मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधीतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत असल्यामुळे आता रुग्णांना वैद्यकिय सेवांचाच तुटवडा जाणवू लागला आहे. कुठे बेड नाही, कुठे ऑक्सिजन नाही तर कुठे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठाही अपूरा पडू लागला आहे. हे पाहता, अभिनेते भरत जाधव यांनी एक संकल्पना अंमलात आणत चाहत्यांनाही याबद्दल आवाहन केले आहे. ज्यांचे बंगले रिकामे आहेत, किंवा एखादे घर रिकामे आहे. त्यांनी कोरोनाबाधीतांच्या मदतीसाठी द्यावे."
मराठी अभिनेते भरत जाधव यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही संकल्पना सांगितली. त्यांनी लिहिले आहे की, "सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. एका सोसायटीच्या अपार्टमेंटमधील हा प्रयोग सर्वांनी विचार करण्यासारखा आहे. 'माझ्या सोसायटीमध्ये चारजण कोरोनाबाधित आढळले होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट १ बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटीमधील दोन रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तिथे कोरोनाबाधित रुग्णांना हलवले. रिकाम्या फ्लॅट धारकांचा सहा महिन्याचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले. १५ दिवसांनी सर्व जण बरे झाले. आता तेच फ्लॅट अडचणीच्या वेळेसाठी राखून ठेवले आहेत. हा छोटासा माझा प्रयत्न.' आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे होऊन आपले कर्तव्य करण्याची.' असा संदेश त्यांनी दिला.