राज्यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा पुरवठा होणार
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम केअर्स’ फंडामधून एक लाख पोर्टेबल ऑक्जिसन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी करण्यास बुधवारी मंजुरी दिली आहे. त्यांचा पुरवठा करोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या राज्यांना केला जाणार आहे. दरम्यान, हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन हवाईदलातर्फे केल्या जात असलेल्या मदतीची माहिती दिली.
देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी केंद्र सरकार ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे, पुरवठ्यासाठी ऑक्जिसन एक्सप्रेस चालविणे, द्रवरूप ऑक्सिजन आयात करणे आदी उपाय करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम केअर्स’ फंडामधून एक लाख पोर्टेबल ऑक्जिसन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.
द्रवरूप ऑक्सिजन उत्पादन – पुरवठा व्यवस्थापनासंदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पोर्टेबल ऑक्जिसन कॉन्सन्ट्रेटर्सची तात्काळ खरेदी करण्याचे आणि करोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या राज्यांना त्यांचा ताबडतोब पुरवठा करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी बैठकीत दिले आहेत. त्याचप्रमाणे ‘पीएम केअर्स’ फंडाअंतर्गत यापूर्वी मंजुरी देण्यात आलेले ७१३ पीएसए प्लांटसह ५०० नव्या प्लांटना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांची उभारणी डिआरडीओ आणि सीएसआयआरतर्फे विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानानुसार होणार आहे.
पीएसए प्लांट्सची स्थापना करणे आणि पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची खरेदी केल्यानंतर जास्त मागणी असलेल्या प्रदेशांमध्ये ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यास मदत होणार आहे.
हवाई दलाच्या करोना संबंधित कार्याचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. करोना संसर्गाच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी भारतीय हवाई दल करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
भारतीय हवाई दलाने आपल्या अवजड वाहतूक करणाऱ्या संपूर्ण ताफ्याला अहोरात्र सज्ज राहण्याचे आणि मध्यम वजनाची सामग्री वाहून नेणाऱ्या ताफयांना कोविड संबंधित सामग्रीची देशात आणि परदेशात ने-आण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी पंतप्रधानांना दिली. ही कामे अहोरात्र सुरू ठेवण्यासाठी या ताफ्यामधील कर्मचारी संख्येत वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व प्रांतापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय हवाई दल मोठी आणि मध्यम आकाराची विमाने तैनात करत असल्याची माहिती हवाई दल प्रमुख भदौरिया यांनी दिली. करोनाविषयक कार्यासाठी विविध मंत्रालये आणि एजन्सी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी भारतीय हवाई दलाने स्थापन केलेल्या कोविड समर्पित हवाई सहकार्य विभागाची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली. भारतीय हवाई दलात लसीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तसेच भारतीय हवाई दलाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात कोविड सुविधा वाढवण्यात आल्या आहेत आणि शक्य तिथे नागरिकांनाही परवानगी देण्यात आली असल्याचेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
ऑक्सिजन टँकर आणि इतर आवश्यक सामग्री वाहतुकीसंदर्भातल्या कामात वेग, व्यापकता आणि सुरक्षितता वाढवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. करोना संदर्भातल्या कार्यात भारतीय हवाई दलाचे कर्मचारी संसर्गापासून सुरक्षित राहतील हे सुनिश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोविड संबंधित कार्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची पंतप्रधानांनी विचारपूस केली.