करोना व्यवस्थापनासाठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुखांची ग्वाही

    29-Apr-2021
Total Views |
ac_1  H x W: 0



करोना व्यवस्थापनासाठी लष्कराच्या सज्जतेची दिली माहिती
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : करोना संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी भारतीय लष्कर विविध उपक्रम राबवित असून कोणत्याही स्थितीचा सामना करण्यास लष्कर सज्ज आहे, अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
 
 
 
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कोविड व्यवस्थापनात मदत करण्यासाठी लष्कर राबवित असलेल्या विविध उपक्रमांवर यावेळी त्यांनी चर्चा केली. लष्कराचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. लष्कर देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये सुरू करीत असल्याची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली.
 
 
 
देशातील अनेक ठिकाणी लष्कराची रुग्णालये सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आल्याची माहिती जनरल नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. नागरिक उपचारासाठी त्याच्या नजीकच्या लष्करी रुग्णालयात जाऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले. आयात केलेले ऑक्सिजन टँकर आणि वाहनांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिथे विशेष कौशल्ये आवश्यक आहेत तिथे लष्कर मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे अशी माहितीही जनरल नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली.