बदल! सतत बदल! निसर्गाचा न बदलता नियम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Placerville_1  
 
 
गावाच्या मानचिन्हामध्ये सोन्याचं उत्खनन नि फाशी दोन्हीचं चित्र ठेवलं. पुढे कित्येक वर्षांनी ‘हँगटाऊन’चं ‘प्लेसरव्हिल’ असं नवं नाव ठेवण्यात आलं. फाशी दिलेल्या झाडाचं खोड आजही टाऊन कौन्सिलच्या एका कक्षात मुद्दाम ठेवण्यात आलं आहे.
तुम्ही ‘ग्रँड ट्रंक रोड’ हे नाव ऐकलंय? इंग्रजी वाघिणीचं दूध प्यायलेल्या एखाद्या विद्वानाला विचारा. लगेच तो मिशांना पीळ भरत (असल्या तर) तुम्हाला सांगेल, “वा, ग्रँड ट्रंक रोड म्हणजे काय विचारता? इंग्रजांनी इथल्या ‘ऑल दि ब्लडी इंंडियन नेटिव्ह’ लोकांसाठी जी अनेक हितकारक, सार्वजनिक कामं केली, त्यातलंच ‘ग्रँट ट्रंक रोड’ची उभारणी हे एक मोठं काम. कलकत्ता (आता कोलकाता) ते पार काबूलपर्यंतचा सुमारे १,५०० मैल लांबीचा हा सुंदर राजमार्ग इंग्रजांनी सन १८३० ते १८६० या काळात बांधून काढला.”
 
 
ही विधानं म्हणजे, सत्य आणि असत्य यांची छानशी मिसळ आहे. मुळात हा मार्ग अत्यंत प्राचीन आहे. म्हणजे किती प्राचीन? तर हिंदू परंपरेनुसार सर्वप्रथम मगधसम्राट चंद्रगुप्त मौर्याने तो बांधला. तो तत्कालीन वंग प्रदेशातल्या ढाक्यापासून सुरू होऊन तत्कालीन पंचनद आणि गांधार यांच्या सीमेवरील पुरुषपूर उर्फ पेशावर इथे संपायचा. प्राचीन भारतीय साहित्यात या राजपथाला म्हटलं आहे- उत्तरापथ! उत्तर भारताच्या पूर्व टोकापासून पश्चिम टोकापर्यंत, आडवा छेद दिल्यासारखा जाणारा तो उत्तरापथ!
 
 
पुढच्या काळात या मार्गाची दुरुस्ती, बांधबंदिस्ती केली ती सूर घराण्याच्या शेरशाह सूरी याने. हा हुमायूनचा पराभव करून अल्पकाळ दिल्लीत सत्ताधारी झाला होता. त्याने विहिरी, तळी, धर्मशाळा, रस्ते अशी थोडीफार सार्वजनिक कामं केली. पण, त्याच्यानंतर दिल्लीत पुन्हा अकबर सत्ताधीश झाला आणि सार्वजनिक कामं वगैरे भंकसबाजी थांबली. सगळे मुघल बादशाह किंवा एकंदरीतच वेगवेगळ्या घराण्यांचे सुलतान यांनी मोठमोठे महाल बांधले, तलाव बांधले, शालिमार बागसारखे रम्य बगिचे तयार केले. कुणासाठी? सार्वजनिक वापरासाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी? छेः! छेः! हे सगळं त्यांनी उभं केलं स्वतःच्या ऐयाशीसाठी!
 
