ऑक्सिजन एक्सप्रेसचा देशाला दिलासा
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : करोना संकटात देशातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेची स्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारतीय रेल्वेची भूमिका अतिशय महत्वाची ठरत असून करोना संकटात भारतीय रेल्वे भगीरथ कामगिरी करीत आहे.
द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन- LMO चे टँकर्स भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस २२ एप्रिलच्या रात्री विशाखापट्टणमहून मुंबईसाठी रवाना झाली. त्यानंतर २३ एप्रिलच्या रात्री प्रथम ती नागपुर येथे पोहोचली, तेथे आवश्यक त्या संख्येने ऑक्सिजन टँकर्स उतरविण्यात आले. त्यानंतर २४ एप्रिल रोजी दुपारी ऑक्सिजन एक्सप्रेसने नाशिक येथे आवश्यक तेवढा ऑक्सिजन उतरविला आणि त्यानंतर रात्री मुंबई येथे ही एक्सप्रेस दाखल झाली. हा प्रवास वाचण्यास तसा सोपा वाटत असला तरीदेखील त्यामागे भारतीय रेल्वेचे सुयोग्य नियोजन आणि भगिरथ प्रयत्न कारणीभूत आहेत. त्यामुळे ते समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
महाराष्ट्र सरकारने १५ एप्रिल रोजी देशातील विविध ठिकाणांहून महाराष्ट्रात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन- एलएमओ टँकर्सची वाहतूक रेल्वेद्वारे करता येऊ शकते का, अशी विचारणा केली. राज्य सरकारच्या विचारणेनंतर रेल्वेने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आणि अशा प्रकारच्या वाहतुकीचा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली. यामध्ये असलेले मुख्य आव्हान म्हणजे हे टँकर्स वाहून नेणाऱ्या रेल्वेसाठी योग्य असा मार्ग शोधणे. कारण रेल्वे ओव्हरब्रिज, कमी उंचीवर असणाऱ्या विजेच्या तारा, फलाटांची रचना, रेल्वेपुलांवरील निर्बंध, तीव्र वळणे आदींचा अभ्यास करून रेल्वेने आपले कसब पणाला लावले आणि मुंबई ते विशाखापट्टणम योग्य असा मार्ग आखला. मार्गाची आखणी झाल्यानंतर वाहतुकीसाठी आवश्यक रेल्वेच्या डब्यांची चाचणी १८ एप्रिल रोजी बोईसर येथे घेण्यात आली. या चाचणीमध्ये ऑक्सिजन टँकर्स रेल्वेडब्यांवर ठेवण्यात येऊन आवश्यक ते मोजमाप घेणे, टँकर्सच्या सुरक्षिततेच्या चाचण्या घेण्यात आला.
मात्र, खरे आव्हान होते ते विशिष्ट उंचीच्या टँकर्सची निवड करणे. कारण त्यावर या ऑक्सिजन एक्सप्रेसचा वेग अवलंबून होता. त्यासाठी उद्योगक्षेत्राकडून ३०३० मिलीमीटर उंचीच्या अथवा त्याहून कमी उंचीच्या टँकर्सची मागणी करण्यात आली. कारण या विशिष्ट उंचीचे टी१६१८ मॉडेलचे टँकर्सच १२९० मिलीमीटरच्या सपाट रेल्वेवॅगनवर ठेवणे शक्य होते. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत टँकर्स चढविणे आणि उतरविण्यासाठी आवश्यक असे रॅम्प तयार करण्यात आले. त्यानंतर १९ एप्रिल रोजी पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस मुंबई येथीन विशाखापट्टणम येथे रवाना झाली आणि २३ तारखेला ऑक्सिजनचा साठा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाली.
वाचले तब्बल २० तास !
भारतीय रेल्वेने आपले सर्व कौशल्य पणाला लावले आणि ऑक्सिजन एक्सप्रेसने मुंबई ते विशाखापट्टणम हा प्रवास अवघ्या ५५ तासांमध्ये पूर्ण केला. हाच प्रवास रस्तेमार्गाने केला असता तर त्यास जवळपास ७० तासांहून अधिक वेळ लागला असता आणि त्यासाठी दोन टँकर चालकांचीही गरज लागली असती. महत्वाची बाब म्हणजे द्रवरूप ऑक्सिजनची वाहतूक करताना अतिशय काटेकोरपणे सुरक्षा प्रोटोकॉल पाळण गरजेचे असते. त्यामध्ये वेग अचानक कमी करण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य ठेवणे, कमाल वेग मर्यादित ठेवणे, तीव्र वळणांना टाळणे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे वाहतुकीदरम्यान आवश्यक तो दाब कायम ठेवणे गरजेचे असते. मात्र, रेल्वेने या सर्व आव्हानांवर मात केली, महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशनेही रेल्वेकडे ऑक्सिजन एक्सप्रेसची मागणी केली आहे.
विलगीकरण खाटांचीही केली व्यवस्था
करोना संकटाच्या काळात रेल्वेने देशभरात विविध ठिकाणी ३ हजार ८१६ डबे हे विलगीकरण व्यवस्थेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात २१ डब्यांमुळे ३७८ खाटांची सोय झाली असून सध्या ३२ रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील शकुरबस्ती येथे ५० डब्यांद्वारे ८०० तर आनंद विहार येथे २५ डब्यांद्वारे ४०० खाटांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.