ थिअरी’ नावाचा सिद्धान्त मांडला. कारण, आज त्या ज्वालामुखीच्या विवरात ‘टोबा लेक’ हा अत्यंत विशाल आणि नयनमनोहर असा तलाव आहे. त्याचं क्षेत्रफळ आहे १,१३० चौ.कि.मी.यावरून तूर्त आपण एवढं लक्षात घेऊया की, हिंदूंच्या पुराणकथा या भाकडकथा नसून, पूर्णपणे ऐतिहासिक घटना आहेत. मात्र, त्यांचा ‘कथा’ हा वरचा मुखवटा बाजूला करून त्याच्या आड दडलेली ऐतिहासिक, शास्त्रीय घटना नि तिचा कालखंड कसा ओळखायचा, ही किल्ली आज आपल्याला अज्ञात आहे. मायक्रोसॉफ्ट ‘विंडोज १०’ उपलब्ध आहे. पण, ते सॉफ्टवेअर वापरायला आमचा ‘पी.सी.’ कुठे अपडेटेड आहे? तो अजून ‘विंडोज ९८’च्याच जमान्यात आहे. असो. तर रामायणकालीन दंडकारण्यातून महाभारतकाळापर्यंत अश्मक, विदर्भ आदी समृद्ध देश निर्माण झाले. महामहोपाध्याय हरप्रसादशास्त्री यांच्या मतानुसार, भरतमुनींचा ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ इ.स.पूर्व दुसर्या शतकातला आहे. त्या महाराष्ट्रीय लोकांचा उल्लेख आहे. महाराष्ट्राचं पहिलंं ज्ञात राजघराणं जे सातवाहन, त्यांचा कालखंड साधारण तोच आहे. इ. स. पूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं दुसरं शतक.
सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आणि यादव अशा हिंदू राजवटींनंतर खिलजी, तुघलख, बहमनी, आदिलशाही, निजामशाही अशा मुसलमानी बादशाहानंतर अवतरलं महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या शिवरायांचं हिंदवी स्वराज्य. त्यानंतर आले इंग्रज. इंग्रजी राज्यात महाराष्ट्राला नाव होतं ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी-मुंबई इलाखा’ आणि त्यात मराठवाडा नि विदर्भ नव्हतेच. विदर्भ जोडलेला होता मध्य प्रांताला आणि मराठवाडा होता निजामाच्या संस्थानात.१९४७ साली देश स्वतंत्र झाला. आता १९२० सालच्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात काँग्रेसने म्हणजे महात्मा गांधींनी असं घोषित केलं होतं की, स्वातंत्र्य मिळाल्यावर भाषावार प्रांतरचना केली जाईल. त्यानुसार लोक वाट पाहू लागले की, पंतप्रधान पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं केंद्र सरकार आता भाषावार प्रांतरचना करेल. पण, केंद्र सरकार हे काम पुढे ढकलतं आहे, असं दिसू लागलं. १९५० साली राज्यघटना लागू झाली. १९५२ साली पहिली लोकसभा निवडणूक पार पडली. ती काँग्रेस पक्षाने प्रचंड बहुमताने जिंकली. आता खरं म्हणजे भाषावार प्रांतरचनेची वचनपूर्ती करायला कोणतीच अडचण नव्हती. पण, केंद्र सरकार वेळ काढत राहिलं. पोट्टी श्रीरामलू हे गांधीजींचे अनुयायी, मद्रास इलाख्यातून तेलुगू भाषकांचं आंध्र प्रदेश हे वेगळं राज्य व्हावं म्हणून उपोषणाला बसले. ते ५६ दिवसांनी मरण पावले आणि लोकांनी दंगली केल्या. तेव्हा अखेर १ ऑक्टोबर, १९५३ या दिवशी आंध्र प्रदेश हे देशातलं पहिलं भाषिक राज्य निर्माण झालं.आता मुंबई इलाख्याऐवजी मराठी भाषकांचं ‘महाराष्ट्र’ राज्य बनायला काहीच हरकत नव्हती. पण, त्यासाठी मराठी जनतेला स्वकीय सरकारविरुद्धच आंदोलन करावं लागलं. स्वकीय सरकारने आपल्याच जनतेवर गोळ्या झाडून १०५ माणसं ठार मारली. परंतु, अखेर केंद्राला ‘महाराष्ट्र’ राज्य द्यावंच लागलं. १ मे, १९६० या दिवशी मराठी भाषकांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.