वेगळ्या वाटेवरचा तरुण प्रवासी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2021   
Total Views |

Ishan Devade_1  
 
 
 
तारुण्याच्या उंबरठ्यावर वेगळ्या वाटेने प्रवास करत, अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या नाशिकच्या ईशान देवडेविषयी...
 
 
मानवी जन्मानंतर पहिली पाच वर्षं ही प्रत्येक बालकाची अतिशय आनंदात आणि सहज व्यतीत होत असतात. त्यानंतर सुरू झालेले शालेय जीवन हे लौकिकदृष्ट्या स्थिरस्थावर होईपर्यंत सतत सुरूच असते. शालान्त परीक्षापश्चात करिअरच्या विविध वाटा निवडणारे आणि त्यावर चालणारे अनेक विद्यार्थी आपण सभोवताली पाहत असतो. आजच्या आधुनिक युगात व्यावसायिक शिक्षणाकडे सर्वांचाच कल असल्याचे दिसून येते. सुरक्षित आणि स्थायी जीवनान व्यतीत करण्याकामी अनेकांची पसंती अशाच प्रकारच्या करिअरला असते. त्यातूनच अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण आदींकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल वाढलेला दिसून येतो. मात्र, अशा सर्व भाऊगर्दीत नाशिक येथील वय वर्ष १८ असणारा ईशान अमित देवडे हा तरुण मात्र वेगळ्याच वाटेने जात आपले जीवनमान समृद्ध करत आहे.
 
 
 
करिअरच्या दृष्टिकोनातून त्याचे उंच भरारी घेण्याचे वेगळेच स्वप्न त्याने उराशी बाळगले. मात्र, सध्या तो जे काही करत आहे, ते पाहता, त्याचे हे वेगळेपण अनेकांसाठी प्रेरणादायी असेच आहे. छायाचित्रकार आणि वादक असणार्‍या ईशानचे वेगळेपण त्याच्या या कलाकारीतही प्रतिबिंबित होते. मोबाईल किपॅडच्या माध्यमातून संगीताचे विविध सूर छेडणारा ईशान हा त्याच्या याच कर्तबगारीमुळे सध्या अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. ‘राष्ट्रगीत’, ‘सारे जहा सें अच्छा’, ‘गणपती आरती’, चित्रपट गाणी असे संगीताचे सूर त्याने आपल्या मोबाईलच्या किपॅडमधून निर्माण केले आहेत. विविध वाहने आणि निसर्ग, प्राणी यांची ईशानने काढलेली छायाचित्रे तर अत्यंत बोलकी आहेत. त्याच्याशी त्याच्या या वेगळ्या वाटेबाबत चर्चा केली असता, तो सहज सांगतो की, “The road not taken is the road to be taken, असे मला कायमच वाटत आले आहे. त्यामुळे सतत काहीतरी नवे, यापूर्वी न साकारले गेलेले, कोणीही न केलेले करावे, यासाठी माझा कायम प्रयत्न असतो. याच बाबींचा मी कायम विचार करत असतो. अगदी फिरायला गेल्यावरही आमचा प्रयत्न असतो की, नवनव्या वाटांनी इच्छित स्थळ गाठावे. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन काही सापडण्यास मदत होते. हेच सूत्र शिक्षणाच्या बाबतीतही माझ्याकडून नकळत सांभाळले गेले आहे आणि यापुढेदेखील जाईल. शिक्षण केवळ वर्गातच न होता, ती एक सातत्याने सुरू असलेली प्रक्रिया आहे हे वाक्य केवळ वाचण्यासाठी नसून ते एक सत्य आहे, असा माझा अनुभव आहे,” असे ईशान सांगतो.
 
 
 
 
भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदा ईशानने ऐकले आणि ते पाठ झाले. तेव्हा तो अवघ्या दोन-अडीच वर्षांचा होतो. कॉलनीतील गणपतीच्या कार्यक्रमात स्वतःहून उत्स्फूर्तपणे ‘मी राष्ट्रगीत म्हणणार’ असे त्याने आयोजकांना सांगितले आणि मंचावर ते सादर केले. त्यावेळी सगळ्यांना ईशान दिसावा म्हणून त्याला जरा उंचावर उभे करण्यात आले होते. तरी ‘जन-गण-मन’ हे शब्द पूर्ण होईपर्यंत उपस्थित सगळेच उभे राहिलेले होते. तेव्हा मनात दाटून आलेली भावना आजही लक्षात असल्याचे ईशान सांगतो आणि त्यानंतर जेव्हा-जेव्हा राष्ट्रगीत गायले, त्या प्रत्येक वेळी मनात नवीन ऊर्जा संचारते, ऊर्जास्रोतांचा उगम होत असल्याचेही तो उत्साहाने सांगतो. ईशानने संगीताचं रीतसर शिक्षण घ्यायला सुरुवात केली ती ओमानमध्ये असताना. नऊ वर्षं भारताबाहेर असताना शाळेच्या ग्रुपमधून त्या-त्या देशांचे राष्ट्रगीत आणि त्याच सोबतीने भारताचे राष्ट्रगीत शाळेत व भारतीय दूतावासाच्या कार्यक्रमात गाण्याची संधीदेखील या काळात ईशानला प्राप्त झाली.
 
 
 
ईशानला बहुतेक सर्व वाद्य वाजवता येत असल्याचे तो आवर्जून नमूद करतो. संगीत आणि स्वर आपल्या सभोवताली सगळीकडचे आहेत, असे त्याला वाटते. त्यामुळेच त्याला ते स्वर अगदी मोबाईलच्या किपॅडमध्येही गवसले. “कुठलेही गाणे ऐकून त्याचे नोटेशन्स माझ्या मनात वाजायला लागतात,” असे ईशान सांगतो. त्यामुळेच तसेच मोबाईल किपॅडमधूनही ईशानला राष्ट्रगीत ऐकावयास येऊ लागले. एकदा त्याने ते पूर्ण वाजवून पाहिले आणि सहज म्हणून ‘सोशल मीडिया’वर पोस्ट केले. ते न केवळ सगळ्यांना आवडले, तर ते व्हायरलदेखील झाले. भारताच्या अनेक भागांतूनच नाही, तर जगभरातील अनेक परिचितांकडून व अपरिचितांकडून स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ते शेअर करण्यात आले होते. याचा मनस्वी आनंद झाल्याचे ईशान नमूद करतो. यातूनच पुढे ‘ऐ मेरे वतन के लोगो’देखील त्याने अशाच पद्धतीने वाजविले. रोज घरात कानावर पडणारी गणपतीची आरतीदेखील ईशानला मोबाईलच्या कळफलकांवर सापडली. ईशानला जशी गाण्यांची आवड आहे, तशीच त्याला फोटोग्राफी, वेगवेगळ्या गाड्या आणि विमानांचा अभ्यास करण्याचीसुद्धा आवड आहे. नाशिकमधील काही फोटोग्राफर्सच्या ग्रुपसोबत फोटोग्राफी करण्याची आवड तो सध्या जोपासत आहे. ‘कॅनन इंडिया’, ‘नॅशनल जिओग्राफी’ आदी मार्फत त्याच्या छायाचित्रांचे कौतुक करण्यात आले आहे. विविध भाऊगर्दीत हरविलेल्या तरुणांसाठी ईशानसारखे व्यक्तिमत्त्व नक्कीच प्रेरणादायी आहे. त्याच्या आगामी कार्यास आणि साधनेस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@