 
अगदी तसंच, इंग्रजांनी ज्या काही कथित सुधारणा आणल्या, त्या इथल्या सामान्य माणसासाठी नव्हे, तर आपला व्यापार वाढवण्यासाठी. इंग्रज हे पक्के धंदेवाईक. सत्तोद्योगी, दीर्घोद्योगी. प्रत्येक गोष्टीतून पैसा कसा काढता येईल, इकडे त्यांचं प्रथम लक्ष. ते साध्य झाल्यावर जमलं तर ऐयाशी करायची. त्यामुळे १८३० साली ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने निर्णय घेतला की, आपली राजधानी असलेल्या कलकत्ता शहरापासून थेट पेशावर आणि आणखी पुढे काबूलपर्यंत मार्ग बांधायचा. त्या काळामध्ये मुघली अमलामुळे उत्तरापथाचं नाव झालं होतं ‘सडक-ए-शेरशहा’-‘शेरशहाचा मार्ग.’ इंग्रजांनी जवळपास तोच मार्ग, काही ठिकाणी त्यांना सोयीची ठिकाणं त्याला जोडून घेत, नवा मार्ग उभारला आणि त्याला नाव दिलं- ग्रँड ट्रंक रोड. १४९१ मैल किंवा सुमारे २,४०० कि.मी.चा हा सुंदर मार्ग इंग्रजांनी आपल्या व्यापारी आणि लष्करी हालचाली वेगाने व्हाव्यात म्हणून बांधला; भारतीय जनतेच्या सोयीसाठी नव्हे. परंतु, त्यामुळे भारतीय लोकांची आपोआपच सोय झाली, एवढंच!
 
 
१८३३ ते १८६० पर्यंत हे भव्य काम चालू होतं. साहजिकच ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या इंग्लंडहून आलेल्या आधुनिक अभियंत्यांसमोर प्रश्न आला. आधुनिक पद्धतीने रस्ता बांधण्यासाठी कुशल साहाय्यक हवेत. म्हणून तत्कालीन संयुक्त प्रांतातील सहारनपूर जवळच्या रुडकी (भ्रष्ट इंग्रजी उच्चार रुरकी) या गावी एक अभ्यासवर्ग सुरू करण्यात आला. ते साल होतं १८४५. हळूहळू त्या अभ्यासवर्गाला अभियांत्रिकी विद्यालयाचंच रूप आलं. त्यातून १८४७ साली ‘ईस्ट इंडिया कंपनी’चं ‘सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट’ निर्माण झालं. १८५४ साली या विद्यालयाला लेफ्टनंट गव्हर्नर जेम्स टॉमसन याच्या स्मरणार्थ ‘टॉमसन कॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग’ असं नाव देण्यात आलं. हेच आजचं ‘आय.आय.टी. रुडकी’ होय.
 
 
तर चल-अचल वस्तूंच्या, व्यक्तींच्या, संस्थांच्या, ठिकाणांच्या रंगरूपांत, नावांत, कार्यांत, गुणधर्मांत सतत असे बदल होतच असतात. कारण, काळ सतत बदलत असतो. काही बदल समाजाला आवडतात. काही बदल समाज स्वतः होऊन करतो. काही बदल समाजावर लादले जातात. काही बदल समाज कुरकुर करत स्वीकारतो. जे समाजधुरीण असे बदल घडवून आणतात त्यांची इच्छाशक्ती मोठी असते. त्यांना माहीत असतं की, काळाबरोबर जो बदलतो तोच टिकतो. बदल नेमका कुठे, कसा, किती प्रमाणात घडवायचा, हेही त्यांना माहीत असतं. त्यामुळे चिंरतन मूल्ये न बदलता, ते योग्य तो बदल घडवतात. म्हणून अशा धुरिणांना ‘द्रष्टा’ असं म्हणतात. ज्या समूहांना असे द्रष्टे मिळत नाहीत किंवा जे समूह आपल्या पुस्तकांना ‘अपरिवर्तनीय’ म्हणून घट्ट चिटकून बसतात, त्यांचं काही खरं नसतं. उदा. एका पुस्तकातल्या तत्त्वज्ञानाला प्रमाण मानून एका अवाढव्य युरोपीय देशाने आपली राज्यव्यवस्थाच नव्हे, तर संपूर्ण जीवनव्यवस्थाच नव्याने बांधली. आता पृथ्वीवर जणू स्वर्गच अवतरला, असे डिंडिम पिटले जाऊ लागले. पण, अवघ्या ७० वर्षांत कल्पनेतला स्वर्ग दाणकन जमिनीवर आदळला. ‘रशियन एम्पायर’चे ‘युनायटेड सोशालिस्ट सोव्हिएत रिपब्लिक्स’ (युएसएसआर) आणि पुन्हा ‘रशियन फेडरेशन’ झालं.
 
