नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वाधिक करोनाबाधित असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. मात्र, या अंतर्गत बैठकीचे ‘लाईव्ह टेलिकास्ट’ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. त्यामुळे "केजरीवाल, प्रोटोकॉलचे पालन करा" अशी जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना करून दिली.
देशातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाधितांची सर्वाधिक संख्या असलेली राज्ये – केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित होते. मात्र, या बैठकीत केजरीवाल यांनी एक चलाखी केली. दिल्लीविषयी पंतप्रधानांनी आढावा देत असताना केजरीवाल यांनी बैठकीचे रेकॉर्डिंग करीत त्याचवेळी खासगी वृत्तवाहिन्यांवरून त्याचे ‘थेट प्रक्षेपण’ (लाईव्ह टेलिकास्ट) करून घेतले. त्यामध्ये केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी असल्याचे सांगितले.
मात्र, केजरीवाल यांची हि चलाखी पंतप्रधान कार्यालयाच्या तात्काळ लक्षात आली. त्यामुळे केजरीवाल बोलत असताना बैठकीतच पंतप्रधानांनी त्यांना थांबविले आणि त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. पंतप्रधान म्हणाले, “आपली जी परंपरा आहे, जे प्रोटोकॉल आहेत; त्याच्या अगदीच विरोधात सुरू आहे. कोणी मुख्यमंत्री अशा अंतर्गत बैठकीचे लाईव्ह टेलिकास्ट करतो, हे योग्य नाही. त्यामुळे अशा मुद्द्यांविषयी नेहमीच संयमाचे पालन करणे आवश्यक आहे”.
पंतप्रधानांनी आपली चलाखी पकडल्याचे लक्षात येताच केजरीवाल यांना धक्का बसला. त्यामुळे अगदी दबक्या आवाजात त्यांनी “ठिक आहे, यापुढे त्याची काळजी घेऊ” असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकारामुळे केजरीवाल हे अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करीत असल्याचे समोर आले आहे.