करोनाच्या दुसऱ्या लाटेतही रा. स्व. संघ सक्रिय

    29-Apr-2021
Total Views |
rss_1  H x W: 0


लसीकरण जनजागृतीसह अनेक कार्ये संघातर्फे सुरु आहेत
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पुन्हा सक्रीय झाले आहेत. देशभरातील २१९ ठिकाणी कोव्हिड रुग्णालयांमध्ये प्रशासनास मदत करणे, ४३ प्रमुख शहरामध्ये कोव्हिड सेवा केंद्रे सुरु करणे, देशभरात २ हजार ४४२ लसीकरणे केंद्रे उघडण्यासोबतच १० हजार ठिकाणांवर लसीकरण जनजागृती अभियान चालविण्यात येत आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत दिली.
 
 
 
सध्या देशात करोना संसर्गाची दुसरी लाट सुरु असून अनेक राज्यांमध्ये गंभीर स्थिती असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघातर्फे देशभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मदतीविषयी रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी माहिती दिली.
 
 
 

sa_1  H x W: 0  

अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनीलजी आंबेकर 
 
 
रा. स्व. संघ, सेवाभारती आणि अन्य संस्था – संघटना करोना प्रभावित प्रदेश आणि कुटुंबापर्यंत मदत पोहोचविण्यास सक्रिय आहेत. आवश्यकतेनुसार सध्या १२ प्रकारच्या मदत कार्यांना प्रारंभ करण्यात आला आहे. संभावित रुग्णांसाठी विलगीकरण केंद्रे व बाधित रुग्णांसाठी कोव्हिड सेवा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सरकारी कोव्हिड केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये मदत करणे, हेल्पलाईन सुविधा चालविणे, रक्तदान, प्लाझ्मादान यासाठी सक्रिय काम करणे, समुपदेशनासाठी काम करणे आदी प्रकारे मदत करण्यात येत आहे. त्यासह ऑक्जिसन आणि रुग्णावीहिकेसाठी मदत करणे, अन्न, अन्नधान्य दान, मास्क वितरण, आयुर्वेदिक काढा वितरण आदी कार्यांना देशभरात प्रारंभ करण्यात आल्याचे आंबेकर यांनी नमूद केले.
 
 
 
रा. स्व. संघाने मध्य प्रदेशातील इंदूर येथे राज्य सरकार, खासगी रुग्णालय आणि राधा स्वामी सत्संग न्यास यांच्या सरकार्याने दोन हजार खाटांचे कोव्हिड केंद्र सुरु केल्याचे आंबेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, संघ स्वयंसेवकांद्वारे देशभरातील २१९ ठिकाणी कोव्हिड रुग्णालयांमध्ये प्रशासनास मदत करणे, ४३ प्रमुख शहरामध्ये कोव्हिड सेवा केंद्रे सुरु करणे, देशभरात २ हजार ४४२ लसीकरणे केंद्रे उघडण्यासोबतच १० हजार ठिकाणांवर लसीकरण जनजागृती अभियान चालविण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार, प्लाझ्मा आणि रक्तदात्यांची सुची काही ठिकाणी तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये जगजागृती अभियानांतर्गत ६०० व्यक्तींनी प्लाझ्मादान केले, त्यामुळे १५०० अत्यवस्थ रुग्णांचा जीव वाचू शकला, असेही आंबेकर यांनी यावेळी सांगितले.