(इस्त्रायलमध्ये नागरिकांवर आता कुठलेही कोरोनाचे कुठलेही निर्बंध नसणार आहेत. अनलॉक प्रक्रीया पूर्णपणे खुली झाली आहे. मास्क वापरणे बंधनकारक नाही, त्यामुळे सोमवारच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी अशी तुफान गर्दी केली होती. जगालाही लवकरच असा दिलासा मिळो, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.)
जगभरातील कोरोना आकडेवारी झपाट्याने वाढत असताना आता तब्बल दहा देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट आल्याची भीती आहे. कारण, गेल्या सात दिवसांत जगभरातील एकूण ५५ लाख २३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोना संक्रमित झाले आहेत. रुग्णवाढीची टक्केवारी जगभरात १२ टक्क्यांवर पोहोचली आहे. या आठवड्यात ८० हजार ३२३ रुग्णांनी जीव गमावला आहे. रुग्ण दगावण्याच्या संख्येत जगभरात एकूण सात टक्क्यांनी वृद्धी झाली आहे.
२४ तासांच्या अहवालात संक्रमितांची संख्या ही आठ लाखांवर पोहोचली असून, भारतात सर्वाधिक २.९४ लाख, ब्राझीलमध्ये ७३ हजार आणि तुर्कीमध्ये ६१ हजार व अमेरिकेत ६० हजारांवर संक्रमित वाढत आहेत. या आठवड्यात मंगळवारच्या दिवशी संपूर्ण जगभरात एकाच दिवशी मृत झालेल्यांची संख्या १३ हजार ९०५ आहे, ही बाब गंभीर आणि विचार करायला लावणारी आहे. गेल्या काही दिवसांत संपूर्ण जगभरात दहा देशांमध्ये कोरोनाची लाट ही चौथ्यांदा अक्राळविक्राळ रूप घेत आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट वाढत चालली आहे.
“ ‘लॉकडाऊन’ हा शेवटचा पर्याय आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संदर्भात देशवासीयांशी संवादात म्हटले आहे. जगभरात विचार केला असता, कोरोनाच्या गंभीर स्थितीत ब्राझील, तुर्की, फ्रान्स, अर्जेंटिना, इराण, कोलंबिया, जमर्नी, इटली, पेरू आणि पोलंड या देशांचा समावेश आहे. इथे दर दिवसाला दहा हजारांहून कोरोनाचे रुग्ण संक्रमित होत आहेत. सर्वात वाईट अवस्था ब्राझील आणि तुर्की या देशांची आहे. दहा हजार हा आकडा या भारताच्या दृष्टिकोनातून कमी असला, तरीही या देशाच्या तुलनेत ही आकडेवारी चिंता व्यक्त करणारी आहे.
या सगळ्यात लसीकरणच प्रभावी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणाचा प्रभाव दिसून येत आहे. लसीकरण पूर्ण झाल्यावर मृत्युदर ७० टक्क्यांनी घसरला. त्याशिवाय ब्रिटनमध्ये नवे कोरोना रुग्ण आढळण्याची गती १७ टक्क्यांवर आली आहे. कोरोना लसीकरणानंतर नागरिकांना आता ‘बूस्टर डोस’ देण्यात येणार आहे. लसीकरण पूर्ण करून आता नागरिकांना ‘बूस्टर डोस’ दिला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. प्रशासनाने त्याची तयारीही केली आहे. ब्रिटननेही ‘लॉकडाऊन’, ‘अनलॉक’ करण्याचा विचार स्पष्ट केला आहे. कारण, अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आवाहनही देशापुढे असणार आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्याचा उद्देश हा तिथल्या सरकारपुढे आहे.
या सगळ्या परिस्थितीत इस्रायलने जगाला आशा दाखवली आहे. तिथल्या ५६ टक्के लोकसंख्येचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. घरातून बाहेर येताना मास्कसक्तीही थांबवली आहे. शाळा सुरू झाल्या आहेत. उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. मास्क हद्दपार करणारे काही व्हिडिओ तिथले नागरिक समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत. १०० दिवसांत एकूण ५० टक्के लोकसंख्या लसीकरण पूर्ण करून मोकळी झाली. ८१ टक्के जनतेने कोरोनाचा एक डोस व ५६ टक्के जनतेने दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण ‘लॉकडाऊन’ ऐवजी लसीकरण हाच एकमेव मार्ग काही देश अवलंबताना दिसतात.
अमेरिकेतही तुलनेने बरी स्थिती म्हणायला हवी. कारण, इथल्या अर्ध्यापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. १८ वर्षांवरील एकूण १३ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ही लोकसंख्येच्या एकूण ५० टक्क्यांच्या वर आहे. ८.४ कोटी अमेरिकन नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे. अद्याप अमेरिकेला मोकळा श्वास घेता येणार नाही. कारण, इथेही रुग्णवाढ कायम आहे. सध्या ८० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोना मृत्यूचे प्रमाण ९०० इतके आहे. या देशात कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढताना दिसत आहे.
भारताचा शेजारी आणि मित्रदेश मानल्या जाणार्या भूताननेही कौतुकास्पद लढाई सुरू ठेवली आहे. भारताने या देशाला लसींचा पुरवठा केला खरा; पण लस दुर्गम भागात डोंगराळ ठिकाणी पोहोचविण्याचे आव्हान या देशाने स्वतः पेलले आहे. भूतानमध्ये हेलिकॉप्टरद्वारे कोरोना लस पोहोचवली जात आहे. ‘ऑक्सिजन’ सिलिंडरही याच प्रकारे पोहोचवावे लागत आहेत. या सगळ्या लढाईत मानवता जिंकावी, जगापुढे कोरोनाने लवकरच गुडघे टेकावेत, अशीच अपेक्षा...!