मुंबई महापालिकेच्या निवडणुका फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार

    03-Apr-2021
Total Views |

devendra fadanvis_1 

मुंबई: राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढणार असल्याचे मुंबई भाजपच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी मुंबई महापालिका निवडणुका लढवण्याबद्दलचा प्रस्ताव सर्व पदाधिकार्‍यांच्या सहमतीने मंजूर झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले.



“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेत खर्‍या अर्थाने भगवा फडकवला जाईल,” असा विश्वास मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार आणि अपयश ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले, त्याबद्दल भाजप कार्यकारिणीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अभिनंदन प्रस्ताव पारित करण्यात आला.



कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मुंबई भाजपचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. “अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागातील बदली व नियुक्ती रॅकेटचा पर्दाफाश केला. राज्य सरकारचा भ्रष्टाचार व अपयश उघडकीस आणले हे अतिशय कौतुकास्पद आहे,” असे अतुल भातखळकर यावेळी म्हणाले.