 
१९१२ साली इंग्रजांनी आपली भारतीय राजधानी कलकत्त्यातून हलवून दिल्लीला नेली. गोर्‍या इंग्रजी राज्यकर्त्यांना भारतीय हिंदू-मुसलमान नागरिकांबद्दल मनःपूर्वक तिरस्कार, तुच्छता वाटत असे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शहर दिल्ली म्हणजे जुनी दिल्ली हे ‘ब्लॅक टाऊन’ होतं. म्हणून त्यांनी स्वतःसाठी ‘नवी दिल्ली’ हे नवं ‘व्हाईट टाऊन’ उभारलं. हे करताना नव्या आणि जुन्या दिल्लीतल्याही अनेक रस्त्यांना, चौकांना इंग्रजांची आणि आधीच्या मुघली राज्यकत्यार्र्ंचीही नावं दिली गेली. बाबर रोड, अकबर रोड, औरंगजेब रोड, बहादुरशाह जफर रोड, शाहजहान रोड, तुघलक रोड, सफ्दरजंग एनक्लेव्ह, किंग्जवे, राटेंडन रोड, आयर्विन रोड, अ‍ॅलनबी रोड, कॅनिंग रोड, एडवर्ड रोड इत्यादी. बंगालची फाळणी करणारा कुप्रसिद्ध व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या नावाने तर एक ‘कर्झन लेन’ पण होती अणि एक ‘कर्झन रोड’ पण होता. तत्कालीन मद्रासचा फे्ंरच गव्हर्नर जोसेफ डुप्ले याचा इंग्रजांनी पराभव केला. त्यामुळे भारत जिंकण्याचं फे्ंरचांचं स्वप्न विरून गेलं. पण, नव्या दिल्लीत इंग्रजांनी आपल्या या जबरदस्त शत्रूचंदेखील नाव रस्त्याला दिलं.
 
 
स्वातंत्र्यानंतर ही सगळी इंग्रजी नावं आणि इंग्रजांचे पुतळे हलवायला सगळ्याच ठिकाणी सुरुवात झाली. स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेसी सरकारांची गंमत पाहा हं! इंग्रजांची नाव सहजपणे हटली. पण, मुसलमानी सुलतानांची नावं मात्र हटायला तयार नाहीत. बाबर, अकबर, शाहजहाँ, सफ्दरजंग, लोदी, तुघलक अजून घट्ट आहेत. २०१५ साली ‘औरंगजेब रोड’ची मात्र मोठ्या कुशलेने उचलबांगडी (की उचलतंगडी?) करून तिथे ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोड’ करण्यात आलं. त्यांच्या नावाला कुणीही कोणत्याच मुद्द्यावर विरोध करूच शकत नाही. तरी ते हयात असताना आपल्याकडचे एक खुसपटं काढण्यात प्रवीण असलेले स्वयंघोषित विचारवंत बोललेच होते की, “त्यांना कशाला राष्ट्रपती करताय? ते महान शास्त्रज्ञ आहेत. पण, त्यांना राजकारणातलं काय कळतंय?” इत्यादी.
 
 
असो. तर आज ना उद्या मुघली सल्तनतीची प्रतीकं असणारे ढाँचे, वास्तू, नावं जाणार, हे नक्की! वसाहतवादी मनोवृत्ती दर्शवणारी प्रतीकं, नावं पण जाणारच आणि हे मी फक्त आपल्याकडचंच सांगतोय, असं समजू नका. अगदी अमेरिकेतही हेच चाललंय. तो पाहा, अमेरिकेचा कॅलिफोर्निया प्रांत. ‘आमची मुलगी किंवा मुलगा किनई कॅलिफोर्नियाला आहे हो,’ असं सांगण्याची फॅशन आपल्याकडच्या नवशिक्षितांमध्ये (प्रत्यक्षात ते फक्त साक्षर असतात, एवढंच!) आहे. कॅलिफोर्नियात कुठे आहे, असं विचारलं तर त्यांना सांगताही येत नाही. कारण, मुळात इंग्लंड-अमेरिका ही नावं ते आपल्याकडच्या पेण-पनवेलप्रमाणेच घेत असतात. असतील एकमेकांपासून तासाभराच्या अंतरावर!
 
 
असो. अमेरिका म्हणजे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ हा पूर्वेच्या अटलांटिक महासागर किनार्‍यापासून पश्चिमेच्या पॅसिफिक समुद्रकिनार्‍यापर्यंत पसरलेला एक अवाढव्य देश आहे. त्याच्या एक टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत विमानातून जायलादेखील आठ तास लागतात. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, वॉशिंग्टन डी.सी. ही शहरं त्याच्या पूर्व किनार्‍यावर आहेत, तर सान फ्रान्सिस्को, लॉस एंजल्स, हॉलिवूड वगैरे पश्चिम किनार्‍यावर आहेत. कॅलिफोर्निया हे राज्य त्याच्या पश्चिम किनार्‍यावर असून, सेक्रमेंटो हे शहर त्यांची राजधानी आहे. मात्र, या अधिकृत राजधानीपेक्षा राज्यातलं सान फ्रान्सिस्को हे शहर जगभर जास्त प्रसिद्ध आहे. सेक्रमेंटो शहराजवळ साधारण ५०-५५ किमीवर ‘प्लेसरव्हिल’ नावाचं एक छोटंसं गाव आहे. गावाचं स्वत:चं असं एक मानचिन्ह-लोगो किंवा मोनोग्राम आहे. एक मनुष्य खड्डा खणून त्यातून काहीतरी वस्तू काढतोय. त्याच्या मागून एका झाडावरून एक फास लटकतो आहे, असं हे मानचिन्ह आहे. या चित्रापाठी गावाच्या स्थापनेचा इतिहास आहे. सन १८४८ साली कॅलिफोर्निया प्रांतात सोनं सापडलं. अख्ख्या अमेरिकेतून हौशे-नवशे-गवशे कॅलिफोर्नियात येऊ लागले. सोनं आलं की गुन्हेगारी आलीच. १८४८ साली जेम्स मार्शल नामक एका संशोधकाला या परिसरात सिएरा निवाडा पर्वताच्या पायथ्याशी एका ओढ्यात सोन्याचे कण दिसले. मग अनेक संशोधक आले. सोनं मिळत गेलं आणि अनेकांनी तिथेच घर बांधून गाव वसवलं. पण, काही गुन्हेगारांनी एका संशोधकाला लुटून ठार केलं, इतरांनी गुन्हेगारांना पकडलं. आता सेक्रमेंटोहून शेरीफ येणार वगैरे वाट बघायला लोकांना धीर नव्हता. त्यामुळे आपण ‘वेस्टर्न-काऊबॉय’ चित्रपटात बघतो, तसंच घडलं. लोकांनी त्या गुन्हेगारांना एका झाडावर फाशी दिली आणि विषय संपवला. पुढे या घटनेवरून लोकांनी आपल्या या नव्या गावाचं नाव मोठ्या हौसेने ठेवलं - हँगटाऊन-फाशीगाव आणि गावाच्या मानचिन्हामध्ये सोन्याचं उत्खनन नि फाशी दोन्हीचं चित्र ठेवलं. पुढे कित्येक वर्षांनी ‘हँगटाऊन’चं ‘प्लेसरव्हिल’ असं नवं नाव ठेवण्यात आलं. फाशी दिलेल्या झाडाचं खोड आजही टाऊन कौन्सिलच्या एका कक्षात मुद्दाम ठेवण्यात आलं आहे.
 
 
 
आता नुकतीच कौन्सिलच्या सभासदांची एक विशेष बैठक झाली. विषय होता गावाच्या मानचिन्ह चित्रातला सोन्याचं उत्खनन करणारा हॅटवाला बुवा ठेवा. पण, मागे झाडाला लटकणारा फासाचा दोर काढून टाका, तो अयोग्य वाटतो. यावर बरीच चर्चा होऊन अखेर फाशीचा दोर हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयाच्या विरुद्ध मत देणार्‍यांचं म्हणणं असं की, फाशीच्या दोराच्या प्रतिकात अनुचित, अयोग्य, ऑड खरं पाहता काही नाही. तत्कालीन कायदा आणि सुव्यवस्थेची एकंदर व्यवस्था लक्षात घेता, आपल्या पूर्वजांनी कायदा हातात घेतला आणि स्वत:च गुन्हेगारांचा न्याय करून टाकला, हे फारसं चुकीचं म्हणता येणार नाही. तुम्ही आजचे नैतिक नियम त्या काळात लावून आपल्या गावाचा इतिहास बदलून टाकताय. त्यांच्या म्हणण्यातही नक्कीच तथ्य आहे. पण, बदल अपरिहार्य आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@